वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग २००१ ते २१००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग २००१ ते २१००

अभंग २००१

सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी

सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण ॥१॥
द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥
ऐसें नाथिलेंसी आपणा गोंविसी । एका जनार्दनीं बोल आम्हां कां ठेविसी ॥३॥

अभंग २००२

बळी आर्पिती देहासी

बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा ॥१॥
सांगा थोरपणा आहे कोण । घेतल्यावांचुन न देशी तूं ॥२॥
धर्म आधीं पूजा करीं । म्हणोनि घरीं राबसीं तूं ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा उदार । घेतां निर्धार देशीं तूं ॥४॥

अभंग २००३

नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास

नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥
नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणें कांहीं ॥२॥
नलगें इष्टमित्र सोईरें संबंधी । नको ही उपाधी पाठी लावूं ॥३॥
एका जनार्दनीं चुकवोनी पाल्हाळ । करी मज मोकळें गुरुराया ॥४॥

अभंग २००४

जय गोविंदा परमानंदा ऐक माझें बोल

जय गोविंदा परमानंदा ऐक माझें बोल । निर्गुणरुपें असतां तुझें कांहींच नव्हें मोल ।
मग तुं माया रुप धरणी अती जाहलासी सबळ । नसतें देवपणा अंगी आणुनी चाळविसी केवळ ॥१॥
ऐस लाघवी तूं रामा । नको चाळवुं आह्मां ॥ध्रु०॥
नसतां तुज मज भेद देवा लटिकें जीवपण देसी । आपुले ठायीं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी ।
नसती अविद्या पाठीं लावुनी संसारी गोंविसे । नाना कर्मे केलीं म्हणोनी आम्हा कां दंडिसी ॥२॥
मातें भावें भजिजे ऐसा उपदेश करिसी । आपुल्या भक्तां तारीन म्हणोनी प्रतापें बोलसी ।
निंदक दुर्जन अभक्त त्यांतें नरकी तूं घालिसी । आपुल्या स्वार्थालागुनी दुसरीयातें कां पीडिसी ॥३॥
आपुली महिमा वाढो म्हणोनि आम्हां भक्त केलें । लक्ष चौर्‍यायंशी योनी देउनी संसारीं गोविंले ।
भावें तुंतें न भजों म्हणोनि आकस आरंभिलें । तुज मज वैर देवा ऐसें करितां नव्हे भलें ॥४॥
ऐसें तुज मज वैर म्हणोनि गुरुसी शरण गेलों । देवभक्तपण कोण्या कर्में मग पुसों लागलों ।
सदगुरु म्हणती सर्वही मायिक निश्चयें बोलिलों । देव आणि भक्त एकचि गोष्टिसी पावलों ॥५॥
मग गृरुकृपें करुन तुझें गिळीन देवपण । तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण ।
जीव शिव दोन्हीं मिळोनी मग मे सुखें राहीनक । तुज मज रुप ना रेखा त्यांतें निर्धारीन ॥६॥
ऐसें भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता । विवेकबळें करुनि माझें देवपण उडवील आतां ।
यालागीं भिणें भक्तजनांसी ऐक्य करुनी तत्त्वतां । एका जनार्दनीं दरुशन द्यावें लागेल त्वरिता ॥७॥

अभंग २००५

संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पैं शरीर

संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पैं शरीर । एका पिसें लागे कांहींएक न करवें पंचभूतिक विकार ।
सुष्ट दुष्ट कर्में करितां हे शिणलें मळमुत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें उद्धरसी म्हणोनी दोष जर्जर ।
ऐसिया जीवतें उद्धरसी म्हणोनी ब्रीद साजे रघुवीर ॥१॥
यालागीं रामचंद्रा रामचंद्रा हृदयींक धरिली नाममुद्रा ॥धृ०॥
आशा तृष्णा दोन्ही स्नेहाळ नागिणी कामक्रोध हे विकार । त्यांचिया संगति विषयवृद्धि जाली लहरी दुःख दरिद्र ।
इंगळाचे शेजे अंथुरितां वरी तिकडिया अरुवार । ऐसा हा संसार जाणोनी दुस्तर ठाकियेलें तुझें द्वार ॥२॥
कौळींके रुप कपटीं धरियेलें ते त्वा साचार केले । साभिमान्या देव गुरुचक्रवर्ती त्रिभुवनीं यश थोरलें ।
पांखीरु वाचिया लोभाकारणें गणिकेसी कैवल्य दिधलें । दंभ प्रपंच वोळगंता जीव तया तुं सायुज्य देती आपुलें ॥३॥
श्रीवत्स ब्राह्मणें झालासी पामरा आतां तुं तें पद मिरवीसी दातार । चरणस्पर्शे त्वां अहिल्या उद्धरिली विस्मयो थोर सुरनरां ।
जे गती देवकिये तैसीच पुतनें विश्राम एका वो वरा । तुझें मुद्रांकित न भीयें कळिकाळा तुं स्वामीं सारंगधरा ॥४॥
वनीं सिंहाचें भय दाखविलें जसा जे बैसविली गजस्कंधीं । परमपुरुषा तुझें नाम उच्चारितां वोळंगताती ऋद्धिसिद्धि ।
उपमन्या आरतें क्षिरसिंधु दिधली येवढी प्रसन्नबुद्धी । न गणितां रावणु शरणागतु केला लंका निरोपली आंधीं ॥५॥
नर सुर किन्नर पन्नग यक्ष त्रासियलें संसारें । जाणोनि शुकदेव गर्भी स्थिरावला भयाभीत बोले उत्तरें ।
जननीयेच्या कष्टा निष्कृती व्हावया उपदेश केला दातारें । जीवन्मुक्त शुक मुनिजनां वरिष्ठ जपतांची ध्यानीं दोन अक्षरें ॥६॥
ऐसा सहस्त्रमुखें वर्णितां नातुडसी गा देवा धांडोळितां सिद्ध पंथ । जगदबंधु दीनानाथ समुद्धरण द्रौपदीचा वेळाईत ।
सुदामियांच्या दों पोह्माकारणें स्नेहें पसरिसी हात । एका जनार्दनीं जवळीं बोलउनी उच्छिष्ट प्रसाद देत ॥७॥

अभंग २००६

पायांवरी ठेवितां भाळ

पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥
बैसलें रुप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥
एका जनार्दनीं मंगल जाला । अवघा भरला हृदयीं ॥३॥

अभंग २००७

गोजिरें ठाण विठोबांचे

गोजिरें ठाण विठोबांचे । आवडी साचें बैसली ॥१॥
आणखी न धावें कोठें मन । समचरण पाहातांचि ॥२॥
नाहीं आन दुजी वासना । आवडी चरआणा बैसलासे ॥३॥
एका जनार्दनीं मन । सांडिन कुर्वंडी करुन ॥४॥

अभंग २००८

आलिंगनालागीं उतावेळ मन

आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥
मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥
देखिलिया मूर्ति सांवळी सगुण । मन नाहीं बंधन मना तुज ॥३॥
एका जनार्दनीं मन आवारिलें । दृढ तें ठेविलें विठ्ठलपायीं ॥४॥

अभंग २००९

पायीं जडलें माझे मन

पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान ॥१॥
तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आम्हां ॥२॥
कृपा केली तुम्हीं । लावियेलें आपुलें नामीं ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण कृपा । तेणें मार्ग जाला सोपा ॥४॥

अभंग २०१०

कुर्वडींन काया मन

कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां ॥१॥
ऐसा वेधी वेधक कान्हा । विटु मना बैसलासे ॥२॥
नावडे कांहीं दुजें चित्तीं । श्रीविठ्ठलमुर्ति पाहतांचि ॥३॥
एका जनार्दनीं ध्यान । सुकुमार गोजिरें ठाण ॥४॥

अभंग २०११

वेधोनि नेलें आमुचें मन

वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥
दृष्टी धांवें पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥
चरण उतावेळ चालतां पंथ । दुजा हेत नाहीं मनासी ॥३॥
एका जनार्दनीं डोई पायीं । दुजा भाव नाहीं इंद्रियां ॥४॥

अभंग २०१२

येणें पांडुरंग लावियेला चाळा

येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना ॥१॥
मनाचियें मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥
वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एका जनार्दना शरण होय ॥३॥

अभंग २०१३

देवासी कांहीं नेसणें नसे

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥
देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥
न लाजे तेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥
एका जनार्दनीं एकल्या काज । भक्ति तेणेंचि नेली लाज ॥४॥

अभंग २०१४

हरीचें पाहतां श्रीमुख

हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥
परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां हरी । हरिरुप दिसे चराचरी ॥३॥

अभंग २०१५

राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण

राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण । मनोहर ध्यान श्रीकृष्णाचें ॥१॥
शंख चक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेमभावें ॥२॥
मोक्ष अधिष्ठान पुण्य कीर्ति स्थान । पतितपावन पाडुरंग ॥३॥
जनार्दनीं देवाधिदेव । चित्तीं वासुदेव राहो सदा ॥४॥

अभंग २०१६

आनंद अद्वय नित्य निरामय

आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं ॥१॥
वेधु तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे ॥२॥
वेधलें मन झालें उन्मन । देखतां चरण गोड वाटे ॥३॥
पाहतां पावतां पारुषला जीव । एका जनार्दनीं देव कळों आला ॥४॥

अभंग २०१७

अष्टधातुवेगळा देखिला पुतळा

अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥
तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२॥
एका जनार्दनीं देखिला डोळां । जावीं जीवनकळा विठ्ठल देवो ॥३॥

अभंग २०१८

सर्वसुखाची उघडली खाणी

सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥
मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥
धनसुख मज कासया हें पोटीं । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥
स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥
एका जनार्दनीं नाशिवंत सुख । पाहतां तुझें मुख इच्छा पुरती ॥५॥

अभंग २०१९

नाम घेतां रुप आठवलें सांवळें

नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज ॥१॥
येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें चुकविली ॥२॥
चुकविली वस्ती एका जनार्दनीं । संसार सांडणें सांडोनियां ॥३॥

अभंग २०२०

तुमचें नामसंकीर्तन

तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान ॥१॥
तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥
तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥
तुमच्या प्रेमें आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥
एका जनार्दनीं सार । ब्रह्मारुप हा संसार ॥५॥

अभंग २०२१

भुक्तिमुक्तीस कारण

भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥
हरिकीर्तनाची जोडी । सकळ साधनें होतीं बापुडीं ॥२॥
शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन उचलिला करीं ॥३॥
निमाला गुरुपुत्र आणिला । मुखें दावाग्नी प्राशिला ॥४॥
तो सांवळां श्रीहरी । एका जनार्दनीं चरण धरी ॥५॥

अभंग २०२२

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥
पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥
पतीतपवान नामें तारिली गणिका । अजामेळ देखा सरता केला ॥३॥
पतितपावन नाम जनीं वनीं । एका जनार्दनीं नाम वाचे ॥४॥

अभंग २०२३

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥
ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान खुंटला पैं शब्द विठ्ठ्ल उद्धबोध सुख आम्हां ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठें सांगा ॥४॥

अभंग २०२४

भीवरेचे तीरीं उभा

भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥
विटेवरी समचरण । तेथें मन गुंतलें ॥२॥
संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वां न्यावें ॥३॥
उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥
एका जनार्दनीं बापमाय । वंदू पाय तयाचें ॥५॥

अभंग २०२५

घटघवीत वैकुंठनाथ

घटघवीत वैकुंठनाथ । भक्तवत्सल शोभत ॥१॥
तयाचे पायीं माझें मन । राहो वृत्तिसह जडोन ॥२॥
नेणें आणिक दुजा छंद । वाचें आठवीन गोविंद ॥३॥
एका जनार्दनीं कटीं कर । उभा चंद्रभागे तीर ॥४॥

अभंग २०२६

सायासाचा श्रम न करुं पसारा

सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां ॥१॥
गोडपणें मिठी पडलीसे जीवां । कायामनें हेवा दुजा नाहीं ॥२॥
या विठ्ठलापारतें न करीं साधन । देखेन समचरण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठलाची भेटी । सरलीसे तुटी गर्भवास ॥४॥

अभंग २०२७

मागें एक पुढें एक

मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख ॥१॥
ऐसा होतांची मिळाणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥
एक एक पाहतां दिठी । होय विठ्ठलेसी भेटी ॥३॥
एका सांडुनि दुजा नाहीं । एका जनार्दनीं ध्याई ॥४॥

अभंग २०२८

आम्हां नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु

आम्हां नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु । हृत्पदी विठठलु मिळतसे ॥१॥
आम्हां धातुं विठ्ठलु मातु विठ्ठलु । गातुं विठ्ठलु आनंदें ॥२॥
आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु । संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु । कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥
आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु । वक्ता विठ्ठलु वदनीं ॥५॥
आम्हां मनीं विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु । एका जनार्दनीं अवघा विठ्ठलु ॥६॥

अभंग २०२९

ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न

ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥
योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥
उन्मनी समाधी विठ्ठल बोला वाणी । तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥
मज भरंवसा कायामनेंवाचा । एक जनार्दनीं त्याचा शरणांगत ॥४॥

अभंग २०३०

एक विठ्ठल वदतां वाचे

एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती ॥१॥
बैसलासे ध्यानीं मनीं । विठ्ठलावांचुनीं दुजें नेणें ॥२॥
जावें तिकडे विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥३॥
एका जनार्दनीं भावें । विठ्ठल म्हणतां पाठी धांवें ॥४॥

अभंग २०३१

गातो एका ध्यातो एका

गातो एका ध्यातो एका । अंतरबाहीं पाहातों एका ॥१॥
अगुणां एक सगुणीं एका । गुणातीत पाहातो एका ॥२॥
जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखो एका ॥३॥
संत जना पढिये एका । जनार्दनीं कडिये एक ॥४॥

अभंग २०३२

वादविवाद अतिवाद

वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥
बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥
आणिकाची चाड चित्तीं । नाहीं नाहीं गा त्रिजगतीं ॥३॥
शरण एका जनार्दनीं । विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥

अभंग २०३३

एक विठ्ठलचिंतन

एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजें नेघे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥
हेचि एकविधा भक्ति । येणें जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथें घेती सर्वदा ॥२॥
तीर्थ ओढवती माथा । वंदिताती सर्वथा । तपांच्या चळथा । घडताती आपेआप ॥३॥
घडतें यज्ञाचें पुण्य । आणिक तया नाहीं बंधन । शरण एका जनार्दन । निश्चय ऐसा जयाचा ॥४॥

अभंग २०३४

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥
जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥
भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥
एका जनार्दनीं मनीं विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥

अभंग २०३५

एकपण पाहतां सृष्टी

एकपण पाहतां सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल ॥१॥
नाहें द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥
मीतुंपणा वोस ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥
ध्यानीं विठ्ठल मनीं विठ्ठल । एका जनार्दनीं अवघा विठ्ठल ॥४॥

अभंग २०३६

रिता ठाव न दिसें पाहतां

रिता ठाव न दिसें पाहतां । भरला पुरता विठ्ठल ॥१॥
जनीं वनीं विजनीं देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥
पाहतां पाहणें परतलें । विठ्ठलें व्यापिलेंक सर्वत्र ॥३॥
नाहीं पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥
एका जनादनीं व्यापक । विठ्ठल देख त्रिवभुनीं ॥५॥

अभंग २०३७

मागें पुढें विठ्ठल भरला

मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥१॥
जिकडे पहावें तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥
एका जनार्दनीं सर्व देशीं । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥

अभंग २०३८

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥
आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥
विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

अभंग २०३९

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥
जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥
एका जनार्दनीं केला लागपाठ । तेणें सोपी वाट वैकुंठीची ॥३॥

अभंग २०४०

रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप

रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥
पहातां पहाणें हरपलें देहीं । देहचि विदेही होउनी ठेलों ॥२॥
सांगतां नवल पाहतां सखोल । बोलतां अबोल चोज वाटे ॥३॥
एका जनार्दनीं बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥

अभंग २०४१

पाहतां पाहतांभुललें मन

पाहतां पाहतांभुललें मन । धरिलें चरण हृदयीं ॥१॥
वेधें वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥
तीर्थाचे जें अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥
सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥४॥

अभंग २०४२

वाचे विठ्ठल बोलावें

वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावें ॥१॥
ऐसा ज्याचा नेमधर्म । मुखीं विठ्ठलाचें नाम ॥२॥
सर्वकाळ वाचें । विठ्ठलनाम वदती साचें ॥३॥
कुळधर्म आमुचा । म्हणे एका जनार्दनाचा ॥४॥

अभंग २०४३

माझ्या मना लागो छंद

माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी । निरसेल आधिव्याधी ॥३॥
गोविंद हा जनीं वनीं । म्हणें एका जनार्दनीं ॥४॥

अभंग २०४४

शब्द आदि मध्य अंती

शब्द आदि मध्य अंती । उच्चारिता व्यक्ताव्यक्ति ॥१॥
विठ्ठल विठ्ठल जिव्हारी । मुक्ति होईल कामारी ॥२॥
विश्वीं विठ्ठल उघडा पाहे । मुक्त होतां वेळुं काये ॥३॥
एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभा नामासरिसा ॥४॥

अभंग २०४५

तंतुपट जेवीं एकत्व दिसती

तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥
सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥
एका जनार्दनीं व्यापक विठ्ठल । तेथें नाहीं बोल आन दुजा ॥३॥

अभंग २०४६

लाडिके विठोबाचे आम्हीं

लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें ॥१॥
उत्तम उत्तम साधन हें नाम । गांता प्रेम वाटे जीवीं ॥२॥
न कळेचि वेदां उपनिषद्‌बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्हीं ॥३॥
एका जनार्दनीं मंगळा मंगळ । न लगे आम्हां मोल उच्चारितां ॥४॥

अभंग २०४७

बहुत प्रकारें भक्तहि असती

बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥
तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥
एकविध तया शरण पैं जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥३॥
ऐसा लावण्य पुतळा देखिला दृष्टी । जनार्दनीं सुख न समाये सृष्टीं ॥४॥

अभंग २०४८

गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं

गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥
पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥
आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥
विठ्ठलावांचुनीं मनीं नाहीं आन । सर्वभावें प्रमाण विठ्ठल मज ॥४॥
एका जनार्दनीं जडला जिव्हारीं । विठ्ठल चराचरीं व्यापुनि ठेला ॥५॥

अभंग २०४९

सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी

सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥
देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवी श्रीविठ्ठल ॥२॥
गोपाळ गजरीं नाचतीं आनंदें । लीला विनोदें प्रेमरसें ॥३॥
भावाचा अंकित उगा रहए उभा । धन्य त्याची शोभा काय वानूं ॥४॥
पाहतां पाहतां मन धालें सृष्टी । जनार्दनाचा एका परमानंदें पोटीं ॥५॥

अभंग २०५०

परिपूर्णपणें उभा

परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । आम्हां जोडला वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥
तें सुख सांगतां कोडीं । पापें पळती बापुडीं । यमधर्म हात जोडी । न येचि तया गांवा ॥३॥
ऐसें एकविधभावाचे । संतचरण वंदिती साचे । एका जनार्दनीं त्यांचें । दर्शन दुर्लभ ॥४॥

अभंग २०५१

आजी दिवाळी दसरा

आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥
पायीं घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥
पाहूं हरींचें ध्यान । तेणें मना समाधान ॥३॥
एका जनार्दनीं भाव । विटे उभा विठ्ठलराव ॥४॥

अभंग २०५२

जगाचें जीवन मनाचें मोहन

जगाचें जीवन मनाचें मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल माझा ॥१॥
द्वैताद्वैताहुनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥
न कळे आगमां नेणवेचि दुर्गमा । एका जनार्दनीं आम्हां सांपडला ॥३॥

अभंग २०५३

सद्गदित कंठ बाष्प पैं दाटत

सद्गदित कंठ बाष्प पैं दाटत । जया भेटिलागीं हृदयें फुटत ॥१॥
तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापुनियां राहिला ॥२॥
सबराभरीत भरुनी पंढरीये उभा । सभोंवतीं दाटी संतांची शोभा ॥३॥
ऐसा लावण्य – पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनीं सुख न समय सृष्टी ॥४॥

अभंग २०५४

मन माझें वेधलें मन माझें वेधलें

मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥
आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥
एका जनार्दनीं उघडाचि देखिला । आनंद तो झाला मनीं माझ्या ॥३॥

अभंग २०५५

कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष

कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥
मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥
सहजची आवडी पाहतां समदृष्टी । वेधोनि गेली सृष्टी पाहतां गे माय ॥३॥
एका जनार्दनीं परात्पर शोभला । तेणें मज वेधेंक वेध लाविला गे माय ॥४॥

अभंग २०५६

सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु

सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पाहतां निवे आमुचें मनु ॥१॥
कान्हया परम गोजरीया । कान्हया परम गोजरीया ॥ध्रु०॥
तनु मन बोधलें चित्त विगुंतले । पाहतां पाहतां मना समाधान जालें ॥२॥
ऐसा कमलगर्भींचा कंदु उभा परमानंदु । एका जनार्दना वेधु मजलागे माय ॥३॥

अभंग २०५७

आजी दिवाळी दसरा

आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥
पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥
नाठवें कांहीं आन दुजें । विठ्ठलावांचुनी मनीं माझें ॥३॥
आशा केलीं तें पावलों । एका जनार्दनीं धन्य जालों ॥४॥

अभंग २०५८

निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा

निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥
जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥
एका जनार्दनीं पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥

अभंग २०५९

इंद्रिये कुंठित जालीं

इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहतां ॥१॥
वेधलें मन दुजें नेणें । विसरलें पेणें ताहानभूक ॥२॥
मदमत्सर समूळ गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥
काम क्रोध पळाले दुरी । आशा तृष्णा झडकरी लपाल्या ॥४॥
मन मनाधीन जालें । एका जनार्दनीं रूप देखिलें ॥५॥

अभंग २०६०

दृष्टी पाहतां बिठोबासी

दृष्टी पाहतां बिठोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥
ऐसा अनुभव मना । पाहें पाहें पंढरीराणा ॥२॥
एका दरुशनें मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥
एका जनार्दनीं गमन । गोजिरें विटें समचरण ॥४॥

अभंग २०६१

भेदबुद्धि पालटली

भेदबुद्धि पालटली । कृपा या विठ्ठलीं केली मज ॥१॥
प्रकाश जाहला देहादेहीं । वासना प्रवाहीं वहावली ॥२॥
विषयांचें तें लिगाड । जाहलें देशोधडी आपोआप ॥३॥
एका जनार्दनीं शरण । काया वाचा आणि मन ॥४॥

अभंग २०६२

विसर तो अवघा जाहला

विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां ॥१॥
निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥
इंद्रियाची होती चाली । निवांत राहिली एकरुप ॥३॥
दुजेपणाचा भेद गेला । एका ठेला जनार्दनीं ॥४॥

अभंग २०६३

सर्व सिद्धि मनोरथ

सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहातां ॥१॥
दैन्य दरिद्र्य तें गेलें । सुंदर पाउलें पाहतां ॥२॥
विषयांतें पळ सुटला । सुंदर सांवळां पाहतां ॥३॥
काम क्रोध विलया गेले । श्रीमुख चांगलें न्याहाळितां ॥४॥
एका जनार्दनीं बरें जाहलें । सुंदर देखिलें समचरणक ॥५॥

अभंग २०६४

देखणा जाहलों देखणां जाहलों

देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥
जन्ममरण विसरलें । पाहतां पाहणें हारपलें ॥२॥
तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥
एका जनार्दनीं देव । धरिला ठाव न सोडीं ॥४॥

अभंग २०६५

जन्ममरणाचें तुटलें सांकडें

जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥
डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥
एका जनार्दनीं संशयाचें नाहीं । जन्ममरण देहीं पुन्हा नये ॥३॥

अभंग २०६६

कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें

कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥
आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥
योगयाग तप न लगे आचरण कांहीं । सुलभ सोपारा वसे सर्वांठायीं ॥३॥
वेदशास्त्र श्रमलें पुराणें भांडतीं । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥
एका जनार्दनीं पहात आनंदें मन । तद्रुपति झालें जनीं सर्व जनार्दन ॥५॥

अभंग २०६७

धन्य धन्य विठ्ठल देव

धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें ॥१॥
जाउनी घाला पायीं मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥
दरुशनें तारी जडजीव । निवारी भेव यमाचें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ध्यानीं मनीं विठ्ठल ॥४॥

अभंग २०६८

नागर गोमटें रुप तें गोजिरें

नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं ॥१॥
पहातां विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥
भक्ताचिया काजा राहिलासे उभा । कैवाल्याचा गाभा बालमूर्ति ॥३॥
आनंदाचा कंद उभा परमानंद । एका जनार्दनीं छंद मज त्याचा ॥४॥

अभंग २०६९

गोमटें गोजिरें पाउलें साजिरें

गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी ॥१॥
वेध तो तयाचा मनें कायावाचा । दुजा छंद साचा नाही मना ॥२॥
इंद्रिये धांवतों आकळती ठायीं । विठोबाचे पायीं ठेवियलें ॥३॥
एका जनार्दनीं वेधलेंसे मन । धरुनी चरण दृढ ठेलों ॥४॥

अभंग २०७०

उपासना धरुनी जीवीं

उपासना धरुनी जीवीं । आलों गांवीं विठोबाच्या ॥१॥
उभयतांच्या दरुशनें । जाहलें पारणें जीवशिवा ॥२॥
कष्टलों होतों दाहीं दिशा । पाहतां अशा निमाली ॥३॥
केला परिहार श्रम । उरला नाहीं भवभ्रम ॥४॥
जडलें सदा पायीं मन । आतां न करीं साधन ॥५॥
जाहलों जीवें भावें दास । एका जनार्दनीं पुरली आस ॥६॥

अभंग २०७१

पाहतां पाहतां परतलें मन

पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें ॥१॥
संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥
एका जनार्दनीं मनींच बैसला । नवजे संचला दीपु जैसा ॥३॥

अभंग २०७२

न माये ध्यानीं योगिया चिंतनीं

न माये ध्यानीं योगिया चिंतनीं । नाचतो कीर्तनीं संतापुढें ॥१॥
डोळियाची धणी फिटलीं पारणीं । उभा तो सज्जनीं पंढरीये ॥२॥
एका जनार्दनीं देखियेला डोळां । परब्रह्मा पुतळा बाईये वो ॥३॥

अभंग २०७३

इच्छा केली तें पावलों

इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों ॥१॥
होते सुकृत पदरीं । तुमचें चरण देखिलें हरी ॥२॥
गेले भय आणी चिंता । कृतकृत्य जाहलों आतां ॥३॥
आजी पुरला नवस । एका जनार्दनीं जाहलों दास ॥४॥

अभंग २०७४

धरिला देव आवाडी मिठी

धरिला देव आवाडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मीं ॥१॥
हाचि मुख्य भाव साचा । तुटला जन्माचा विसर ॥२॥
एकपणें पाहतां पोटीं । एका जनार्दनीं जाहली भेटी ॥३॥

अभंग २०७५

अवघें या रे चला जाऊं

अवघें या रे चला जाऊं । विठ्ठल रखुमाई पाहुं ॥१॥
अवघे ते भाग्याचें । नाम घेती विठ्ठलाचें ॥२॥
अवघे ब्रह्माज्ञानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

अभंग २०७६

अवघें साधनें साधिलें

अवघें साधनें साधिलें । अवघें विठ्ठलरुप जालें ॥१॥
अवघें कर्म नेणतीं धर्म । अवघा तया परब्रह्मा ॥२॥
अवघी सिद्धि समाधी । अवघी तुटली आधिव्याधी ॥३॥
अवघें जालें एकरुप । एक जनार्दनीं स्वरुप ॥४॥

अभंग २०७७

अवघे ते दैवाचे

अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥
अवघा धंदा दुजा नाहीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥
अवघीं कर्में घडलीं तया । अवघें विठ्ठलाचि पायां ॥४॥
अवघा एका जनार्दनीं । अवघा जनीं जनार्दनीं ॥५॥

अभंग २०७८

अवघेंची सुख तयासी जोडलें

अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची ॥१॥
अवघें ब्रह्मारुप नाहीं कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥
अवघे ते धन्य क्षेत्रवासी दैवाचे । एका जनार्दनीं वाचे विठ्ठल वदती ॥३॥

अभंग २०७९

अवघा सुखचा आनंद

अवघा सुखचा आनंद । अवघा विटेवर परमानंद ॥१॥
अवघें चराचर सुख । अवघे जालिया विमुख ॥२॥
अवघे डोळे भरुनी पहा । अवघे सुखें पूर्ण व्हा ॥३॥
अवघा अंतरीं आठवा । एका जनार्दनीं साठवा ॥४॥

अभंग २०८०

अवघें संतां एकमेळ

अवघें संतां एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥
अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥
अवघे एकभावी । एका जनार्दनीं सोहंभावी ॥३॥

अभंग २०८१

सदा सुरवर सुख तें इच्छिती

सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा ॥१॥
सोइरा धाइरा आन दुजा नाहीं । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥
सज्जन सांगती आन नाहीं आम्हां । एका जनार्दनीं प्रेमा वसें देहीं ॥३॥

अभंग २०८२

एक मागें एक पुढें

एक मागें एक पुढें । उभें रोकडें असती ॥१॥
चला जाऊं तया ठाया । पाहुं सखया आवडी ॥२॥
एक एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥
बहु युगें जाहलीं पाहतां । खालीं न बैसती उभयतां ॥४॥
आनंदीं आनंद मना होय । एका जनार्दनीं पाहुनीं धाय ॥५॥

अभंग २०८३

योगी ध्याती जया चिंतिती मानसी

योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥
जाऊं लवलाहे पाहूं पैं चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडें । ब्रह्मा फाडोवाडें विटेवरी ॥३॥

अभंग २०८४

नीळवर्ण घनःश्याम

नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥
चला जाऊं तया गांवा । उगवुं गोवां तांतडीं ॥२॥
भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचें ॥३॥
साधे साधन फुकटचे । एका जनार्दनीं भाक साची ॥४॥

अभंग २०८५

पहा पहा विठ्ठलमुख

पहा पहा विठ्ठलमुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥
पहातां राउळाची ध्वजा । पुर्वज उद्धरती सहजा ॥२॥
कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥
चंद्रभागा करितां स्नान । कोटी तीर्थाचें मार्जन ॥४॥
पुंडलिका घेती भेटी । तयां वास तो वैकुंठी ॥५॥
एका जनार्दनीं प्रदक्षिणा । पार नाहीं त्यांच्या पुण्या ॥६॥

अभंग २०८६

भक्त देव एके ठायीं ते आवडी

भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥
पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥
संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥
एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥

अभंग २०८७

योगयाग तप जयासाठीं करणें

योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी ॥१॥
काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥
पताकांचे भार गर्जती हरिदास । होऊनी उदास सर्वभावें ॥३॥
एका जनार्दनीं नाहीं कामक्रोध । अवघा गोविंद हृदयीं त्यांचें ॥४॥

अभंग २०८८

पुढें गेले हरीचे दास

पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥
त्याची मार्गीं आम्हीं जाऊं । वाचे गाऊं विठ्ठला ॥२॥
संसाराचा न करुं धंदा । हरुषें सदा नाम गाऊं ॥३॥
एका जनार्दनीं डोळे । पहाती पाउलें कोंवळें ॥४॥

अभंग २०८९

योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन

योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥
विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥
संतांचा समुदाव आरत्यांची दाटी । नामघोष सृष्टी न समाय ॥३॥
आषाढी कार्तिक आनंद सोहळा । येती नरनारी बाळा पाहवया ॥४॥
एका जनार्दनीं पुरला मनोरथ । विठ्ठल पाहतां चित्त गुंतलेसे ॥५॥

अभंग २०९०

न लगें काहीं यासी मोल

न लगें काहीं यासी मोल । वेंचितां बोल फुकाचै ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वदा वाचे । नोहे आणिकांचें कारण ॥२॥
नाचा प्रेमें वाळूवंटी । घाला मिठी संतांची ॥३॥
एका जनार्दनीं उभा । विठ्ठ्ल शोभा अनुपम्य ॥४॥

अभंग २०९१

अवघे रंगलें रंगी

अवघे रंगलें रंगी । अवघे त्या पांडुरंगीं ॥१॥
अवघा दुजा भाव नाहीं । अवघे विठ्ठलची पाही ॥२॥
अवघे आनंदें नाचती । अवघे रंगीं त्या गाती ॥३॥
अवघे भळे भोळे । अवघे प्रेमाचे आगळे ॥४॥
अवघा जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥५॥

अभंग २०९२

नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें

नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥
जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥
साधन आणीक नेणें मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । मुखीं नाम गाय सदोदित ॥४॥

अभंग २०९३

प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ

प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥
प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥
जनार्दनाचा एक रंगला चरणीं । निजरंगीं रंगोनि मिळोनि गेला ॥३॥

अभंग २०९४

त्रिभुवनापरती पंढरीये पेठ

त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥
पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥
उभा विटेवरी घेऊनी बुंथी । शंख चक्र गदा पद्म हातीं शोभती ॥३॥
राहीं रुक्मिणी उभ्या दोही दोबाही । चामरें मयुरपिच्छ ढाळिती ठायीं ॥४॥
एका जनार्दनीं पहातां रुप । पाहतां पाहतां जालें मन तद्रूप ॥५॥

अभंग २०९५

परलोकींचा सखाक उभा विटेवरी

परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥
चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटीं । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥
एका जनार्दनीं भेटतां तयासी । ऋद्धिसिद्धि दासी होती मग ॥३॥

अभंग २०९६

गोमटेंक नागर कटीं धरुनि कर

गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥
रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥
नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥
एका जनार्दनीं इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहतां ॥४॥

अभंग २०९७

उपवास पारणें न लागे समाधी

उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥
आम्हां विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखीं गावें नाम हातीं टाळीं ॥२॥
आनंदें बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥
एका जनार्दनीं मनाचें उन्मन । एका दरुशनें मुक्तिपद ॥४॥

अभंग २०९८

देव विसरला देवपणासी

देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला ॥१॥
नावडेचि वैकुंठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥
नावडे शेषशायी आसन । उभा जघन धरुनी विटे ॥३॥
ऐसा प्रेमाचा भुकेला । एका जनार्दनीं धाला ॥४॥

अभंग २०९९

जघन प्रमाण दावीत श्रीअनंत

जघन प्रमाण दावीत श्रीअनंत । या रे या रे म्हणत भेटावया ॥१॥
आवडीची धणी ध्या रे प्रेमभावें । संतचरणां द्यावें आलिंगन ॥२॥
कट धरूनि करीं समचि पाउलीं । उभा वनमाळी भक्तांसाठीं ॥३॥
जीवींचें जीवन मनाचें मोहन । सगुण हें ध्यान भक्तिकाजा ॥४॥
रूपाचें रूपस निर्गुणावेगळें । पहतां तो संतमेळे उभा असे ॥५॥
विटे नीट उभा आनदाचा कंद । पाहतां परमानंद सुख वाटे ॥६॥
एका जनार्दनीं भक्ताचिया काजा । उभारूनि भुजा वाट पाहे ॥७॥

अभंग २१००

नेणतियासी नेणता तो सान

नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥
योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहतां जाय ॥२॥
जाणते नेणते येती बरवे परी । दरुशनें उद्धरी जड जीव ॥३॥
एका जनार्दनीं सगुण निर्गुण । जाणतां नेणतां सर्व आपणाचि जाण ॥४॥