वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग २१०१ ते २२००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग २१०१ ते २२००

अभंग २१०१

सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें

सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥
चांदिणें जैसें शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥
विटेवरी नीट जघनीं कर । उभा देखे परात्पर गे माये ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां तयासी । मन चक्रोर तृप्त झालें गे माये ॥४॥

अभंग २१०२

सर्वांघटीं बिंबोनी ठेला

सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये ॥१॥
सर्वांघटीं ज्यांची वस्ती । ते हीं मूर्ति विटेवरी ॥२॥
सर्वांठायीं भरूनि उरे । पंढरीये पुरे मापासी ॥३॥
जनार्दनाचा एका म्हणे । धन्य पेणें पंढरी ॥४॥

अभंग २१०३

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥
परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥
मध्यमा मध्यमीं उभा तो स्वयंभ । अद्वयांनंद कोंभ कर्दळीचा गे माये ॥३॥
एका जनार्दनीं आहे तैसा भला । हृदयीं सामावाला माझ्या गे माये ॥४॥

अभंग २१०४

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥
शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥
अंतरी बाहेरी एकमय जाहलें । अवघें कोंदटलें परब्रह्मा ॥३॥
एका जनार्दनीं ऐसी जाहली वृत्ती । वृत्तीची निवृत्ति चिदानंदीं ॥४॥

अभंग २१०५

व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं

व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥
कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥
ठसावेल मूर्ति पाहतां अनुभव । पांचांचा मग ठाव कैंचा तेथें ॥३॥
एका जनार्दनीं संपुर्ण अवघा । भीमातीरीं थडवा उभा असे ॥४॥

अभंग २१०६

सर्व इंद्रियांचे पुरले कोड

सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकतां ॥१॥
हरुषें नाचतां वाळूवंटीं । गेलें कसवटीं पळूनी ॥२॥
पंचभूतें स्थिर झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥
एका जनार्दनीं मंगळ झाला । अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥

अभंग २१०७

तुमचे पायीं ठेवितां भाळ

तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें ॥१॥
आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥
जन्माचें सार्थक । पाहतां तुमचें श्रीमुख ॥३॥
शरण एका जनार्दनीं । धन्य नाम तुमचें वदनीं ॥४॥

अभंग २१०८

मार्ग सोपा पंढरीचा

मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥
नाहीं पुसायाचें काम । वाचें नाम मुखीं गाऊं ॥२॥
नाहीं कोठें आडकाठी । साधनकपाटीं पंचाग्र ॥३॥
नलगे योगयाग तप । वाचे जप विठ्ठल ॥४॥
त्रिअक्षराचें काम । एका निष्काम जनार्दनीं ॥५॥

अभंग २१०९

आलिंगोनी देवभक्त

आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥
तें हें पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥
आलियासी दान । नामामृताचि पान ॥३॥
जैसा ज्याचा हेत । पुरवित रुक्मिणीकांत ॥४॥
एका जनार्दनीं शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥

अभंग २११०

येथोनी आनंदु रे

येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥
महाराजाचें राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥
आनंदले भक्तजन । म्हणे धन्य रघुनंदन ॥३॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेउनी बाहेर आली ॥४॥
एका जनार्दनीं नाम । पाहतां निवे आत्माराम ॥५॥

अभंग २१११

भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली

भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥
भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥
भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥
संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥
एका जनार्दनीं एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥

अभंग २११२

भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी

भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी । बहुतां चाळविलें चाळायाची थोरी ॥१॥
भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तिमाजीं भावो नाहीं नाहीं ॥२॥
मुक्ति चाळा लाउनी सेखीं वोसंडी । नेणें ऐसें किती केले पाषांडी ॥३॥
मुक्तिचेनी योगें नामदेव शुक । त्यांचाहीं विकल्प मानिताती लोक ॥४॥
नाम संकीर्तन भक्ति मुक्तीसी धाक । संवादें दोघेही राहो माझी भाक ॥५॥
उपजोनियां पोटी भक्ति ते ग्रासी । मातृहत्यारीं मुक्ति कवण पोसी ॥६॥
एका जनार्दनीं सेवितां चरणरज । मुक्ति सेवा करी सांडुनिया लाज ॥७॥

अभंग २११३

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥
प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥
रांगवेनें जेवीं शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥

अभंग २११४

तुझिया चरणीं अनुपम्य सुख

तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे ॥१॥
जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तयां न कळे ॥२॥
भक्तियुक्त ज्ञान तेथें घडे भजन । वायां मग शीण जाणीवेचा ॥३॥
एका जनार्दनीं वाउगे ते बोल । भक्तीविण फोल नावडती ॥४॥

अभंग २११५

नवल दावियेलें सोंग

नवल दावियेलें सोंग । अवघा एकक पांडुरंग ॥१॥
हें तों आलें अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांची ॥२॥
मन पवनांची धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥
एका जनार्दनीं परिपुर्ण । एका एकपण देखतां ॥४॥

अभंग २११६

सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी

सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥
दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळीं दीनांलागीं मानसमोहना ॥२॥
एका जनार्दनीं धन्य धन्य लाघव । एकरुपें असोनी दिसों नेदी कैसें वैभव ॥३॥

अभंग २११७

अकळ अनुपम्य तुझी लीला

अकळ अनुपम्य तुझी लीला । न कळे अकळा सर्वासी ॥१॥
वेदशास्त्रां न कळे पार । षडनिर्विकार दर्शनें ॥२॥
जों जों धरुं जावा संग । तों तों विरंग उपाधी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । रंकाहुनी मी रंक ॥४॥

अभंग २११८

ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं

ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं ॥१॥
नाहीं चतुर्दल तुर्याही उन्मनीं । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥
चित्त जडलिया तेथें काय उणें । लज्जित साधनें होतीं देखा ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं मीतूंपण । व्यापक तें जाण सर्वांठायीं ॥४॥

अभंग २११९

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥
तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥
नेति नेति शब्द भुलल्या वेडावल्या श्रुति । आगमनिगमां न कळे चोज चिंत्तीं ॥३॥
एका जनार्दनीं सकळ ब्रह्मा शोभा । अनुपम्य उभा कर्दळीचा गाभा ॥४॥

अभंग २१२०

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥
तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥
एका जनार्दनीं शब्दवेगळा असे । तो उभा दिसें कीर्तनरंगीं ॥३॥

अभंग २१२१

पांहता पाहता वेधलेंसे मन

पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां ॥१॥
जीवांचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥
परादिकां ज्याचा न कळेचि अंत । सर्व गुणातीत भेदरहित ॥३॥
एका जनार्दनीं त्रिगुण परता । ओतप्रोत सर्वथा भरलासे ॥४॥

अभंग २१२२

जय विश्वव्यापका विश्वमुर्ति वंदन

जय विश्वव्यापका विश्वमुर्ति वंदन । वर्णितां थकलें सहा अठराजण ।
मुनिजन धुंडती साधिती साधन । नव्हे दरुशन तयांसी ॥१॥
तो तूं लाघवा सुत्रधारी । करिसी गोकुळामाजीं चोरी ।
धरितां न सांपडसी निर्धारी । आगमनिगमां सरी न पवेची ॥२॥
न कळे न कळे कवणा महिमान । शेषादिक श्रमले जाहले आसन्न ।
शरण एका जनार्दन । काया वाचा मन दृढेंसी ॥३॥

अभंग २१२३

व्यापका हा जनार्दन

व्यापका हा जनार्दन । जगाची भरला संपूर्ण ॥१॥
मागें पुढें आहे उभा । काय वानुं त्याची शोभा ॥२॥
भरुनी उरला । सर्वांठायीं तो संचला ॥३॥
शरण एक जनार्दनीं । व्यापक तो जनीं वनीं ॥४॥

अभंग २१२४

काय वानुं हरिचा महिमा

काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥
वेदशास्त्रें शिणोनि ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥
दरुशनें तटस्थ होऊन । धरुनी ठेलीं तीं मौन ॥३॥
श्रुती अनुवादा जो नये । त्यासी एका जर्नादनीं ध्याये ॥४॥

अभंग २१२५

दीपकळिकेमाजीं कळा

दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥
असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥
करवी खेळवी नाना खेळा । परी आपण अलिप्त सकळां ॥३॥
एका जनार्दनीं सुत्रधारी । खेळ खेळोनी अलिप्त निर्धारी ॥४॥

अभंग २१२६

आमुची तो एवढी आस

आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे ॥१॥
मना मागें न जाऊं देखा । सांपडला शिक्का उत्तम ॥२॥
त्रैलोक्याचा धनीं देव । आम्हा भेव नाहीं कोठें ॥३॥
जाहलों बळिये शिरोमणी । एका चरणीं जनार्दनाचें ॥४॥

अभंग २१२७

कोणासवें आमुचें काय काज

कोणासवें आमुचें काय काज । पंढरीराज कैवारी ॥१॥
उभा राहे मागें पुढें । निवारी सांकडेंक भक्तांचें ॥२॥
आघात घात निवारी । पीतांबरी करी छाया ॥३॥
ऐसा अनुभव मज यावा । धांवे राया पंढरीच्या ॥४॥
एका जनार्दनीं भाव । धरिलिया धांवे देव ॥५॥

अभंग २१२८

लेकुरें खेळतीं वो साचें

लेकुरें खेळतीं वो साचें । मायबाप प्रेमें नाचे ॥१॥
तैसा हेत पांडुरंगीं । धरितां उणें काय जगीं ॥२॥
जैसा जैसा छंद त्याचा । पुरवणें लागें साचा ॥३॥
एका जनार्दनाचा बाळ । कौतुकें खेळतसें खेळ ॥४॥

अभंग २१२९

टाळमृदंग मोहरी

टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥
घण घणाणा घंटा वाजे । घण घणाना घंटा वाजे ॥२॥
उपासना याचे पायीं । अवघी माझी विठाबाई ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघा माझा पंढरीराव ॥४॥

अभंग २१३०

व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला

व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥
पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरीं जनार्दन ॥२॥
व्यापक व्यापला अक्षयी संचला । भरूनी उरला जळीं स्थळीं ॥३॥
एका जनार्दनीं रिता नाहीं ठाव । अवघा देहीं देव जनार्दन ॥४॥

अभंग २१३१

भोळ्या भाविकांसी देख

भोळ्या भाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल ॥१॥
दुजा नाहीं आन कोण्ही । पाहतां तिहीं त्रिभुवनीं ॥२॥
जन्ममरणाचें सांकडें । नाहीं कोडें मुक्तीचें ॥३॥
मोक्ष तो उभा जोडोनी हात । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥

अभंग २१३२

एकप्णें असें सर्वाठायीं वसे

एकप्णें असें सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी ॥१॥
तें रूप साजिरें पाहतां गोजिरें । मन तेथें मुरे पाहतां पाहतां ॥२॥
खुंटली भावना तुटली वासना । साधनें तीं नाना हारपली. ॥३॥
संकल्प विकल्प मुळींच उडाला । एका जनार्दनीं धाला एकपणें ॥४॥

वाकीभ

संत साहित्य, अभंग, ओव्या आणि ग्रंथांचा समृद्ध मराठी संग्रह. वारकरी परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हा आमचा प्रयत्न.

मेन्यू मुखपृष्ठ ग्रंथ अभंग/भजन संत विभाग संपर्क vakibhmedia@gmail.com +91 99239 16476 पुणे, महाराष्ट्र

© २०२६ वाकीभ. सर्व हक्क सुरक्षित.

अभंग २१३३

भक्ताचिया काजा

भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥
घेऊनियां परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥
शोभे गोपाळांची मांदी । रूक्मिणी सत्यभामा आदि ॥३॥
शोभे पुढें भीवरा नीर । भक्त करती जयजयकार ॥४॥
एका जनार्दनीं ध्यान । चिमणें रूप गोजिरें ठाण ॥५॥

अभंग २१३४

देव भुलला भावासी

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥
पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥

अभंग २१३५

भावाचेनी भक्ति थोर

भावाचेनी भक्ति थोर । भावें तुटे वेरझार ॥१॥
भावें अंकित देव भक्तांचा । वेदशास्त्रा बोले वाचा ॥२॥
भावें गुरुशिष्य दोन्हीं । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥
भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ॥४॥
एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ॥५॥

अभंग २१३६

भावाचिये बळे होऊनि लहान

भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥
न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥
अट्टाहास्यें करितां नामाचा उच्चार । उतरी पैलपार भवनदीचा ॥३॥
एका जनार्दनीं भक्तांची आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

अभंग २१३७

जीवभाव जेणें अर्पियला देवा

जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥
न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥
देव भावासाठीं लागे पाठोपाठीं । एका जनार्दनीं भेटी देतो देव ॥३॥

अभंग २१३८

चरणामृत देव स्वादला

चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला ॥१॥
अभिन्नव भक्ति नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी ॥२॥
भक्तिरसाची लागली गोडी । तोंडीचा अंगुष्ठ बाहेर न काढी ॥३॥
एका जनार्दनीं सांगतों भावो । आपुली गोडी आपण घ्यावी ॥४॥

अभंग २१३९

एका भावासाठीं

एका भावासाठीं । देव धांवे उठाउठी ॥१॥
पोहे सुदामदेवाचे । भक्षी आवडीनें साचे ॥२॥
खाऊनियां भाजी पान । दिधलें भोजन ऋषींसी ॥३॥
आवडीनें कण्या खाय । प्रेम न समाय अंतरीं ॥४॥
गौळियांचें उच्छिष्ट खाये । एका जनार्दनीं धाये ॥५॥

अभंग २१४०

प्रेमें भक्तांची आवडी

प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी ॥१॥
ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥
उच्छिष्ट फळें भिल्लणींची । खायें सांची आवडीनें ॥३॥
एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरी ॥४॥

अभंग २१४१

राम भावाचा भुकेला

राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला ॥१॥
विदुर गृहाप्रति गेला । विश्रांति तेथें पावला ॥२॥
शबरींची फळें भक्षी । क्षीरनिधी शयन साक्षी ॥३॥
एका जनार्दनीं निश्चय ऐसा । देव भक्ताधीन सहसा ॥४॥

अभंग २१४२

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥
न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥
आगम निगम लाजोनी राहिले । तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥
काळाचा जो काळ भक्ता प्रतिपाळ । तया भेडविती बागुल आला म्हणोनी ॥४॥
बारा चौदा सोळा अठरा विवादती । तो गायी राखी प्रीती गोकुळांत ॥५॥
एका जनार्दनीं भक्तीचा भुकाळू । खाय तुळसीदळू भाविकांचें ॥६॥

अभंग २१४३

स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं

स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं । वाउगा श्रम नेहटी वायां जाय ॥१॥
भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारीं ॥२॥
अर्जुनाचे रथीं सारथीं होउनी । राहे मोक्षदानी भावासाठीं ॥३॥
विदुराचे घरीं आवडीनें भक्षी । कण्या साक्षेंपेसी खाती देव ॥४॥
पोहे सुदाम्याचे खाउनी तुष्टला । एका जनार्दनीं दिला सुवर्णगांव ॥५॥

अभंग २१४४

भावें घातली कास देव झाला दास

भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥
भावाचेनि बळें जीवपणें वोवळें । मन हें सोंवळें ब्रह्मा साम्य ॥३॥
एका जनार्दनीं भावचि कारण । सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥

अभंग २१४५

भाव भजनातें निपजवी

भाव भजनातें निपजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥
आतां भजनीं देव केला । भक्त वडील देव धाकुला ॥२॥
सेवा करणें हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥
भक्ता कळवळा देवाचा । देव झाला त्या भक्तांचा ॥४॥
देव भक्तांचे पोटीं । झाला म्हणोनी आवड मोठी ॥५॥
एका जनार्दनीं नवलाव । कैसा भक्तचि झाला देव ॥६॥

अभंग २१४६

एका भावें कार्यसिद्धि

एका भावें कार्यसिद्धि । एका भावें तुटें उपाधी । एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥
एक भावें करी भजन । एका भावें संतसेवन । एका भावें वेदवचन । पाळीतां तुटे भवपीडा ॥२॥
एका भावें योगयाग । एका भावें तप आष्टांग । एका भावें द्वैत तें सांग । तेथें द्वैत नको बापा ॥३॥
एका भावें रिघे शरण । एका भावें एक जनार्दन । एका भावें धरीं चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥

अभंग २१४७

योगी रिगाले कपाटीं

योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी ॥१॥
परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥
यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥
सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासीं ॥४॥
एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥

अभंग २१४८

असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं

असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥
कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥
सुक्षेत्रीं पुण्य अनुक्षेत्रीं पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥
काशी हो पंढरी तीर्थयात्रा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥
एका जनार्दनीं सर्व सिद्धि असे । नाथिलेंचि पिसें मतवाद्या ॥५॥

अभंग २१४९

जो जया चित्तीं भाव

जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे ॥१॥
द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥
अशोक वनीं सीता । शुद्धि जातां हनुमंता । भावेंचि तत्त्वतां । कार्यसिद्धि ॥३॥
समरांगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोत्र देखोन । तेथेंचि जनार्दन । भावें गीता सांगे ॥४॥
ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासे वैकुंठ । एका जनार्दनीं नीट । विटे उभा राहिला ॥५॥

अभंग २१५०

जैसा जैसा जया भाव

जैसा जैसा जया भाव । तैसा तैसा पावे देव ॥१॥
हा देव अनुभव पहा । देही पहा विदेहीं ॥२॥
शुद्ध करावें तें मन । जनीं पहा जनार्दन ॥३॥
एका जनार्दनीं भाव । देहीं वसतसें देव ॥४॥

अभंग २१५१

देवासी तो पुरी एक भाव

देवासी तो पुरी एक भाव । नेणें वैभव दासाचें ॥१॥
जया चित्तीं जी वासना । तैशीं कामना पुरवणें ॥२॥
नाहीं पडत गोंवोंगुती । आपणचि हातीं करितुसे ॥३॥
एका जनार्दनीं अंकित राहे । तिष्ठत द्वारीं त्याच्या ॥४॥

अभंग २१५२

अंगावरी आलिया घाव

अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥
काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥
मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥
एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥

अभंग २१५३

महालाभ हाचि आहे

महालाभ हाचि आहे । जो या गाये विठ्ठलासी ॥१॥
प्रेमभरीत सदा कंठ । अंगीं बळकट भावना ॥२॥
हेंचि वैराग्याचें सार । वायां कासया वेरझार ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघा पाठीं पोटीं देव ॥४॥

अभंग २१५४

समसाम्य सर्वाभुतीं

समसाम्य सर्वाभुतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ति ॥१॥
जालिया सदगुरुकृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥
हृ़दयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ॥३॥
भक्तां भावार्थें विकला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥

अभंग २१५५

झालिया गुरुकृपा सुगम

झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥
तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥
ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥
एका जनार्दनीं भाव । स्वयें आपणचि होय देव ॥४॥

अभंग २१५६

सकळ साधनांचें सार

सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार ॥१॥
येणें घडे सर्व कर्म । नको भेदाभेद वर्म ॥२॥
सांडा द्वैताचा भाव । तेणें सर्व दिसें वाव ॥३॥
एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसें देव ॥४॥

अभंग २१५७

आरशाअंगींक लागतां मळ

आरशाअंगींक लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ ॥१॥
मळ तो झाडुनि पाहतां । सुख दिसें निर्मळता ॥२॥
पाहतां शुद्धभाव रीतीं । परमार्थ हाचि चित्तीं ॥३॥
एका जनार्दनीं हा विचार । आरशासारिखा प्रकार ॥४॥

अभंग २१५८

शुद्धभाव चित्तीं

शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥
नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥
भावाविण वांझे । साधनें तीं अवघीं ओझें ॥३॥
एका जनार्दनीं भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥

अभंग २१५९

अभाग्य न भजती भगवंतीं

अभाग्य न भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वीं असे जडत्व देती ।
जळें दिधली त्या अधोगती तेजें दिधली त्या संतापवृत्ति ॥१॥
ऐसा कैसोनि भेटे भगवंतु । नरदेहीं मुकले निजस्वार्थु ।
जन्ममरणाचें भोगिती आवर्तु । त्यासी विन्मुख होय हृदयास्थु ॥२॥
वायुनें दिधलें त्या चंचळत्व । नभें दिधलें त्या भावशुन्यत्व ।
महतत्व हरिलें निजसत्व । मायें दिधलें त्या ममत्व ॥३॥
सभाग्य भावें भजती भगवंती । त्यासी पृथ्वी देतसे निज शांती ।
जळें दिधलीं मधुर रसवृत्ती । तेजें दिधली निजतेज प्रभादीप्ती ॥४॥
ऐशा सहजें प्रसन्न होय देवो । जेणें भूतांचा पालटे देहभावो ।
निजीं निजाचा वाढे निर्वाहो । जनीं विजनीं अखंड ब्रह्माभावो ॥५॥
वायु उपरमें दे निश्चळत्व । नभें दिधलें त्या अलिप्तत्व ।
महत्तत्वें दिधलें शोधित सत्व । मायें दिधलें सद्विद्या परमतत्वा ॥६॥
एकाजनार्दनीं निज भक्ति । तैं अलभ्य लाभु होय प्राप्ती ।
भुतें महाभुतें प्रसन्न होतीं । तेणें न भंगें ब्रह्मास्थिति ॥७॥

अभंग २१६०

भाव लागला भगवंतीं

भाव लागला भगवंतीं । हरिरुप पवित्र जगतीं । पाहता कर्माकर्म गति । ब्रह्मास्थिति अखंड ॥१॥
भक्ति म्हणे सोहंशक्ति । सांडिं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ति । सर्वाभूतीं भगवंत ॥२॥
करितां कर्मांचे देहाचरण । कर्म सबाह्म चैतन्य । देहविदेह अवसान । गमनागमन खुंटलें ॥३॥
एकाजनार्दनीं एकपण । अनन्यभावें पैं शरण । जन्ममरणा आलें मरण । ब्रह्मा परिपुर्ण पूर्णत्वे ॥४॥

अभंग २१६१

जो जो धरसील भाव

जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥
भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥
एका जनार्दनीं । भावाच्या आवडी । मनोरथ कोडी । पुरवी तेथें ॥३॥

अभंग २१६२

भावेंविण देव नयेचि पै हातां

भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान ॥१॥
मुख्य तें स्वरुप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निःसंदेह ॥२॥
संतसमागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥
एका जनार्दनीं सोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठींचें ॥४॥

अभंग २१६३

अवघे अवघे ते देव

अवघे अवघे ते देव । अवघे अवघे एक भाव ॥१॥
अवघे अवघे प्रेमळ । अवघे अवघे निर्मळ ॥२॥
अवघे अवघे भावाचे । अवघे अवघे प्रेमाचे ॥३॥
अवघा एका अवघा एका । अवघा अवघा जनार्दन एका ॥४॥

अभंग २१६४

देवासी तों पुरे

देवासी तों पुरे । एक तुळशीपान बरें ॥१॥
नाहीं आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ॥२॥
कण्या भाजी पान फळे खाय । न पाहे यातिकुळ स्वयें ॥३॥
प्रीतीनें दहींभात । उच्छिष्ट गोवळ्यांचें खात ॥४॥
भक्तिसुखें भुलला हरि । एकाजनार्दनीं निर्धारीं ॥५॥

अभंग २१६५

भावें करा रे भजन

भावें करा रे भजन । भावेंक करा नामस्मरण ॥१॥
भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥
भावें करा प्रदक्षिणा । भावें करा जागरणा ॥३॥
भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ॥४॥

अभंग २१६६

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥
विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥
जनार्दनाचा एका प्रेमें तो आठवी । विठ्ठल साठवी हृदयामाजीं ॥३॥

अभंग २१६७

पाउला पाउली चिंतावी माउली

पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥
नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥
बैसलासे दृढ हृदयमंदिरी । सब्राह्माभ्यंतरीं कोंडोनियां ॥३॥
एकाजनार्दनीं जडला विठ्ठल । नोहें तो निर्बळ आतां कधीं ॥४॥

अभंग २१६८

बहु मतें बहु मतांतरें

बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥
अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥
विठ्ठल देवो जेथे उभे । पुढें शोभे पुंडलीक ॥३॥
एकाजनार्दनीं भ्रमर । कमळ परिकर विठोबा ॥४॥

अभंग २१६९

देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला

देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला ॥१॥
भाव कीं भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायीं ठेवा ॥२॥
अरे हें गुह्मा गोप्य कुडे करुं नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥
विलंब करितां पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥
शिकविलें नायकती वरिलें तें करिती । आपुलेनि कर्में आपण गुंतताती ॥५॥
एकाजनार्दनीं शीतळ भाव । आळसाचें देव दुर्‍हाविला ॥६॥

अभंग २१७०

सर्वाठायीं ज्याची सत्ता

सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥
ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥
आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥
ज्याचें आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥
जो सर्वांसी आधार । एका जनार्दनीं विश्वभंर ॥५॥

अभंग २१७१

भक्त देवातें भजती

भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती ॥१॥
ऐसा एकमेंकांचा ठावो । भक्ताअंगीं देव पहा हो ॥२॥
अलंकार एक सुवर्ण । तैसें नाहीं दुजेपण ॥३॥
एका आर्धी एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥

अभंग २१७२

एक एकाच्या भावा

एक एकाच्या भावा । गुंतुनीं ठेलेंक अनुभवा ॥१॥
प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥
उद्धरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ॥३॥
एका शरण जानार्दनीं । उदार हा जगदानी ॥४॥

अभंग २१७३

आधी देव पाठीं भक्त

आधी देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालते ॥१॥
हेंहि बोलणेंचि वाव । भक्ता आधीं कैचा देव ॥२॥
भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥
भक्तासाठीं अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥
वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ॥५॥

अभंग २१७४

सप्रेम करितां भजन

सप्रेम करितां भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥
भक्तांचे आधीन देवो । नाहीं नाहीं हो संदेहो ॥२॥
भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥
भक्तामाजीं देव असे । देवा अंगीं भक्त दिसे ॥४॥
ऐशी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥

अभंग २१७५

देव भक्त दोन्हीं समचि सारखें

देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥
भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥
ऐसीं परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

अभंग २१७६

भक्तांवांचुनी देवा

भक्तांवांचुनी देवा । कैचें रुप कैंचें नांवा ॥१॥
भक्तिं धरूनी आवडी । देवा लाविलीसे गोडी ॥२॥
भक्तांवाचुनीं पुसें कोण । देवा नाहीं महिमान ॥३॥
भक्ति करूनि निर्धार । देवा धरविला अवतार ॥४॥
उभयंता नोहे तुटी । एका जनार्दनीं मिठी ॥५॥

अभंग २१७७

देव म्हणे भक्तांसी आवडी

देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी ॥१॥
सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥
भाव भुज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥३॥
आवडीनें देव बोले । भक्तांमाजीं स्वयें खेळे ॥४॥
खेळतां गोपाळीं । एका जनार्दनीं गोकुळीं ॥५॥

अभंग २१७८

माझा भक्त मज अंतरीं

माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥
ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥
माझी सायुज्यता मुक्ति । घेउनी बळें मीच होती ॥३॥
सायुज्यापरीस भक्ती गोड । एका जनार्दनीं धरिती चाड ॥४॥

अभंग २१७९

बहु बोलाचें नाहीं कारण

बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह भक्ति आत्मा जाण ॥१॥
माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥
नांदे सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातील ॥३॥
एका जनार्दनीं भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥४॥

अभंग २१८०

नामरुप मज आणिलें जिहीं

नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥
भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥
भक्ताचेनी पालटे येतो गर्भवास । उपकार उतराई नोहे कैसा ॥३॥
एका जनार्दनीं उतराई नोहे । यालागीं भक्तांसी न विसंबें जीवें ॥४॥

अभंग २१८१

मज भक्त आवडता फार

मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥
भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥
मज आणलें नामरुपा । भक्त सखा माझा तो ॥३॥
एकाजनार्दनीं निर्गुण । भक्तें सगुण मज केलें ॥४॥

अभंग २१८२

तुमचे अप्रमाण होतां बोल

तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जीवित्व माझें ॥१॥
कासया वागवुं सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥२॥
तुमचा बोल व्हावा निका । हेंचि देखा मज प्रिय ॥३॥
मज यावें उणेपण । तुमचें थोरपण प्रकाशुं द्या ॥४॥
एका जनार्दनीं देव । स्वयमेव बोलती ॥५॥

अभंग २१८३

माझा ब्रीदावळी

माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥
तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥
तुमची न होते भेटी । मज दुःख पोटीं अनिवार ॥३॥
अंकिता अंकिलोंक तुमचा । एका जनार्दनीं सत्य साचा ॥४॥

अभंग २१८४

तुम्हासांठी उणेपण

तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥
प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥
घेउनी हातीं सुदर्शन । आलें विघ्न निवारी ॥३॥
दारवंटा राखीन तुमचा । एका जनार्दनीं साचा ब्रीद माझें ॥४॥

अभंग २१८५

देव गुज सांगे भक्तां

देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥
तुम्हालागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥
तुम्हां न यावें उणेपण । माझें थोरपण कोण वानी ॥३॥
म्हणोनि गळां घालीं मिठी । एका जनार्दनीं पडली गांठी ॥४॥

अभंग २१८६

भावें करितां माझी भक्ति

भावें करितां माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥
माझें भक्तीपरतें । साधन नाहीं वों निरुतें ॥२॥
माझें भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥
एका जनार्दनीं भाव । स्वयें बोलतसे देव ॥४॥

अभंग २१८७

जो जो कोणी भजनीं बैसे

जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥
उपासनेचा निर्वाहो । सर्वाभूति देवाधिदेवो ॥२॥
हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसें ॥३॥
तेथें करितां भावें भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥

अभंग २१८८

जे भजती मज जैसे वासना

जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥
जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥
हो का माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥
मी जनीं असोनीं निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥

अभंग २१८९

मज जे अनुसरले काय वाचा मनें

मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥
ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥
तयांचियां द्वारीं लक्षीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणें ॥३॥
सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनीं नेम जाणा माझा ॥४॥

अभंग २१९०

मजसि जेणें विकिलें शरीर

मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥
त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥
एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥३॥

अभंग २१९१

सर्व कर्म मदर्पण

सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥
न्य़ुन तें चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥
माझ्या ठायीं ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥
मन ठेवुनी माझ्या ठायीं । वसो कोठें भलते ठायीं ॥४॥
एकाजनार्दनीं मन । करा मजचि अर्पण ॥५॥

अभंग २१९२

साक्षात्कार होतां

साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां ॥१॥
माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥
माझें देखतां चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥
माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥
सर्वांठायीं मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥

अभंग २१९३

भाविकांच्या उदकासाठीं

भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥
भाविकांचें उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥
भाविकांचें उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥
ऐशी भाविकांची गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥

अभंग २१९४

स्वर्ग नरक इहलोक

स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥
भावें करितां माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥
गव्हांची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्न त्याची होतीं ॥३॥
द्रव्य जाहलें आपुलें हातीं । सकल पदार्थ घरां येती ॥४॥
एका जनार्दनीं बोध । सहज घडी एकविध ॥५॥

अभंग २१९५

माझा शरणागत न दिसे केविलवाणा

माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥
एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्त्वतां न विसंबें ॥३॥
एका जनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥

अभंग २१९६

माझा भक्त मज भीतरीं

माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥
बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
माझिया भक्तिसी जे लागले । ते तीच होउनी ठेले ॥३॥
एकाजनार्दनीं अभेद । तया हृदयीं मी गोविंद ॥४॥

अभंग २१९७

पुजी माझिया भक्तांतें

पुजी माझिया भक्तांतें । तेणें संतोष होत मातें ॥१॥
भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥
देवभक्तपण । वेगळीक नाहीं जाण ॥३॥
भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनीं लाधलो. ॥४॥

अभंग २१९८

वमिल्या मिष्टान्ना

वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥
ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥
जेथें कर्माचे परिपाठीं । हें तों पुन्हा नये गोष्टी ॥३॥
येव्हढें कथेचें महिमान । एका जनार्दनीं शरण ॥४॥

अभंग २१९९

भावें करितां माझी भक्ति

भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥
चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥
माझिया निजभक्ता । न बाधेचि संसारव्यथा ॥३॥
प्रल्हादा गांजिता जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्टीं ॥४॥
द्रौपदीं गांजिती तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळीं ॥५॥
गोकुळीं गांजितीं सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥६॥
अर्जुन प्रतिज्ञेचे वेळीं । म्यां लपविला हेळीं ॥७॥
अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिलें सावकाश ॥८॥
भक्तचरणींची माती । एका जनार्दनीं वंदिती ॥९॥

भक्तवत्सलता
अभंग २२००

जीं जीं भक्त बोलतीं वचनें

जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥
याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥
भक्तवचना उणेंपण । येऊं नेदी जाण निर्धारें ॥३॥
स्वयें गर्भवास सोशी । अंबऋषीकारणें ॥४॥
एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥