गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी ।

मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।

गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥

नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥

नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण ।

आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।

क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥

सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ।

वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥

नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें ।

धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित ।

देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥

शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं ।

यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव ।

अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥