दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥

कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥

आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥

मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥

बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥

एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥