नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव संतजन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवाघरीं ॥२॥
जो नातुडे ध्यानीं समाधीसाधनीं । तो स्वानंदें कीर्तनीं नाचतसें ॥३॥
जो यज्ञावदानीं कांहीं नेघे माये । तो द्वादशीं क्षीराब्धी उभ उभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणें बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धि ॥५॥
वैष्णवाघरें लक्ष्मी कामारी । एका जनार्दनीं देव दास्यत्व करी ॥६॥