वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग २८०१ ते २९००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग २८०१ ते २९००

अभंग २८०१

नाही नामासी साधन

नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥
काया कष्ट नको कांहीं । देश विदेशासी न जाई निवांतची ठायीं । बैसोनिया जपे ॥२॥
नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एका जनार्दनीं नाश । नको करूं शरीराचा ॥३॥

अभंग २८०२

स्नान दानाचें एक फळ

स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥
धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥
नाम त्रिभुवनीं साजिरें । नाम पावन गोजिरें । एक जनार्दनीं निर्धारें । सांगें ब्राह्मा उभारूनी ॥३॥

अभंग २८०३

जप जाप्य तप नको अनुष्ठान

जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥
नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतुं नको ॥२॥
नको आत्मस्थिती नको ब्रह्माज्ञान । नको अष्टांग साधन नको वायां ॥३॥
नको यंत्रमंत्र नको रे कल्पना । भ्रांती भूली जाणा नको नको ॥४॥
नको तूं करूं सायास धरी पा विश्वास । एका जनार्दनीं पाहें डोळां ॥५॥

अभंग २८०४

ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा

ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥
करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥
एका जनार्दनीं तयाचें बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मा ॥३॥

अभंग २८०५

न लगे न लगे जीवाचा तो नाश

न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं ॥१॥
पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांहीं ॥२॥
सुखें वाजवा टाळी मुखीं नामघोष । पातकांचा नाश कल्पकोडी ॥३॥
एकाजनार्दनीं नाम एक समर्थ । तेणें स्वार्थ पुरे सर्व जीवां ॥४॥

अभंग २८०६

जों जों धरसी वासना

जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥
हेंचि सर्व साधनांचें सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपायीं ॥२॥
नको योगयाग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणें न धाये माप । जन्मजरा मृत्युचे ॥३॥
नको पडूं याचे भरी । वाचे म्हणे कृष्ण हरी । एका जनार्दनीं निर्धारी । निष्पाप होसी तूं ॥४॥

अभंग २८०७

नको करुं कर्माकर्म

नको करुं कर्माकर्म । तुम्हां सांगतों मी वर्म । श्रीरामाचें नाम । अट्टाहास्यें उच्चारा ॥१॥
तेणें तुटेल उपाधी । निरसेल भेदबुद्धी । होईल सत्वशुद्धी । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥
त्रिविधतापांचें दहन । कामक्रोधांचें नाशन । होईल प्रसन्न । चित्त रामप्रसादें ॥३॥
एका जनार्दनीं नेम । नित्य वाचे रामनाम । कैवल्याचें धाम । प्राप्त होय तत्काळ ॥४॥

अभंग २८०८

साधावया स्वरुपसिद्धी

साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥
धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥
घेतां नाम धांवे विठ्ठल । नको तप नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपाळु दीनांचा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । भक्तीस तुष्टें नारायन । त्यांचे करितां चिंतन । आपोआप येतसे ॥४॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती

वेदोपासक – ब्राह्मण – ब्रह्मकर्म- पूजा – योग- समाधि- उपदेश.

समाधी योग
अभंग २८०९

गुरु जनार्दन सांगे राममंत्र

गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥
जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥
ब्राह्मणाचें तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ॥३॥
ब्राह्मणाचें तीथ ज्या नर मस्तकीं । सायुज्यता मुक्ति पायां लागे ॥४॥
एका जनार्दनीं मुक्ति हे तो वाव । भजा हे भूदेव कोटी जन्मीं ॥५॥

अभंग २८१०

जनार्दनें आम्हां सांगितलें गुज

जनार्दनें आम्हां सांगितलें गुज । पूजावे हे द्विज आवडीनें ॥१॥
मुखीं ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव जाण भावूं नको ॥२॥
भाविकांहि भिन्न तयासी दंडिती ।रवरव भोगिती कुळांसहित ॥३॥
एका जनार्दनीं ब्राह्मणांची पूजा । चुकवील खेपा संसारींच्या ॥४॥

अभंग २८११

ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा

ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा । येरव्ही राहे उगा थोटावला ॥१॥
ब्राह्मण तो ब्रह्मा ब्राह्मण तो ब्रह्मा । जयाचेनि कर्माकर्म दाटुगें जगीं ॥२॥
ब्रह्मावाक्याची राणीव तैं शास्त्राची जाणीव । येरव्हीं नुसतें पवे पाषाणाचें ॥३॥
ब्राह्मण वचनार्थ यागकर्म समर्थ । येरव्ही ते समस्त जीत ना मेली ॥४॥
जिवाचें जीवपण शिवाचें शिवपण । याहुनी ब्रह्मापुर्ण ब्राह्मणक वाक्य ॥५॥
पाठ नाहीं पोट नाहीं ब्रह्मा ते निघाट । हाही अनुभव स्पष्ट ब्राह्मणवचनें ॥६॥
ब्रह्मा तें निर्मळ संसार तो मृगजळ । हेंही होय विव्हळ ब्राह्मणवचनें ॥७॥
एका जनार्दनीं ब्राह्मण पूर्ण बोधु । जाणे तया बाधूं न शके कर्माकर्म ॥८॥

अभंग २८१२

शम दम तप शौच आणि क्षमा

शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥
आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसें ॥२॥
ब्राह्मणाच्या ठायीं गुण शुद्ध सत्त्व । वसे ब्रह्मातत्त्व तया चित्तीं ॥३॥
सर्वांभुतीं दया असे तयापाशीं । विटला उपाधीसी सर्वभावें ॥४॥
एकाजनार्दनीं ऐसे हे ब्राह्मण । तयांचे चरण नित्य वंदूं ॥५॥

अभंग २८१३

ब्राह्मणा स्वधर्मक नित्य नैमित्तिक

ब्राह्मणा स्वधर्मक नित्य नैमित्तिक । व्हावे उपासक वेदांलांगीं ॥१॥
स्नानसंध्या वंदन हेंचि नित्य कर्म । तैसेचि हें वर्म पितृतृप्ति ॥२॥
ब्रह्मायज्ञ आणि अग्नीची ते पूजा । तेणें अधोक्षजा पाविजेत ॥३॥
अतिथी आलिया तया अन्नदान । करावें तर्पण द्रव्ययोगें ॥४॥
भूतदया गाई पशूतें पाळावें । मुखीं उच्चारावें रामनाम ॥५॥
एका जनार्दनीं हेंचि कम नित्य । तेणें परब्रह्मा हातां चढे ॥६॥

अभंग २८१४

तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें

तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥
संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणें लागे ॥२॥
एकादशी शिवरात्री प्रदोषादि । रामजयंत्यादि नाना पर्वे ॥३॥
नैमित्तिक ऐसेंक तयासी म्हणती । त्यायोगें पावती आत्मतत्वीं ॥४॥
एका जनार्दनीं यातें आचराल । तरीच पावाल चित्तशुद्धी ॥५॥

अभंग २८१५

नित्य कर्माचें लक्षण

नित्य कर्माचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण ॥१॥
ब्रह्मायज्ञ देवपूजा । करावी त्या अधोक्षजा ॥२॥
वैश्वदेव अतिथी पूजन । आचारांवें नित्य जाण ॥३॥
एका जनार्दनीं कर्म । तेंचि जाणा परब्रह्म ॥४॥

अभंग २८१६

ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती

ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥
ब्राह्मण तयासी म्हणावे । त्याचे पायीं लीन व्हावें ॥२॥
गळां घालोनि सूत्रदोरी । म्हणविती ब्रह्माचारी ॥३॥
परी ब्रह्मा नाहीं ठावें । लोकां सांगतसे भावें ॥४॥
एका जनार्दनीं पूर्ण । ब्रह्मा जाणे तो ब्राह्मण ॥५॥

अभंग २८१७

कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म

कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥
धरिलें नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेलें ॥२॥
डोळिया वंदना स्वीकारिले कान । तेथें वर्म कोण नेणवेची ॥३॥
हृदयावरी हात नाभीस लाउनी । डोळे ते झाकुनी नाश केला ॥४॥
करी प्रदक्षिणा गुरु गुह्माविण । व्यर्थ केला शीण वायां तो ॥५॥
वेळ चुकवुनी संध्या करी भलते वेळे । केलें अमंगळ ब्रह्माकर्म ॥६॥
फिरवितो मणी बुटबुटा ते होट । अजप तो कोठें स्थान नेणे ॥७॥
नेणे तो आचाट करी वेडेचार । काय तो गव्हार संध्या जाणे ॥८॥
एका जनार्दनीं चुकविला नेम । काय पशु अधम जन्मा आले ॥९॥

अभंग २८१८

असोनि ब्राह्मण

असोनि ब्राह्मण । न करी जो संध्या स्नान ॥१॥
तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
वेदमंत्र न ये मुखा । सदा द्वेष निंदा देखा ॥३॥
नाहें श्राद्धसंकल्प घरीं । हिंडें सदा दारोदारीं ॥४॥
हरिनामीं न बैसे चित्त । लोकां पुराण सांगत ॥५॥
ऐसे पामर अभागी । तयांचे दोष कोण भंगी ॥६॥
एका जनार्दनीं नाम । वाचे होऊनी वदा निष्काम ॥७॥

अभंग २८१९

आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण

आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥
आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥
आम्हां सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एका जनार्दनीं बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥

अभंग २८२०

उचित अनुचित कळें तुम्हां

उचित अनुचित कळें तुम्हां । सदैव निर्दैव हासती ॥१॥
ऐशी राहे कर्मगती । वायां फजिती होती जगीं ॥२॥
कर्म सोडीना या नरा । करी आयुष्याचा मातेरा ॥३॥
एका जनार्दनीं निजसार । कर्म हिंडवी गिरिगव्हार ॥४॥

समाधी योग
अभंग २८२१

जें जें कर्म करावें या देहीं

जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥
देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥
आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥
एका जनार्दनीं कर्माची जे रेखा । न चुके सकळिकां भोग त्याचा ॥४॥

अभंग २८२२

विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग

विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय ॥१॥
होणार तें होतें आपुलें न चले कांहीं । वायां दुःख पाहीं मानू नये ॥२॥
जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तों ब्रह्मादिकां न चुकेचि ॥३॥
एका जनार्दनीं वायां कां सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥

अभंग २८२३

सम आणि विषम हीं तो काळाची फळें

सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥
वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥
उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों तें लिगाड होय मग ॥३॥
एका जनार्दनीं हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥

अभंग २८२४

जो कनकबीजें भुलविला

जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला ॥१॥
शुद्धि नाहीं पा देहाचीं । सैरावैरा बोले वाचे ॥२॥
देह अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥
ज्यासी विष चढलें गहन । तया करविती विष्ठापान ॥४॥
एका जनार्दनीं वर्म । हारपे तेणें कर्माकर्म ॥५॥

अभंग २८२५

आतां धर्माधर्म विचार

आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥
शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥
व्याघ्र – नख गज – दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥
पटतंतु स्वयें पुनीत । वायूनें शुद्ध उर्णावस्त्र ॥४॥
गोक्षीर पवित्र कास्यपात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ॥५॥
घृत पवित्र अग्नि संस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्री ॥६॥
वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्मसुखें ॥७॥
पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥
व्याघ्राजिन मृगाजिन । हें स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥
एका जनार्दनीं निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥

अभंग २८२६

गंगोदक तें पवित्र

गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥
दोनीं उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥
गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥
शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥

अभंग २८२७

वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म

वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥१॥
मुख्य चारी वर्ण यांचा पैं धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥२॥
जयां जे जे धर्म तयां तें तें कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥३॥
ब्राह्माणांचा धर्म संध्या षट्‌कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥४॥
शरणागताचें रक्षण क्षत्रियांचा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥५॥
वैश्यांचा धर्म वैव्हारिक कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥६॥
शूद्रांचा धर्म सर्वभावें पूजन । एका जनार्दन तृप्ती तेणें ॥७॥

अभंग २८२८

अधर्में अदृष्टांचें चिन्ह

अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥
भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥
ठक येवोनि एकान्ती । मुलाम्याचें नाणें देती ॥३॥
परचक्र विरोध धाडी । खणीत लावूनी तळघरें फोडी ॥४॥
पाणी भरे पेंवा आंत । तेणें धान्य नासे समस्त ॥५॥
गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचें वाडे ॥६॥
भूमीनिक्षेप करूं जाती । ते आपुल्याकडे धुळी वोढिती ॥७॥
बुद्धी सांगे वाडोवाड । तेथोनी तोंडी घाला दगड ॥८॥
ऐशी कर्माची अधर्म स्थिती । एका जनार्दनीं सोशी फजिती ॥९॥

अभंग २८२९

फणस खातां लागे गोड

फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥
सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे बेलपत्रीं चढे ॥२॥
ऐसा कर्माकर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥
एका जनार्दनीं जाण । वायां दोषाचें हें चिन्ह ॥४॥

अभंग २८३०

जेणें घेतलेंसे विख

जेणें घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख ॥१॥
जें केलें आपुलें आपण । जें भोगितां दुःख कोण ॥२॥
एका जनार्दनीं कर्म । कर्मामाजी घडे वर्म ॥३॥

अभंग २८३१

ज्यासी करणें चित्तशुद्धी

ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥
तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥
चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्त्वतां ॥३॥
चित्त झालिया निश्चळ । सहज राहील तळमळ ॥४॥
एकाजनार्दनीं मन । होय ब्रह्मारूप जाण ॥५॥

अभंग २८३२

जया करणें आत्महित

जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्माप्राप्ति लागीं देख ॥२॥
तींचि नित्य आचरावीं । चित्तशुद्धि तेणें व्हावी ॥३॥
एका जनार्दनीं कर्म । इश भक्तीचें हें वर्म ॥४॥

अभंग २८३३

आलिया द्विजासी द्यावें अन्नदान

आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥
तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥
एका जनार्दनीं घडतां नमस्कार । तेणे हरिहर संतोषती ॥३॥

अभंग २८३४

देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र

देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥१॥
देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥२॥
नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥
एका जनार्दनीं साच नाहीं भाव । संशयची देव नाहीं केला ॥४॥

अभंग २८३५

कर्म धर्म ऐसा आहे

कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहें ॥१॥
स्नान करावें ते कैसें । संध्या आपरुप असे ॥२॥
कैसा आहे ब्रह्मायज्ञ । मन अर्जवा तें नमन ॥३॥
एका जनार्दनीं भजे । कर्म धर्म सहज बुजे ॥४॥

अभंग २८३६

विचारीं पां धडफुडें

विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥
आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥
देह जगत्व न लगे देहीं । अथवा न लगे आत्म्याच्या ठायीं । आतां कर्म तें मिथ्या पाहीं ॥३॥
भ्रमरुप वाढवितां कर्मठपण । ठकलें सज्ञान जन । एका जनार्दनीं कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥

अभंग २८३७

कर्म केवळ देहाच्या माथां

कर्म केवळ देहाच्या माथां । आत्मा देही असोनि विदेहता । शेखीं म्हणती तत्त्वतां । कर्में बांधला आत्मा ॥१॥
आकाश जातां दळे । तैं कर्मीं ब्रह्मा आतळे । कर्म अकर्मा नातळे । परब्रह्मा रया ॥२॥
कर्माचें न कळे वर्म । तंव केवीं फळे परब्रह्मा । म्हणोनि न सोडीं श्रम । साधकासी ॥३॥
कर्माकर्म विवंचना । न कळे पैं सज्ञाना । एका शरण जनार्दना । परि तुझीच कल्पना रया ॥४॥

अभंग २८३८

कर्माच्या पोटीं भ्रम

कर्माच्या पोटीं भ्रम । कीं भ्रमाच्या पोटीं कर्म । हें दोहींचे न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥
घटीं उदक भरिलें । तेणें घटाकाश नव्हे बोले । कर्मीं ब्रह्मा संचलें । कर्मातीत ॥२॥
वाढवितां कर्मभ्रम । न कळे परब्रह्मा । मीमांसक धर्म । अनश्वर ॥३॥
कर्माची कर्मगती । न सोडी पुनरावृत्ति । निशेष कर्म निश्चिती । ब्रह्माप्राप्ती ॥४॥
निष्कर्म लभ्यते सिद्धी । हे कृष्णें उपदेशिलें कृपानिधी । तरी कर्माची कर्मबुद्धी । न सोडी आत्मा ॥५॥
कर्माचें निजकर्म । केवळ परब्रह्मा । एका जनार्दनीं मिथ्या । कर्मश्रम ॥६॥

अभंग २८३९

करूं जातां निजकर्म

करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥१॥
कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं विदेहता ॥२॥
कर्म अकर्माचें सांकडें । कांहीं न घेडी आत्म्याकडे ॥३॥
एका जनार्दनीं कर्म । देहांचे देहीं परब्रह्मा ॥४॥

अभंग २८४०

उदयो अस्तु मावळलें भान

उदयो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥
कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥
उदयो अस्तुभान न देखे समाधान । अवघा जनार्दन जनीं वनीं ॥३॥
एका जनार्दनीं एकपणें कर्म । देहींच देह धर्म एकरूप ॥४॥

अभंग २८४१

वेदवाणी देवें केली

वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली ॥१॥
सकळ वाचा वदवी देव । कां वाढावा अहंभाव ॥२॥
ज्या ज्या वाणी स्तुती केली । ते तीक देवासी पावली ॥३॥
एका जनार्दनीं मातु । वाचा वाचक जगन्नाथु ॥४॥

अभंग २८४२

आब्रह्म भुवन एक

आब्रह्म भुवन एक । तर्पण जाहलें ऐक्य ॥१॥
कैसा होता हे ब्रह्मयज्ञ । ब्रह्मा दृष्टी ब्रह्मार्पण ॥२॥
सव्य अपसव्य न लगे जाण । पितरापितर जनार्दन ॥३॥
एका जानर्दनीं तिलोदक । ब्रह्मरुप तिन्हीं लोक ॥४॥

अभंग २८४३

कर्म करितां फलाशा वाढे

कर्म करितां फलाशा वाढे । तें तें फल भोगणें घडे ॥१॥
कर्म करितां फळ बाधक । न करितां प्राप्त नरक ॥२॥
ऐशीं कर्माची रहाटी । सदैव देखे उफराटी ॥३॥
एका जनार्दनीं कर्म । तेथें कैंचा भवभ्रम ॥४॥

अभंग २८४४

कर्म करतां काहीं न कळे विचार

कर्म करतां काहीं न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होतां असे ॥१॥
राजस तामस सात्विक तें देखा । उपाधी ते देखा मूळ जाणा ॥२॥
यथाविधी कर्म न घडे निश्चयें । उणें पडतां जाय पतनासी ॥३॥
एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । सर्व कर्में तत्त्वतां घडती सांग ॥४॥

अभंग २८४५

नाना कर्माचियां लागतां पाठीं

नाना कर्माचियां लागतां पाठीं । भ्रमचि जगा होय शेवटीं ॥१॥
नोहे कर्म यथासांग वाउगाचि मग श्रम होय ॥२॥
जाय तळा येत वरी । बुडक्या परी बुडतसे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । कर्म न करुं जाण ॥४॥

अभंग २८४६

संध्यावंदनीं प्रणव जपावा

संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा ॥१॥
कैसी संध्येसी साधिली संधी । देहीं हारपली देहबुद्धी ॥२॥
छंद ऋषि मंत्र उच्चार । तीं अक्षरीं झालें अक्षर ॥३॥
जपी जपमाळा मौनी । संध्या साधिली निज समाधानीं ॥४॥
सायं प्रातः माध्यान्हींक । तिहीं संधीं निःसंदेह एक ॥५॥
काळेंक काळ तीन चुळा पाणी । संध्या साधिली एका जनार्दनीं ॥६॥

अभंग २८४७

कर्म करसी तरी कर्मठचि होसी

कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥
ब्रह्मालागीं कर्म सांडणें हें कुंडें । पाय सांडोनि पुढें चालुं पाहसी ॥२॥
डोळ्यांची नव्हाळी घेवों जातां करतळी । पाहों जातां मुळीं पाहणेंचि नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं सर्व कर्म पाहीं । सांडी मांडी नाहीं तये ठायीं ॥४॥

अभंग २८४८

कर्मक्रिया जेणें कळे

कर्मक्रिया जेणें कळे । तोचि कर्मी कां नाकळे ॥१॥
काय करुनी कर्म सकळ । हरिप्राप्तीविण निष्फळ ॥२॥
कर्मीं ब्रह्मा प्रतीति नाहीं । तरी त्या कर्म केलें काई ॥३॥
एका जनार्दनीं कर्म । कर्मीं पाहे परब्रह्मा ॥४॥

अभंग २८४९

कोटी जन्म आम्हीं करूं हरिकथा

कोटी जन्म आम्हीं करूं हरिकथा । कर्मकांड माथां धरूनियां ॥१॥
ऐहिकादि कर्में करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥
यजन याजन करुनी अग्निहोत्र । पूजोनि पवित्र द्विजवर ॥३॥
एका जनार्दनीं कर्म ब्रह्मा एक । वेदान्ती विवेक बोलियेला ॥४॥

अभंग २८५०

मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा

मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥
येथें नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥
शंख वाजविशी नाना स्वरा । तें तंव न बाधी शंखासुरा ॥३॥
तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तूं खरा ॥४॥
कर्म कार्य कर्तव्यता । माझेनि नांवें तूंचि आतां ॥५॥
एका जनार्दनीं निजात्मता । कर्म करून नित्य अर्कता ॥६॥

अभंग २८५१

जाणतेपणें विधिनिषेध पोटीं

जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥
अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥
अज्ञानें ज्ञान होतसे आपण । सज्ञानें मीतूपण घडतसे ॥३॥
एका जनार्दनीं अज्ञानाची बरा । सज्ञनाचा वारा नको मज ॥४॥

अभंग २८५२

आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण

आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण । नाम मुखीं स्मरण गोविंदाचें ॥१॥
घडेल तें घडो जोडेल तें जोडो । आम्हीं तों न सोडोंक रामकृष्ण ॥२॥
शरीर पतन घडे अनायासें । काय तें सायासें जतनेंचि ॥३॥
एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं हा न वाहे ॥४॥

अभंग २८५३

विधिनिषेध कवणेपरी

विधिनिषेध कवणेपरी । कार्या कारण ते परी ॥१॥
नाम जपतां सादर । विधिनिषेध पळे दूर ॥२॥
व्रत करा एकादशी । कंठीं मिरवा तुळशी ॥३॥
करा घोष हरिकथा । विधिनिषेध वंदीत माथां ॥४॥
एकपणें जनार्दनें । एका विधिनिषेध नेणें ॥५॥

अभंग २८५४

काय जाणों विधि-

काय जाणों विधि- । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥
आम्ही गाऊं नाम मुखें । नाचुं सुखें कीर्तनीं ॥२॥
न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणों हरिहरी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । विधिनिषेध गेला पूर्ण ॥४॥

अभंग २८५५

विधिनिषेध धरितां मनीं

विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं ॥१॥
जें जें वेळे जें जें घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥
अन्य नाहीं विचारणा । कार्यकारण सर्व जाणा ॥३॥
एका जनार्दनीं खूण । जाणते ते परिपुर्ण ॥४॥

अभंग २८५६

पूजा यथासांग पूर्ण

पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥
करितां ऐसा संकल्प । तेणें जोडे महातप ॥२॥
ध्यानीं ध्यातां संतचरण । होईल मना समाधान ॥३॥
ऐसा पूजेचा सोहळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

अभंग २८५७

पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव

पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवचि देव ॥१॥
करुं तरी पूजा कवणाचि सांगा । देवाविण जागा रिती कोण ॥२॥
एका जनार्दनीं पूजेसी नाहीं ठाव । अवघा व्यापला देवाधिदेव ॥३॥

अभंग २८५८

पूजेचे प्रकार असती सोळा बारा

पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं ॥१॥
म्हणवितां दास मनीं धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥
सायास संकट न करी व्रताचार । गाईन निरंतर जनार्दनु ॥३॥
एका जनार्दनीं शरआण मने वाचें । तया पूजनाचें सुख होय ॥४॥

अभंग २८५९

पूजा करुं कैशी देवा

पूजा करुं कैशी देवा । वाचे आठवुं केशवा ॥१॥
हेचि माझी पूजाविधी । सर्व टाकिली उपाधी ॥२॥
घालूनि निर्मळ आसन । पूजुं संतांचें चरण ॥३॥
दृढ करूं भाव साचा । सदा छंद रामनामाचा ॥४॥
एका जनार्दनीं पूजा । सर्वभावें गरुडध्वजा ॥५॥

अभंग २८६०

देवपूजे ठेवितां भावो

देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो ॥१॥
आता कैसेनी पूजुं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥
अन्न गंध धूप दीप । तेंही माझेंचि स्वरुप ॥३॥
एका जनार्दनीं करी पूजा । तेथें पूज्य पूजकू नाहीं दुजा ॥४॥
समाधी योग

अभंग २८६१

पूजन तो एक पुरे

पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥
नको गंधाक्षता तुळशी । मुखीं नाम अहर्निशीं ॥२॥
धूप दीप नैवेद्य तांबूल । सदा वाचे नाम बोल ॥३॥
आर्ती धूपार्ती अक्षता । राम गाऊं निःसीमता ॥४॥
एका जनार्दनीं शरण । सहज पूजा घडे जाण ॥५॥

अभंग २८६२

सहजची पूजा पुरे

सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे ॥१॥
आठवीन वेळोवेळां । केशवा माधव गोपाळा ॥२॥
मंत्रस्नान विभूती । मुखीं राम जपविती ॥३॥
नाहीं आणीक काम । वाचे म्हणे रामनाम ॥४॥
एका जनार्दनीं बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥

अभंग २८६३

देवांचें पूजन

देवांचें पूजन । घडतां रामस्मरण ॥१॥
हेचि एका पूजा सार । वायां कासया पसर ॥२॥
करुं बैसे देवपूजे । मनीं भाव आन दुजे ॥३॥
ऐसें पूजेचें लक्षण । सांगें एका जनार्दन ॥४॥

अभंग २८६४

बरवी ती पूजा

बरवी ती पूजा । जेणें पावे अधोक्षजा ॥१॥
मुखीं नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥
तुळशीमाळा गोपिचंद । पूजा छंद हाची मनीं ॥३॥
व्रत करी एकादशी । जाग्रण निशीं सर्वदा ॥४॥
एका जनार्दनीं तुष्टें देव । पूजा भाव तेणें पावें ॥५॥

अभंग २८६५

देवपुजा करी आदरें

देवपुजा करी आदरें । अतीत आलिया न बोले सामोरें ॥१॥
कासया पूजन दांभिक । तेणें देवा नोहे सुख ॥२॥
अतीतासी देणें पूजा । तेणें संतोषें पावे पूजा ॥३॥
एका जनार्दनीं पूजा । ऐसी न करी गरुडध्वजा ॥४॥

अभंग २८६६

डोळियांनें रूप पहावें साचार

डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥
हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥
पदें प्रदक्षणा करी तीर्थाटन । हेंची पैं कारण पूजनाचें ॥३॥
एका जनार्दनीं ऐशी करी पूजा । तेणें गुरुराजा तोष पावे ॥४॥

अभंग २८६७

जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं

जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥
कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥
परद्रव्य परस्त्री येथें आसक्त नोहे मन । तेणें जनार्दन पूजा पावे ॥३॥
एका जनार्दनीं ममता टाकुनी । संतांचे चरणीं पूजन करी ॥४॥

अभंग २८६८

आपुली पूजा आपण करावी

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं ॥१॥
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥
एका जनार्दनीं ज्ञानाज्ञानें । पुजावें श्रीचरण विठोबाचे ॥३॥

अभंग २८६९

नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे

नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा ॥१॥
केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥
वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयीं साठवा वेळोवेळां ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ॥४॥

अभंग २८७१

हृदयींचे देव हृदयींच भक्त

हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥
ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥
ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयीं सर्वस्थिती देव जाणों ॥३॥
एका जनार्दनीं हृदयींच पाहाल । तें सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥

अभंग २८७२

हृदयस्थ जया नाहीं ठावा देव

हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥
जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥
एका जनार्दनीं व्यापक सर्वांठायीं । भरुनीं उरला ठाई जेथें तेथें ॥३॥

अभंग २८७३

देवासी तो पुरे एक प्रेमभाव

देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥
मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥
रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥

अभंग २८७४

सप्रेमें करितां भजन

सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ॥१॥
प्रेम सार प्रेम सार । वायां भार कुंथेचा ॥२॥
प्रेमेंविण न भेटे देवो । अवघा वावो पसारा ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम सार । तुटे वेरझार येणें जाणें ॥४॥

अभंग २८७५

बह्मांडाची दोरी

बह्मांडाची दोरी । हालवी जो एक्याकरीं ॥१॥
भूतीं परस्पर मैत्री । तीं ऐक ठायीं असतीं वरी ॥२॥
पंचप्राणांचें जें स्थान । तये कमळीं अधिष्ठान ॥३॥
एका जनार्दनीं सुत्रधारी । बाहुली नाचवी नानापरी ॥४॥

अभंग २८७६

मिथ्या मायेच्या धाकासाठीं

मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं ॥१॥
आसन घालूनियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥
क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ॥३॥
बुद्धी सुबुद्धि धरूनि हातीं । आकळितसे इंद्रियवृत्ती ॥४॥
शांतीचेनि बळें । संकल्प त्यागिले सकळ ॥५॥
ऐशी योगाची कहाणी । शरण एका जनार्दनीं ॥६॥

अभंग २८७७

प्राणपानांची मिळणी

प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥१॥
ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घाट ॥२॥
कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥
साधितां उल्हाट शक्ति उलटे । उघडलें ब्रह्मारंध्राचें कपाट ॥४॥
शरीराकारें ते बोलिली । एका जनार्दनीं पुतळी ॥५॥

अभंग २८७८

समुद्र क्षोभे वेळोवेळीं

समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥
समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥
समुद्रीं वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥
योगियांची योग स्थिती । सदा परमार्थ भक्ती ॥५॥
एका जनार्दनीं शरण । योगियांचें जें योगचिन्ह ॥६॥

अभंग २८७९

सर्प बिळामाजीं रिगें

सर्प बिळामाजीं रिगें । हें तो देखतीक सवेगें ॥१॥
तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥
दावितां आचारू । हासताती लहान थोरू ॥३॥
म्हणती एक कर्मठ । ऐक म्हणती योगभ्रष्ट ॥४॥
एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिती ॥५॥
यापरीस उत्तम साधन । एका जनार्दनीं शरण ॥६॥

अभंग २८८०

प्राण रक्षणापुरतें

प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥
तैसा साधावा हा योग । जेणें साधे अंतरंग ॥२॥
रिघोनी कमळिणीपाशीं । भ्रमर लोंधे अमोदासी ॥३॥
कोरडेंक काष्ठ भेदूनि जाय । तो कमळदळीं गुंतोनि राहे ॥४॥
एका जनार्दनीं योग । ऐसा साधावा अनुराग ॥५॥

अभंग २८८१

चार मुद्रा आणि समाधी त्या चारी

चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हें ॥१॥
चहूं समाधीचें पाहीं हें देखणें । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥
जिकडे पाहतां तिकडे स्वरूपचि दिसे । तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥
मसूरप्रमाण शून्य महा तें कारण । गुरुमुखें खूण जाणावी पैं ॥४॥
साचार स्वरूपाची मेळवणी केली । परात्पर ठेली हेंचि ज्योती ॥५॥
त्याच वस्तूसाठीं भांडती पुराणें । वेद शास्त्रें येथें मौनावलीं ॥६॥
गुह्मा हें पंचक देखोनी समाधी । बोलोनियां वेदीं निश्चयो केला ॥७॥
एका जनार्दनीं स्वरूप उरलें पाहीं । द्वैत गेलें पायीं सद्‌गुरूच्या ॥८॥

अभंग २८८२

कैसे झालें देवदर्शन

कैसे झालें देवदर्शन । देवा पाहतां आहे कोण ॥१॥
डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥
पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥
एका जनार्दनीं पाहे । पाहणें पाहतां देवाचि आहे ॥४॥

अभंग २८८३

दुबार बाहुली वस्तुरूप झाली

दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥
अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥
सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती तें नयनीं बिंदुरूप ॥३॥
एका जनार्दनी पाहे डोळियां भीतरीं । सबाह्म अभ्यंतरीं तरीच दिसे ॥४॥

अभंग २८८४

स्वाहिताकारणें विचार न कळे

स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हें मुळ आम्ही जाणों ॥१॥
अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जातां त्यासी अर्घ्य देतो ॥२॥
नासिकेचें अग्र सुषुम्ना विंदान । करी प्राणायाम वेगळाची ॥३॥
साहीं चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पणयुक्त मंत्र सहज ॥४॥
त्रिपुटीपासोनि डोळिया वंदन । रक्त श्वेत गुण पीत भासे ॥५॥
आर्धाकीं पाहे अणुरेणु सरी । गगन शून्याकारी विखुरलें ॥६॥
विराजली संध्या बैसली जे बाळा । चंद्र सूर्य कळा लाजविल्या ॥७॥
हृदयापासोनी नाबेहेचा नेट । मनीं बळकट पुष्टी व्हावी ॥८॥
मूळबंधापासूनि दिधली आटणी । हृदयीं कुंडलिनी सिद्ध संघ ॥९॥
दाही दिशा करी प्रदक्षिणा वेडा । गगनीं बीज सडा माजिविलें ॥१०॥
एका जनार्दनीं संध्या हेंचि रीती । सहस्त्रदळीं ज्योति निजबिंदु ॥११॥

अभंग २८८५

विधियुक्त नोहे संध्यास्नान

विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥
रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥
मूळ मंत्र न्यास विधि बीज । न घडतां सहज दोष लागे ॥३॥
हृदय कवच शिखा शिरीं । नेत्र अस्त्रादिक फटकारीन साचे ॥४॥
एका जनार्दनीं यातायाती । पुढें फजिती जन्मोजन्मीं ॥५॥

अभंग २८८६

निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी

निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥
व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥
पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कल्लोळ मुखीं सदा ॥३॥
एका जनार्दनीं भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ॥४॥

देह 
अभंग २८८७

मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया

मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥
मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥
मिथ्या भूत जन मिथ्या भूत वन । एका जनार्दन शरण वेगीं ॥३॥

अभंग २८८८

नाशिवंत धन नाशिवंत मान

नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥
नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥
नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें । नाशिवंत बळें गळां पडती ॥३॥
एका जनार्दनीं सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥

अभंग २८८९

नाशिवंत देह जाणार जाणार

नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥
अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥
मृगजळाचें जीवन क्षणिक निर्धार । तैसा हा विचार व्यर्क्थ सर्व ॥३॥
एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी प्राणी करती ॥४॥

अभंग २८९०

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥
कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥
एका जनार्दनीं नाथिलाची भास । विठ्ठलनामें सौरस न घे कोणी ॥३॥

अभंग २८९१

भांबावले जन म्हणती माझें माझें

भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥
खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥
स्तंभ असोनियां चोर म्हणती आला । नसोनि प्रपंच खरा भासिला ॥३॥
मृगजळवत् जाणार सर्व । अभ्रीचें सावेव वायां जैसें ॥४॥
एका जनार्दनीं धरीका रे सोय । पुनरपि न ये गर्भवासा ॥५॥

अभंग २८९२

पांचा जाणाचें

पांचा जाणाचें । आणिलें जयाचें । मिरवण तयाचें । कोण सुख ॥१॥
नवल विस्मयो कैसा । देखत देखत झांसा । मृगजळाची आशा । केवीं आहे ॥२॥
आतां नेती मग नेती । ज्याचें तें घेउनी जाती । मूढ जन म्हणती । माझें माझें ॥३॥
स्वप्नींचें निज भोज । कोल्हार मंडपीचें चोज । गंधर्व नगरीं राज्य । केवीं घडे ॥४॥
ऐसें जाणोनी अरे जना । भुललासि अज्ञाना । मी माझी कल्पना । करसी वायां ॥५॥
एका जनार्दनीं हरीं । व्यापक तो चराचरीं । तोची एक निर्धारी । वाउगे येर ॥६॥

अभंग २८९३

फुले झडे तंव फळ सोसे

फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठीं तेंहीं नासे ॥१॥
एक मागें एक पुढें । मरण विसरलें बापुडें ॥२॥
शेजारीं निमाले कोणाचे खांदी । लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥
मरण ऐकतां परता पळे । पळे तोही मसणीं जळे ॥४॥
प्रेत देखोनी वोझाच्या जाती । वोझें म्हणती तेही मरती ॥५॥
मरण म्हणतां थूं थूं म्हणती । थुंकते तोंडें मसणीं जळती ॥६॥
पळेना चळे तोचि सांपडें । जाणतां होताती वेडे ॥७॥
एका जनार्दनीं शरण । काळवेळ तेथें रिगे मरण ॥८॥

अभंग २८९४

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥
दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥
पंचभुतें विरती ठायींचे ठायीं । वाया देहादेहीं बद्धमुक्त ॥३॥
एका जनार्दनीं नाथीलाची खेळ । अवघा मायाजाळ जाईल लया ॥४॥

अभंग २८९५

गर्भवासीचें दुःख सांगतां आटक

गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख ॥१॥
शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥
गर्भवासीचें सांकडे सांगावें कवणापुढे । सर्वांगी विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥
एका जनार्दनीं भेटी तैं जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणें गोष्टी ॥४॥

अभंग २८९६

उगम संगम प्रवास गती

उगम संगम प्रवास गती । ऐसी त्रिविध देहस्थिती ॥१॥
बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसें देहाचें विविधत्व ॥२॥
जरामरण नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ॥३॥
ऐसियाचा भरंवसा । एका जनार्दनीं ठसा ॥४॥

अभंग २८९७

एक एक योनी कोटी कोटी फेरा

एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह थारा अवचटा ॥१॥
मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडियेला खेळ नरदेहीं ॥२॥
स्त्री पुत्र नातु बाहुले असती । नाचवितो पती त्रैलोक्याचा ॥३॥
एका जनार्दनीं मांडियेला खेळ । त्रैलोक्य सकळ बाहुलें त्याचें ॥४॥

अभंग २८९८

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥
करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥
सोडविता तुज कोणी । नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥३॥
भुलुं नको जासी वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥

अभंग २८९९

कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया

कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥
कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायीं रया ॥२॥
हाणिती मारिती निष्ठुर ते दूत । विचकुनियां दांत पडसी रया ॥३॥
एका जनार्दनीं मागील आठव । कांहीं तरी भेव धरी रया ॥४॥

अभंग २९००

ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा

ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥
माझें माझें म्हणोनि झोंबतसे बळें । केलेंसे वाटोळें नरदेहा ॥२॥
फजितीचा जन्म मरावें जन्मावें । हें किती सांगावें मूढ जना ॥३॥
एका जनार्दनीं माझें माहें टाकुनीं । वैष्णव कीर्तनीं नाचे सुखें ॥४॥