देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥

अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥

खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥

सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥