सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका ।
सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥
कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥
दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें ।
टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥
गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें ।
घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥
रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी ।
यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥
देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी ।
गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥
शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता ।
तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥
घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना ।
खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥