वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग २९०१ ते ३०००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग २९०१ ते ३०००

अभंग २९०१

किती किती जन्म किती किती फेरे

किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥
न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥
किती किती विषय भोगिती वासना । यमाचे सदना जावयासी ॥३॥
एका जनार्दनीं न करी विचार । नरक तो अघोर भोगिताती ॥४॥

अभंग २९०२

इकडुनी तिकडे चालू जैसें माप

इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥
भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥
पुष्पाचा परिमळ घेऊनी सांडिती जाण । तिसें जन्ममरण प्राणियांसी ॥३॥
देह धरूनी आला न करा स्वहित । करी अपघात आपणासी ॥४॥
एका जनार्दनीं दोषी तोचि जाणा । न भजे चरणा संताचिया ॥५॥

अभंग २९०३

मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण

मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं ॥१॥
शतवर्ष कराल घेतां वाते गोड । कर्माकर्म सुघड न कळे कांहीं ॥२॥
मरणाची भ्रान्ती विसरुनी गूढ । वागवी काबाडे प्रपंचाचें ॥३॥
बाळ तरुणदशा वृद्धाप्य पावला । सवेंचि तो गेला अधोगती ॥४॥
एका जनार्दनीं मापाचिये परी । सवेंचि गोणी भरी सवें रिती ॥५॥

अभंग २९०४

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥
तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥
स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥
देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असतां ॥४॥
अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या पळे म्हणे भुतभूत ॥५॥
यापरी जाणोनी सांडी देहाची खंती । एका जनार्दनीं राहिला विदेह स्थिती ॥६॥

अभंग २९०५

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥
आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥
गुंतुनीं संसारी पडती अघोरीं । न चुकेची फेरी येतां जातां ॥३॥
एका जनार्दनीं संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥

अभंग २९०६

नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण

नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें ॥१॥
बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥
एका जनार्दनीं राहिलें भजन । सवेंचि मरण पावला वेगीं ॥३॥

अभंग २९०७

शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी

शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥
केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥
अज्ञानत्व गेलें वरुषें बारा । खेळतसे विटीदांडु भोंवरा ॥३॥
उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी बैसोनि विषयाच्या चेष्टा ॥४॥
ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोवरीं । एका जनार्दनीं पडला चौर्‍यांयशींचे फेरी ॥५॥

अभंग २९०८

शत वर्षाचा कउल घेउनी

शत वर्षाचा कउल घेउनी । आलासी योनी नरदेहा ॥१॥
गर्भ जठरीं सोहं सोहम् । जन्मतांची म्हणसी कोहं कोहम् ॥२॥
ऐसा ठकरा पापिष्ठा । पुढे कारिसी विषयचेष्टा ॥३॥
बाल तारूण्य गेलें । पुढें वृद्धाप्य वयही आलें ॥४॥
नाहें घडलें कीर्तन । तों पुढें आलें मरण ॥५॥
घेउनी जाती यमदुत । कुंभपाकीं तुज घालीत ॥६॥
नाना यातना ते करती । अग्निस्तंभा भेटविती ॥७॥
तेथें कोण सोडी तुज । आतां म्हणसी माझें माझें ॥८॥
ऐसा भुलला गव्हार । भोगी चौर्‍यांशीचा फेर ॥९॥
फेरे फिरूनी नरदेहीं आला । एका जनार्दनीं वायां गेला ॥१०॥

अभंग २९०९

येती नरदेहा गमाविती आयुष्य

येती नरदेहा गमाविती आयुष्य । प्रथम बाळदशेस । भोगिताती ॥१॥
वाचा नाहीं तया रडे आक्रंदोनी । जननीं तों स्तंनीं लावी बळें ॥२॥
क्षुधा लागलीया औषध पाजिती । उदर दुखतां देती स्तन बळें ॥३॥
संपता द्वादशा जालासे शहाणा । करुनी अंगना वेगीं देती ॥४॥
विषयाचे बळें मातलासे सर्व । सदा धुस् दर्प अंगीं वसे ॥५॥
सरलीया तारुण्य आला वृद्ध दशे । भोगितसे क्लेश नाना व्याधी ॥६॥
रामनाम वाचें सदा आठवणी नाहीं । धन दारा पुत्र पाही माझें माझें ॥७॥
शेवटील घडी परिपुर्ण भरली । माती जड झाली पापिष्ठाची ॥८॥
येउनी यमदूत नेताती बांधुन । नानापरी ताडन करिताती ॥९॥
यातना ती सर्व भोगुनी ढकलिती । पुनरपि येती गर्भवासा ॥१०॥
चौर्‍यांयशी लक्षा योनी फिरतां फिरतां । एका जनार्दनीं तत्त्वतां नरदेह ॥११॥

अभंग २९१०

जंव देहातें देखती तंव माझें म्हणती

जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥
पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला कीं न कळे साचा ॥२॥
जीव आत्मा न मरे कोणे काळीं । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥
एका जनार्दनीं देहा देखती मरण । गेला आला नाहीं तो तैसाचि जाण ॥४॥

अभंग २९११

निमालिया देहासाठीं

निमालिया देहासाठीं । रांडा पोरें म्हणती होटीं ॥१॥
तयासाठीं न रडती । आपुलें म्हणीता कैसे होती ॥२॥
ऐसे भुलले पामर नरक भोगिती अघोर ॥३॥
एका शरण जनार्दनीं । रामनाम न घेती कोणी ॥४॥

अभंग २९१२

गत तें आयुष्य गत तें धन

गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥
गत अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥
एका जनार्दनीं अगत तें नाम । म्हणोनि विश्राम योगियांसी ॥३॥

अभंग २९१३

जें जें दिसें तें तें नासे

जें जें दिसें तें तें नासे । अवघें वोसे जायाचें ॥१॥
नाशिवंत सर्व काया । भेणें उपाया करा कांहीं ॥२॥
पदार्थ मात्र जात असे । कांहीं नसे आनु दुजें ॥३॥
एका जनार्दनीं सर्व वाव । धरा भाव विठ्ठलीं ॥४॥

अभंग २९१४

मी मी म्हणतां वायां गेलें सर्व

मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥
रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥
मीपणे दुर्योधन बहुत गर्वीत । नासलें जीवित रणांगणीं ॥३॥
ऐसें तें बहुत मीपणें नासलें । एका जनार्दनीं भलें मीपण रहित ॥४॥

अभंग २९१५

अहा रे पामरा मीपण फुगारा

अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ कां रे भारा वागविसी ॥१॥
शस्त्राचेनि रोम चक्र नोहे अंगा । तया सहस्त्र भगा जाहले देखा ॥२॥
विष अग्नीचेनि मेळे । तया कांहें न पोळे ॥३॥
एका जनार्दनीं मन । देवापायीं केलेंक अर्पण ॥४॥

अभंग २९१६

मी म्हणोनियां भार वाहे

मी म्हणोनियां भार वाहे । वाउगा जाय कुंथत ॥१॥
रात्रंदिवस जैसा खर । वोझें अपार वहातुसे ॥२॥
नावडे भजन पूजा कथा । संसाराची वाहे चिंता ॥३॥
आला आयुष्याचा काळ । परि न राहे तळमळ ॥४॥
आपण मरुनी आणिकां मारी । ऐसा नष्ट दुराचारी ॥५॥
एका जनार्दनीं नाहीं भाव । तेथें न भेटेचि देव ॥६॥

अभंग २९१७

नाशिवंत देह नाशिवंत माया

नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काया काज ॥१॥
यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनी वायां ॥२॥
छायेसी बैसला सवेंची तो गेला । वृक्ष रडूं लागला गेला म्हणोनी ॥३॥
पाथस्थ मार्गस्थ येऊनी राहिला । उदय होतां निघाला आपुल्या मार्गें ॥४॥
तो घरधनीं रडत धावें मागें । काय काज वेगें सांगा तुम्हीं ॥५॥
उसनें आणीतां सुख वाटे जीवा । देतां दुःख जीवा काय काज ॥६॥
पाहुणा हा देह जाईल टाकुनी । एका जनार्दनीं काय दुःख ॥७॥

अभंग २९१८

हें शरीर नाशिवंत साचें

हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥
काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥
संसाराचा या करिती विचार । भुलले पामर अधोगती ॥३॥
एका जनादनीं वायाची भ्रमती । पुढें ती फजिती नेणवेची ॥४॥

अभंग २९१९

नाशिवंत देह नाशिवंत माया

नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी ॥१॥
म्रुगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तुं भुलुन गुंतलासी ॥२॥
व्यापारी बाजारीं घातिलें दुकान । स्ती पुत्र स्वजन तैसे बापा ॥३॥
एका जनार्दनीं ऐशियाच्या छंद । भुलोनी गोविंदा विसरसी ॥४॥

अभंग २९२०

क्षणभंगुर देह

क्षणभंगुर देह । याचा मानिसी संदेह ॥१॥
उदकावरील तरंग । तैसे दिसे सर्व जग ॥२॥
पाहतां मृगज्ळा । जळ नोहेची निर्मळा ॥३॥
साउली अभ्राची । वायां जाय जैसी ॥४॥
करितां लवण पुतळा । विरे जैसा मिलतां जळा ॥५॥
एका जनार्दनीं तैसें । दिसतां देह नासे जैसें ॥६॥

अभंग २९२१

असत्याचें मूळ नरदेह साचें

असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक ॥१॥
हरिनाम सार सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण वायां ॥२॥
एका जनार्दनीं मृगजळ वोखटें । दिसें तें गोमटें तृषा न हारे ॥३॥

अभंग २९२२

जाणतां जाणतां कां रे वेडा होसी

जाणतां जाणतां कां रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसीं हांव भरी ॥१॥
दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची थोरी मानितोसी ॥२॥
दिवसांची छाया पुर्व पश्चिमेसी । तैशी या देहाची स्थिती जाणा ॥३॥
एका जनार्दनीं हरिकृपेंवीण । दावील ही खूण कोण बापा ॥४॥

अभंग २९२३

देहींच्या अवसाना

देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा ॥१॥
हे तो मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥
तुजसाठीं शोक । कोण्ही न करतीच दुःख ॥३॥
रडती पडती । पुढें कैसें होईल म्हणती ॥४॥
आपुलीया हिता । रडती जना देखतां ॥५॥
याचे मानूं नको खरें । एका जनार्दनीं त्वरें ॥६॥

अभंग २९२४

नका करुं वाद विवाद पसारा

नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥
आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥
स्वजन स्वगोत्र न ये कोणी कामा । सांडी त्यांचा प्रेमा परता होई ॥३॥
एका जनार्दनीं मधाचिये मासी । तैसा सांपडसी यमफांशी कोण सोडी ॥४॥

अभंग २९२५

कां रे भांबावसी नास्तिकासाठीं

कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां ॥१॥
हें तों पोसणें आणिलें उसणें । जयाचें तया देणें अनायासें ॥२॥
‘घ्यावें त्याचें द्यावे’ ऐशी आहे नीत । तूं रे दुश्चित वाउगा मनीं ॥३॥
न देतां उरी देणें आहे केव्हां । वाउगा तो हेवा धरती पोटीं ॥४॥
एका जनार्दनीं भरता मापोडी । पडतसे उडी खालीं मग ॥५॥

अभंग २९२६

आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध

आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥
आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥
आशेपाशीं याती आशेपाशीं जाती । आशेपाशीं वस्ती अहंकाराची ॥३॥
एका जनार्दनीं निराशी तो धन्य । ज्यासी नारायण सांभाळिता ॥४॥

अभंग २९२७

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‌वैरी तत्पर हेचि येथें ॥१॥
क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण । षडऊर्मी पूर्ण देहीं हेंची ॥२॥
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजीं ॥३॥
एका जनार्दनीं त्यजोनि अठरा । तोचि संसारामाजीं शुद्ध ॥४॥

अभंग २९२८

अस्थिमांसाचा हा कोथला

अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥
प्राणी म्हणती माझें माझें । खर जैसे वाहे वोझें ॥२॥
न कंटाळे कधीं मन । जेवीं भुलें सर्प जाण ॥३॥
एका जनार्दनीं देवा । याचा विसर पाडावा ॥४॥

अभंग २९२९

मिळती सख्या माया बहिणी

मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥
जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
नासिल्या शरीरांतें । टाकिताती तया परते ॥३॥
पहा देहीं देव असतां । नाहीं म्हणती सर्वथा ॥४॥
एका जनार्दनीं पंचत्व । मग म्हणती भूतभुत ॥५॥

अभंग २९३०

देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें

देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं ॥१॥
देहीं देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वतां वाव सर्व ॥२॥
देहीं देहपण मी मी माझें म्हणे । मिथ्या सर्व जाणे देहांअंतीं ॥३॥
एका जनार्दनीं मिथ्या देह आहे । रामनाम बा हे सबराभरीत ॥४॥

अभंग २९३१

म्हणती नरदेह पावन

म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥
योनिद्वारें ज्याचें जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥
जंव जन्मलेंचि नाहीं । तंव तें मरण लागलें पाहीं ॥३॥
गर्भाच्याही ठायीं भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं मरण । तेथें नाहीं जनन येणें जाणें ॥५॥

अभंग २९३२

स्वप्नामाजीं बंधन

स्वप्नामाजीं बंधन । जागृति पाहतां लटिकें स्वप्न ॥१॥
ऐशी जाणा देहस्थिती । जागृति स्वप्न तें भास चित्तीं ॥२॥
जागृति धरितां भाव । स्वप्नीं दिसे तो प्रकाश ॥३॥
जागृति स्वप्न दोन्हीं पाहीं । एका जनार्दनीं पायीं ॥४॥

अभंग २९३३

स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा

स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥
तया सोडविण्या हरी । धांव घेतसे झडकरी ॥२॥
पाहे स्वप्नाचेनि कांतें । अनिरुद्धा केलेसे निरुतें ॥३॥
स्वप्नेंचि देखे सारा । एका जनार्दनीं पसारा ॥४॥

अभंग २९३४

मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान

मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥
पुढें जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥
चौर्‍यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥
ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥
होतां विषयीं वासना । नाठवीची एका जनार्दना ॥५॥

अभंग २९३५

आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं

आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर ॥१॥
उमजोनी उमजोनी झाकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख ॥२॥
मरणाचे हावे एकमेकां बोलती । गेला गेला म्हणती असोनी जवळी ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे ते अंध । भुलले मतिमंद भ्रांतियोगें ॥४॥

अभंग २९३६

उलट भावना पालट मनाची

उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥
होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥
आणिलें जयाचें तें देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥
एका जनार्दनीं वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥

अभंग २९३७

धरिसी देहाची तूं आशा

धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील ॥१॥
सोडविता नाहीं नाहीं कोण्ही । पाहें विचारुनी मनामाजी ॥२॥
येती तैसे सवेंचि जाती । व्यर्थ कुंथती माझें माझें ॥३॥
एका जनार्दनीं पैलपार । तरसी निर्धार विठ्ठलनामें ॥४॥

अभंग २९३८

वायांची आयुष्य जातसे खरें

वायांची आयुष्य जातसे खरें । उपाय तो बरें हरी एक ॥१॥
अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवुं ॥२॥
जे जे घडी जे जे वेळीं । करा कल्लोळीं हरिकथा ॥३॥
शरण एका जनार्दनीं । भजा अनुदिनें संतासीं ॥४॥

अभंग २९३९

देहाची ममता न धरी साचार

देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी ॥१॥
भरिला भरिला सागर भरिला । उतरीं का रे वाहिला संतसंगे ॥२॥
नामाची सांगडी बांधीत निर्धारें । तेणें पैलपार तरसी देखा ॥३॥
सांगड नामाची धरी प्रेमभावें । संता शरण जावें एकविधा ॥४॥

अभंग २९४०

नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें

नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं ॥१॥
ऐसें जें अभागी पावती पतनीं । तया सोडवणी कोण करी ॥२॥
एका जनार्दनीं मानी हा विचार । राम चराचर जप करी ॥३॥

अभंग २९४१

हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज

हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥
अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥
पूर्व सुकृताचें फळ तें पदरीं । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥
एका जनार्दनीं वाया जातो काळ । कांहीं तरी गोपाळ आठव वेगें ॥४॥
प्रपंच

अभंग २९४२

प्रपंची गुंतती

प्रपंची गुंतती । बळें माझें माझें म्हणती ॥१॥
ऐसें अभागी ते खर । नेणे विचार सारासार ॥२॥
चिखले रुतती । आणिकातें धांवा म्हणती ॥३॥
बळें कृशान पदरीं । बांधिताती दुराचारी ॥४॥
कुंथाकुंथी बळे । यम मारितसे सळें ॥५॥
शरण जनार्दना । कोण्हा नोहेचि वासना ॥६॥
जनार्दनाचा एका । बोल बोलतसे देखा ॥७॥

अभंग २९४३

प्रपंचाचा भाव वाहतसे खर

प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥
गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥
टाळी लावूनियां बैसलासे बक । तैसाचि तो देख नामहीन ॥३॥
आवडीं आदरें न ये नाम मुखीं । एका जनार्दनीं सुखी केवीं होय ॥४॥

अभंग २९४४

न कळेची मूढा सुखाची ती गोडी

न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची ॥१॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥
शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा । पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं भाव खरा । तया त्या पामरा सांगुनी काय ॥४॥

अभंग २९४५

भासतसे दोर विखाराचे परी

भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥
भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल कां हे ॥२॥
श्वानाचियेपरी मागें पुढें पाहे । माझा म्हणोनी बाह्मा कवटाळिती ॥३॥
एका जनार्दनें अवकाळीं मेघ । तैसा प्रपंची दंभ लटिकाची ॥४॥

अभंग २९४६

प्रपंच आमिष गुंतशील गळीं

प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया ॥१॥
स्त्री पुत्र धन हें केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥
पुढील विचार धरी कांहीं सोय । संतसंग लाहें अरे मुढा ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥

अभंग २९४७

बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले

बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥
प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥
तुज सुख दुःख मागील आठव । आतां भाकी कींव कांहीं रया ॥३॥
एका जनार्दनी अहा रांदलेका । भोगिसी अनेका योनी रया ॥४॥

अभंग २९४८

जाणते नेणते दोघेही गुंतती

जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया ॥१॥
प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥
वोढाळ सांपडतां बांधिती दावणी । कोण करुणावचनीं सोडी रया ॥३॥
एका जनार्दनीं करितां प्रयाणा । नाहीं ती करुणा यमासी ॥४॥

अभंग २९४९

ऐशी प्रपंचाची गोडी

ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥
नाहीं तया कांहीं धाक । जन्ममरणाचा देख ॥२॥
आलिया देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥
जरा आलिया निकटी । करी प्रपंचाची राहटी ॥४॥
एका जनार्दनीं शरण । नायकती मूर्ख जन ॥५॥

अभंग २९५०

दीपाचिया अंगसंगा

दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥
दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥
एका निमाले देखतो । दुजा उडी घाली अवचितीं ॥३॥
ऐशी भुललीं बापुडीं । एका जनार्दनीं धरूनि गोडी ॥४॥

अभंग २९५१

काळ आला रे जवळी

काळ आला रे जवळी । वाचे जपें नामावळी ॥१॥
अंतकाळीं जाण । तुज होईल बंधन ॥२॥
नको गुंतूं संसारा । चुकवी जन्ममरण फेरा ॥३॥
कोनी कोणाचे न सांगाती । अवघे सुखाचेच होती ॥४॥
एका जनार्दनीं शरण । कायावचामनें जाण ॥५॥

अभंग २९५२

संसार पसर करिसी तळमळ

संसार पसर करिसी तळमळ । कां रे घननीळ नाठवीसी ॥१॥
पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझें माझें म्हणती ॥२॥
लटिका प्रपंच सर्व नाशिवंत । एक हे शाश्वत हरिनाम ॥३॥
म्हणे जनार्दन एकनाथ घेईं । प्रमसुख पाहीं पावशील ॥४॥

अभंग २९५३

अवघे सुखाचे सांगाती

अवघे सुखाचे सांगाती । दुःख देखतां पळती ॥१॥
सुख देखोनि म्हणती माझें । दुःख देखतां पळती वोजें ॥२॥
यापरि अवघे लटिकें देख । एका जनार्दन पाहे सुख ॥३॥

अभंग २९५४

नरदेहा येऊनि गमावी आयुष्य

नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामीं ॥१॥
अंतकाळीं तया कोणी न ये कामा । वाउगाचि श्रमा पडतो डोहीं ॥२॥
माझें माझें म्हणोनियां कवटाळीती बाहीं । प्रपंचप्रवाहीं धांव घाली ॥३॥
एका जनार्दनीं करितां कल्पना गेलासे पतना यमलोंकी ॥४॥

अभंग २९५५

कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी

कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥
वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय दुःख रया ॥२॥
सुख दुःखें दोन्ही भातुकी असती । प्रपंचाचे अंतीं भोगिसी रया ॥३॥
रामनाम वाचे वाचे सदा गात जाय । न धरीं तूं हाय वाउगी रया ॥४॥
एका जनार्दनीं किती सांगुं मूढा । वायां तूं दगडा भूमीभार ॥५॥

अभंग २९५६

कां रें हावभरी जाहालसी पामरा

कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥
नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटलें जन्माचें दुःख जाण ॥२॥
यातना यमाची दुःखाची परवडी । नामें धरी गोडी आवडीनें ॥३॥
एका जनार्दनीं नायकसीं मूढा । अहा रे दगड धर्मलंडा ॥४॥

अभंग २९५७

भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत

भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथें ॥१॥
प्रपंचकर्दमीं बुडोनियां ठेले । संताविण उगले फजीत होती ॥२॥
पुत्र मित्र कांता मानुनी भरंवसा । याचा मोह खासा जन्मवरी ॥३॥
एका जनार्दनीं अंतीं आहे कोण । न कळे संताविण निश्चयेंसी ॥४॥

अभंग २९५८

नवल देखिलें संसाराचेंक बंड

नवल देखिलें संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती ॥१॥
गुंतलेचि बळें चिखलें माखलें । कर्मा जन्मफळें भोगिताती ॥२॥
नाथिला पसारा मानिती वो साचा । वेध तो तयाचा वागविती ॥३॥
एका जनार्दनीं नाडलेसे मोहें । संदेह संदेह गोवियलें ॥४॥

अभंग २९५९

वाउगाची पसारा

वाउगाची पसारा । कां रे वाढविला गव्हारा ॥१॥
म्हणसी माझें माझें । अंती कोण आहे तुझें ॥२॥
भुललासी वायां । गमाविसी व्यर्थ काया ॥३॥
कोण हें कोणाचें । एका जनार्दनीं साचें ॥४॥

अभंग २९६०

वाउगाचि शीण करिसी सर्वथा

वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण ॥१॥
किती करिसी सोस माझें माझें म्हणोनि । शेवटीं बंधनीं पडसी मूढा ॥२॥
अंतकाळीं कोणी नाही रे सांगाती । होईल फजिती तुझी तुला ॥३॥
एका जनार्दनीं वाउगाचि धंदा । त्यजुनी गोविंदा सेवी बापा ॥४॥

अभंग २९६१

उपजोनि प्राणी गुंतला संसारीं

उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥
न कळे पामरा नरकाचें तूं मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥
नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोढावोढी होईल रया ॥३॥
न कळे तयासी जाहला बुद्धिहीन । माझें माझें कवळोन रडे रया ॥४॥
एका जनार्दनीं अभागी पामर । भोगितीक अघोर नरक रया ॥५॥

अभंग २९६२

दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी

दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥
कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥
वारितां नायके भ्रमलासे कीर । सांपडे सत्वर पारधीया ॥३॥
एका जनार्दनीं यामाचीया फांसां । पडेल तो सहसा न कळे मुढा ॥४॥

अभंग २९६३

सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं

सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥
सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥
रिघतां सदगुरुसी शरण । तैसें निरसे जन्ममरण ॥३॥
संसार सर्प मिथ्या देहीं । एका जनार्दनीं सदा ध्याई ॥४॥

अभंग २९६४

अशाश्वत देह जाईल जाईल

अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो ॥१॥
न ये मुखीं कदा श्रीरामचरित्र । वायांचि पैं वक्त्र जल्पे सदा ॥२॥
दिननिशीं कारी संसाराचा धंदा । नाठवी गोविंदा मूढ कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं अभागी तो खरा । तपाच्या डोंगरा हांव धरी ॥४॥

अभंग २९६५

भजन करितां लाजतो पामर

भजन करितां लाजतो पामर । संसारीं चित्त स्थिर सदा वाहे ॥१॥
तीर्थयात्रे जाये संसार चिंता वाहे । पुराण कीर्तनीये निद्रा बळें ॥२॥
ऐसा तो पापिष्ठ कर्म तें सबळ । एका जनार्दनीं म्हणें दोषी अमंगळ ॥३॥

अभंग २९६६

मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं

मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची ॥१॥
वाउगाची सोस रचिलिया कंद । झाडुनि नेतां वेध मक्षिकेसी ॥२॥
एका जनार्दनीं विचारी मानसीं । वायां भवपाशीं गुंतुं नको ॥३॥

अभंग २९६७

पाहतो देखतो कानीं जें ऐकतो

पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं ॥१॥
मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥
दानधर्म कांहीं न वेंचे आडका । रुक्यासाठीं थडका घेत असे ॥३॥
एका जनार्दनीं संसारावेगळा । कैं मी गोपाळा होईल साचा ॥४॥

अभंग २९६८

भरला तो हावे म्हणे माझें माझें

भरला तो हावे म्हणे माझें माझें । वाहतसें ओझें संसाराचें ॥१॥
कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्ठीं वाहे ॥२॥
न मिळेचि अन्न बहुत आपदा । परी त्या गोविंदा स्मरेचिना ॥३॥
ऐसे जन्मोनियां दास संसाराचे । एका जनार्दनीं त्याचें तोंड काळें ॥४॥

अभंग २९६९

न कळे पामरा कांहीं हा विचार

न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥
मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावें वेरझारी ॥२॥
एका जनार्दनीं न मानी विश्वास । दृढ धरी पाश संसाराचा ॥३॥

अभंग २९७०

पाहतां पाहतां नेत्र गेले

पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥
जाऊनि धरितो माझें म्हणोनियां । परी तें वायां जाती सर्व ॥२॥
विषय भोगितो गर्दभाचे रितीं । लाभ तो निश्चिती लत्ताप्रहर ॥३॥
एका जनार्दनीं मंडुकाचे परी । वटवट खरी संसारीं ते ॥४॥

अभंग २९७१

पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे

पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी ॥१॥
वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें विंदान भुलला वायां ॥२॥
मर्कटासो जेवीं मदिरा पाजिली । भूतबाधा झाली तयावरी ॥३॥
सैरावैरा नाचे कोण तया हासे । एका जनार्दनीं तैसें मनुष्यदेहीं ॥४॥

अभंग २९७२

अवघें आयुष्य काळाधीन जाहलें

अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतलें संसारांत ॥१॥
सापें दर्दूर गिळियेला मुखीं । तेणेंचि तो शेखीं मक्षिका धरी ॥२॥
ऐसे हावभरी प्राणी पैं नाडले । म्हणती माझे वहिले कन्यापुत्र ॥३॥
एका जनार्दनीं मृगजळाची आशा । पडे तेणें फांसा गळां बळें ॥४॥

अभंग २९७३

काय सुख आहे संसारीं

काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥
जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥
ऐसा भार वाही खर । परितया न कळे साचार । आहे पुढें यातना अघोर । हें कांहीं नाठवीं ॥३॥
ऐसें होतां भरलें आयुष्य । मृत्युं पुन्हां येत जन्मास । ऐशा भोगी चौर्‍यांयशी निःशेष । एका जनार्दनीं म्हणे त्यास लाज नाहीं ॥४॥

अभंग २९७४

अशाश्वतासाठीं

अशाश्वतासाठीं । कां रें देवासवें तुटीं ॥१॥
अंतकाळींचें बंधन । कोण निवारी पतन ॥२॥
तूं म्हणसी हें माझें । खरा ऐसें वाहसी वोझें ॥३॥
पावलिया अवसानीं । कोणी नाहीं बा निर्वाणीं ॥४॥
याचा न धरी विश्वास । एका जनार्दनाचा दास ॥५॥

अभंग २९७५

उघडा अनुभव असोनिया देहीं

उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥
संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥
भ्रमतां भ्रमतां नयेचि बाहेरी । चौर्‍यांयशी फेरी पुनः पुनः ॥३॥
एका जनार्दनीं नको हा विचार । वायां फजितखोर हाशी बापा ॥४॥

अभंग २९७६

नेणतां नेणतां कां रे अंध होशी

नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें ॥१॥
तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझें म्हणुनी ॥२॥
रहाट माळ जैसी जात येत वरी । तैशीच ये परी जन्म देहीं ॥३॥
एका जनार्दनीं करी कां विचार । वायां हांवभर फिरूं नको ॥४॥

अभंग २९७७

गुंतला सर्प भुलला नादा

गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥
सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मीं ॥२॥
नळिका यंत्रामाजीं सांपडे वानर । संसारीं तो नर तैसा गुंते ॥३॥
एका जनार्दनीं करितां नाना युक्ति । मागें ही फजिती पुढें होती ॥४॥

अभंग २९७८

कासयासी मूढा करिती संसार

कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे ॥१॥
बळेंचि कां रे नागवासी पाहतां । विषयभोग भोगितां दुःख बहु ॥२॥
पातकाची राशी हे तो कन्यापुत्र । तूं कां रे पवित्र त्यांसी म्हणसी ॥३॥
एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी पाडितोसी ॥४॥

अभंग २९७९

वायांचि भुली पडली गव्हारा

वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥
कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥
गुंतुनी पडसी वाउग्या व्यसनीं । संसार घसणीं चौर्‍यांयशींच्या ॥३॥
एका जनार्दनीं किती हें सांगावें । जाणत जाणत नागवे निलाजिरा ॥४॥

अभंग २९८०

आमिश लाउनी मीनातें गोविती

आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥
पाहती डोळां देखती प्रकार । परि विषयाचा आदर न सांडिती ॥३॥
माझें माझें म्हणोनि दृढ धरिताती । एका जनार्दनीं भोगिती चौर्‍यायंशीं ॥४॥

अभंग २९८१

संसाराचें सुख कोण पैं सांगती

संसाराचें सुख कोण पैं सांगती । होत फजिती लहानथोरां ॥१॥
सर्पें मंडुक धारिला से मुखीं । तेणें पैं शेखीं मक्षिका धरी ॥२॥
मरती बापुडी हाव धरती गोडी । तरी तीं वेंडीं नागवती ॥३॥
एका जनार्दनें न धरी सोय । वायांचि धांवो जाय हांव भरी ॥४॥

अभंग २९८२

काय ऐसा यासी मानला विचार

काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥
बुडतां देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळें होती ॥२॥
सायांसें शिणती माझें म्हणोनियां । एका जनार्दनीं वायां जाती हीन ॥३॥

अभंग २९८३

मक्षिकेनें जैसा रचियेला कंद

मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाचि वेध तैशापरी ॥१॥
आणिकें झाडितां गुंतोनि पडती । तैशी ही फजिती संसाराची ॥२॥
एका जनार्दनीं कृपा न करी देव । तोंवरी अभाव सर्व जाणा ॥३॥

अभंग २९८४

स्वप्नवत संसार माना हा निर्धार आशाश्वत्र जाणार छाया जैसी

स्वप्नवत संसार माना हा निर्धार आशाश्वत्र जाणार छाया जैसी ॥१॥
मृगजळ नाथिलें दिसतसे जळ । पाहा हो प्रबळ पटळ मेघ जैसे ॥२॥
एका जनार्दनीं वाउगा आभास । देवाविण सौरस वाउगा भासे ॥३॥

अभंग २९८५

वाउगाची सोस वाहताती वोझें

वाउगाची सोस वाहताती वोझें । म्हणती माझें माझें हीन भाग्य ॥१॥
जाणती नेणती राहाटी देखती । मरती रडती देखती त्या ॥२॥
एका जनार्दनीं भुलले ते वायां । परि देवराया शरण न जाती ॥३॥

अभंग २९८६

धरसी संसारासी हांव

धरसी संसारासी हांव । माझें माझें म्हणशी सर्व । हें तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥
आयुष्यमान जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म । अंतकाळीं जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म ॥२॥
तुज जे म्हणती उत्तम । त्यांचा तुज मोठा भ्रम । अंतकांळीं पावशी श्रम । एकलाचि पामरा ॥३॥
म्हणोनि सर्व भावें हरी । स्मरण करी निरंतरीं । एका जनार्दनीं निर्धारी । नाम स्मरे वेळोवेळां ॥४॥

अभंग २९८७

छाया पैं वृक्षाची बैसतां सुख

छाया पैं वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख प्राणिमात्रां ॥१॥
गुंडती बळें गुंडती बळें । माझें माझें सळें काळतोंडें ॥२॥
असतां बरवी करिती आणिक सेवा । आवडली या देवा धांवे म्हणती ॥३॥
ऐसा काळतोंडा जनीं जाला वेडा । एका जनार्दनीं रेडा पशुजन्मीं ॥४॥

अभंग २९८८

सुखवोनि पतंग दीपावरी पडे

सुखवोनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटीं जोडे देह अंत ॥१॥
तैसे प्राणिमात्र संसारीं भुलले । कष्ट ते उगले करिताती ॥२॥
भिलाव्याचें परी प्रपंच गोमटा । परी काढी चपेटा अंतरींचा ॥३॥
एका जनार्दनीं भुलले पामर । वायां नरक घोर भोगिताती ॥४॥

अभंग २९८९

मिथ्या हा संसार

मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥
स्त्रिया पत्रधन । हें तों सर्व मायिक जाण ॥२॥
यांत गुंतुं नको नरा । न करी आयुष्य मातेरा ॥३॥
वाचे वदे हरिहर । करी ध्यान निरंतर ॥४॥
एका जनार्दनीं नरा । नित्य भजे हरिहरा ॥५॥

अभंग २९९०

कोणाचें घरदार मृगजळ संसार

कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा ॥१॥
सोयरा तूं देव करी पां संसारीं । वायां हाव भरी होऊं नको ॥२॥
द्वैत अद्वैत टाकुनी परता । होई पां सरता देवापायीं ॥३॥
एका जनार्दनीं देवाविण तुज । राखील पां सहज कोण दुजा ॥४॥

अभंग २९९१

कोण हरी आतां संसाराचा छंद

कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥
शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥
तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिंपुटी होती मूढ ॥३॥
एका जनार्दनीं संसाराचा छंद । टाकुनी गोविंद भजे कां रे ॥४॥

अभंग २९९२

संसारासागरी बुडालिया प्राणी

संसारासागरी बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ॥१॥
अविद्यादि पंच क्लेश हे तरंग । बुडालें सर्वांग प्राणियाचें ॥२॥
भ्रमाच्या आवर्तामाजीं सांपडला । सोडवी तयाला कोण आतां ॥३॥
स्त्रियापुत्र आप्त बंधु हे सोयरे । ओढताती सारे मत्स्या ऐसीं ॥४॥
प्रपंच या कामें पसरिलें आलें । त्यामाजीं गुंतलें प्राणिजात ॥५॥
एका जनार्दनीं उच्चारील नाम । सुखाचा आराम प्राप्त होय ॥६॥

अभंग २९९३

फट गाढवाच्या लेका

फट गाढवाच्या लेका । संसार केला फूका ॥ध्रु०॥
खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ॥१॥
कैंचा आपा कैंचा बापा मामा काका । कैंची आई कैंची ताई कैंची बहिण आका ॥२॥
कैंचें घर कैंचें दार भुललासी फुका । कैंची सासू कैंची बाईल त्यांनी नेला पैका ॥३॥
बारा सोळा मुलें झालीं त्यांला झालें नातु । द्रव्य होतें तें सरुनी गेलें कंबरेवर हातु ॥४॥
एका जनार्दनीं म्हणे हा संसार खोटा । हरिस्मरण करा कधीं न ये तोटा ॥५॥

अभंग २९९४

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु

किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥
जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥
पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥
स्वप्नामाजीं नेणें परमार्थ मानसीं । सदा चौर्‍यांयंशी फेरे भोगी ॥४॥
एका जनर्दनीं नोहेंचि सुटिका । भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥

अभंग २९९५

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥
पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥
जीवीं जीवपण शिवीं शीवपण । वेगळें तें जाण दोन्हीं होती ॥३॥
यातना अनंत तुज भोगविती । तेथें काकुळती कोणा येशी ॥४॥
यमाचे ते दूत मारिती पामरा । कां रे संसारा न चुकशी ॥५॥
एका जनार्दनीं सांगतो विचार । रामनामें परिकर जप करी ॥६॥

अभंग २९९६

संसारीं तरले बोलती ते कुडे

संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥
नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसें ॥२॥
न तरती भवसागरीं बुडती हव्यासें । लागतसे पिसें धन आशा ॥३॥
एका जनार्दनीं आशा हे सांडोनी । गोविंद चरणी मिठी घाला ॥४॥

अभंग २९९७

आपुले पारखे सांगतां नायकती

आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥
काय संसाराचें सुख तें तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥
कधीं रामनाम नाठवी पामर । भोगिती अघोर जन्म कोटी ॥३॥
एका जनार्दनीं एकपणें शरण । जनीं जनार्दनीं आम्हां आहे ॥४॥

अभंग २९९८

देह नाशिवंत अभ्राची साउली

देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥
जळगारीं जैसें उदक नाथिलें । कां मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥
परुषाची छाया वाउगाचि भास । चोराचा पैं लेश काय तेथें ॥३॥
रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एका जनार्दनीं दर्प संसाराचा ॥४॥

अभंग २९९९

वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी

वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥
संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळां खेपा कराव्या त्या ॥२॥
मरावें जन्मावें मरावें जन्मावें । खंडन केव्हां व्हावें न धरा शुद्धी ॥३॥
एका जनार्दनीं किती तें सांगावें । नायकर्ता हावे भरले जीव ॥४॥

अभंग ३०००

जे आसक्त संसारीं

जे आसक्त संसारीं । ते अघोरीं पडती ॥१॥
तयां नाहीं सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥
त्याचे चरण धरा चित्तीं । मग भीति कासया ॥३॥
एका जनार्दनीं शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥