वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग १९०१ ते २०००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग १९०१ ते २०००

अभंग १९०१

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥
मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥
नाहीं तें ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचें जाहलें देवा ॥३॥
करें नाही केला दानधर्म कांहीं । ऐसा अपराधी पाहीं जाहलों देवा ॥४॥
चरणन चालती तीर्थयात्रेप्रती । ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥
एका जनार्दनीं संसारांचा छंद । नाहीं तो गोविंद आठविला ॥६॥

अभंग १९०२

कासया निर्मिला अपवित्र संसार

कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥
दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाहीं ॥२॥
ऐसी मी भुललों प्रपंच लिगाडीं । एक जनार्दनीं उडी घाली देवा ॥३॥

अभंग १९०३

कासया संसार लाविला छंद

कासया संसार लाविला छंद । तेणें हा गोविद अंतरला ॥१॥
न कळे दिवस जातो तेंकळेना । संसार फिरतसों ॥२॥
एका जनार्दनीं भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावें ॥३॥

अभंग १९०४

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं

आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥
कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥
मोह ममता भ्रांति ढकलिती कूपीं । दावीं पैं सोपी वाट आम्हां ॥३॥
जनार्दनाचा एका विनवी सर्वांतें । भजा एकचित्तें विठोबासे ॥४॥

अभंग १९०५

आशा पाश देवा नको या संसारी

आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥
सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥
एका जानर्दनीं मनोगत सिद्धि । कैं कृपानिधी पुरवाल ॥३॥

अभंग १९०६

जन्म जरा मरण व्याधी

जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥
लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥
विषयकर्दमाचें मेळीं । विठ्ठल वनमाळीं येवो आतां ॥३॥
एका जनार्दनीं ध्यास । अवघीं आस पायां पैं ॥४॥

अभंग १९०७

संचित माझे वोखटें देवा

संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा ॥१॥
पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥
एका जनार्दनीं शरण । कर्माची गहन पैं माझें ॥३॥

अभंग १९०८

धांव रे धांव आतां

धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥
तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥
विषय भोगितांना । देह पोसलें माझें । स्वाहित आठवेना । ध्यान चुकलों मी तुझें ॥३॥
विषया मिकलिलों । तुज शरण मी आलों । एका जनार्दनीं पायीं । लीन मी जाहलों ॥४॥

अभंग १९०९

धांव नारायण

धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥
संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥
कोण सोडवील आतां । तुजविन जी अनंता ॥३॥
तूचि मायबापा । निवारिसी सर्व तापा ॥४॥
एका जनार्दनीं पाय । धरुनियां चित्तीं राहे ॥५॥

अभंग १९१०

धांवे धांवे श्रीहरी

धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं ॥१॥
आडलियाचा विसांवा । धांवे पावे तुं केशवा ॥२॥
तूं दीनदयाळ हरी । आपुले आम्हां जतन करी ॥३॥
अंकित भक्तांचा । ऐसी बोले वेदवाचा ॥४॥
एकाएकीं जनार्दनीं । आठ सहस्त्र बोले वाणी ॥५॥

अभंग १९११

तुजविण आम्हां कोण आहें देवा

तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥
पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥
जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवी दातारा मायबापा ॥३॥
एका जनार्दनीं धांवे लवलाहीं । येवोनियां हृदयीं ठाव देई ॥४॥

अभंग १९१२

सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास

सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥
आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥
लौकिकांची चाड नाहीं मज शंका । तुम्हावांचुनी एका पाडुरंगा ॥३॥
एका जनार्दनीं पायाची आवडी । सर्व माझी जोडी नाम तुझें ॥४॥

अभंग १९१३

ब्रीदावळी करे आपुली जतन

ब्रीदावळी करे आपुली जतन । आलों मी शरण जनार्दन ॥१॥
राखीं माझी लाज पतित पतित । तुझा मुद्रांकित रंक एक ।२॥
काम क्रोध लोब दंभ अहंकार । हे हेहीं अनिवार सोसवेना ॥३॥
आशा मनीषा माया सखीया सांगातिणी । करिती गौसणी सदा जीवा ॥४॥
चित्त वित्त आशा लागलीसे पाठीं । इहीं जीवे साठी केली मज ॥५॥
जनार्दना शरण अनन्य पैं एका । काये वाचे देखा चरणीम विनटला ॥६॥

अभंग १९१४

तुमच्या चरणांपरतें

तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें ॥१॥
ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥
चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥
एका जानर्दनीं शरण । धरिलें चरण न सोडी जाण ॥४॥

अभंग १९१५

अहो करुणाकरा पतितपावना

अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें ॥१॥
दिन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देह शरण तुम्हां ॥२॥
आमुचें सांकडें वारुनिया देवा । द्यावी तुम्ही सेवा एका चित्तें ॥३॥
एका जनार्दनीं संकल्प हा दृढ । आतां नाहीं गुढ तुम्हापुढें ॥४॥

अभंग १९१८

त्रिभुवनीं तुमची थोरी

त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥
तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥
ब्रीद गाजे पतिताचें । तिहीं लोकी तुमचें साचें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । आम्हीं पतित तूं पावन ॥४॥

अभंग १९२०

पोटींचे बाळ अवगुणी वोखटें

पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥
तयापारी उदरा आलों जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्हीं ॥२॥
गुण नाहीं तेथे कर्म कैंचे धड । परी मायाबाप वाटतसे कोड ॥३॥
एका जनार्दनीं उद्भव साचें । म्हणोनि हरिदासा कौतुक त्यांचे ॥४॥

अभंग १९२१

जेणें जेणें आमुच्या मना समाधान

जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें करुं ध्यान तुमचें देवा ॥१॥
करुनाकर तुम्हीं पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥
भाकितसों कीव होऊनि उदास । आता निराश नका करुं ॥३॥
एका जनार्दनीं नका दुजें आतां । अहो रुक्मादेवीकांता पाडुरंगा ॥४॥

अभंग १९२२

शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा

शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥
तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥
करुणाकर तुम्ही भक्तांची जीवन । हें आम्हां वचन श्रुतिवाक्य ॥३॥
एका जनार्दनीं आलोंसें शरण । काया वाचा मन जडलें पायीं ॥४॥

अभंग १९२३

साचपणें माझें करावें धांवणें

साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥
अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥
एका जनार्दनीं माझा अभिमान । वाढविलें आपण म्हणोनियां ॥३॥

अभंग १९२४

बहु उतावीळ

बहु उतावीळ । पाडुरंग तु दयाळ ॥१॥
मागेंतरिलें बहुतां । माझी असो द्यावी चिंता ॥२॥
दयाळ तूं पाडुरंगा । मज धरावें वोसंगा ॥३॥
सेवा तुम्हीं देवा । केली दुर्बळाची केशवा ॥४॥
उचिताउचित । एका जर्नादनीं मात ॥५॥

अभंग १९२५

भजन नाही मी अकार्मी वायां

भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया ॥१॥
नीचानीच मीच एकु । मजवरी उपवरी वर्ते सकळ लोकु ॥२॥
अंधाअध अधोगत पाही । मजहुनी अंधाअंध कोनी नाहीं ॥३॥
एका जानर्दनीं नीच हा नेला । मुंगेयाचे पाई सगळा सामावला ॥४॥

अभंग १९२६

पंचाननें मज घेतलें वेढुन

पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें ॥१॥
गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥
तुजवांचून मजनाहीं आधार । एका जानर्दनीं पार उतरीं देवा ॥३॥

अभंग १९२७

अहो नारायणा

अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना ॥१॥
आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥
सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥
एका जनार्दनीं शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥

अभंग १९२८

थोर अन्यायी दयघना

थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या ॥१॥
वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥
कुर्वडीन आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । न करी उदास तयासी ॥४॥

अभंग १९२९

तुम्हीं कृपांवतं देव

तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा ॥१॥
सांपडलो काळाहातीं । उगवा गुंती तेवढी ॥२॥
माझें मन तुमचे चरणें । राहो चक्रपाणी सर्वदा ॥३॥
शरण एका जानर्दनीं । तुम्हीं धनी ब्रह्मांडीं ॥४॥

अभंग १९३०

आम्हां तुमचा भरंवसा

आम्हां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा ॥१॥
आपुली आपण जतन करा । ब्रीदावली हे दातारा ॥२॥
आम्हीं पतितांनी कोडें । तुम्हां घातलें सांकडें ॥३॥
शरण एका जानर्दनीं । मोक्ष मुक्ति तुमचें चरणीं ॥४॥

अभंग १९३१

वायां बोभाट अनंता

वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥
अपमानाचें भातुकें । तुम्हां सुखे देतील ॥२॥
एका परीस एक थोर । तुमचा बडिवार चालुं नदेती ॥३॥
विनती जनर्दनाचा एका । देवा लौकिका सांभाळा ॥४॥

अभंग १९३२

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥
हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥
एका जानर्दनीं त्रैलोकीं नाम । तुम्हीं तो निष्काम देवा बहु ॥३॥

अभंग १९३३

धांवण्या धांवतां न लावा उशीर

धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥
गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥
एका जनार्दनीं पतितपावन । हें तों तुम्हां वचन साजतसे ॥३॥

अभंग १९३४

जाणा पाळूं कळा

जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥
कां हो आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वेळें ॥२॥
पाहतं वास देऊनी धीर । कां हो पडियेला विसर ॥३॥
चित्त सर्व तुमचें पायीं । कृपावंत भेटी देईं ॥४॥
एका जनार्दनीं एकपणें । तया नाहीं दुजें पेणें ॥५॥

अभंग १९३५

तुम्हीं कूपाळु कृपाळु

तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥
म्हणोनि येतों काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥
एका जनार्दनीं देवा । सर्व सारुनि पायीं ठेवा ॥३॥

अभंग १९३६

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥
तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥
बापा जनार्दनीं कृपा करीं दान । सांभाळीं वचन आपुलें तें ॥३॥
एका जनार्दनीं भेटी देई देवा । संतपायीं भावा मिठी पडी ॥४॥

अभंग १९३७

आनदाचा भोग घालीन आसनीं

आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥
येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥
आपुलें म्हणावें सनाथ करावें । एका जानर्दना वंदावें संतजना ॥३॥

अभंग १९३८

कैं तयामागें चरण चालती

कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥
कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥
कैं हें भाळ ठेवीन चरणीं । कैं पायवनी घेईन सुखें ॥३॥
एका जनार्दनीं कैं होईल कृपादान । कैं नारायण प्रेमें भेटे ॥४॥

अभंग १९३९

वारंवार देही हेचिं पैं वासना

वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥
हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥
संअल्पासी कैं येईल । कैं धीरा धीर होईल मन ॥३॥
एक जनार्दनीं अखंड वासना । पुरवा नारायणा देउनी भेटी ॥४॥

अभंग १९४०

कृपाळु माउली उभी भीमातटीं

कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥
कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥
शुन्य स्थावर व्यापुनी वेगाळा राहे । एका जानार्दनीं वंदीन त्याचे पय ॥३॥

अभंग १९४१

हीच मुख्य उपासना

हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत ॥१॥
गुणदोष पाहुं नका । कीर्तनीं सुखा लुटवें ॥२॥
संतचरणीं सदा भाव । करा वाव संसार ॥३॥
लडिवाळ जनार्दनीं एका । कीव देखा भाकितसे ॥४॥

अभंग १९४२

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥
आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥
कैं हें मस्तक ठेवीन चरणीं । पाहीन डोळे भरुनी श्रीमुख तें ॥३॥
एका जनार्दनीं कैं होईन पात्र । नासेल समस्त तापत्रय ॥४॥

अभंग १९४३

माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें

माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें ॥१॥
घालुनी दंडवत लागेन मी पायीं । जीव हा उतराई करुनी सांडीं ॥२॥
कुर्वडीन काया तयावरुन भावें । जीवें वोवाळावें जीवलगा ॥३॥
आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी । तयांची मी थोरी काय वानुं ॥४॥
एका जनार्दनीं धन्य ते दैवाचे । निरंतर वाचे विठ्ठलनाम ॥५॥

अभंग १९४४

मागणें हेंचि माझे देवा

मागणें हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥
मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥
रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण ॥३॥
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनीं आस पुरवावी ॥४॥

अभंग १९४५

आम्ही दीन तूं दीनानाथ

आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥
आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥
आम्ही अनाथ तूं कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥
आम्ही दीन तूं वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥
नको धरुं दुजे आतां । कृपाळु तूं दीनानाथा ॥५॥
एका शरण जनार्दनीं । ऐसें चालत आलें दुरुनी ॥६॥

अभंग १९४६

संपत्ती संतती मजला नावडे

संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा ॥१॥
तुझ्या रुपी सुख माझिया लोचनां । आणिक नारायणा न पाहती ॥२॥
हस्त इच्छिताती तुज भेटावया । सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥
चित्त जडलें पायीं सदा सर्वकाळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥
एका जनार्दनीं तुझें नाम मुखीं । नको अणिका सुखीं गोवुं मज ॥५॥

अभंग १९४७

वारंवार संतसंग

वारंवार संतसंग । गाऊं अभंग हरि नाम ॥१॥
वाचे किर्ति पाय पंथीं । आणिकांची स्तुति न गाऊं ॥२॥
एकविधपणें राहूं । वाचे गाऊं विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनीं सेवा । तुमचें देवा दास्यत्व ॥४॥

अभंग १९४८

मज तो आणिक नाहीं चाड

मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची ॥१॥
वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥
कीर्तनीं नाचेन महाद्वारी । गरुडपारी कान धरुनी ॥३॥
ऐसें लडीवाळ तान्हें । एका जनार्दनें पोसणें ॥४॥

अभंग १९४९

माझें मन राखोनी पायीं

माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं ॥१॥
हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥
ब्रह्माज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥
भुक्ति मुक्ति नका आड । ब्रह्मा सायुज्यता भीड ॥४॥
लागती चरणा । शरण एका जनार्दना ॥५॥

अभंग १९५०

माझें मन अति चंचळ

माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ ॥१॥
मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥
सुखदुःखाचेम कारण । मनचि हें अधिष्ठान ॥३॥
एका जनार्दनीं शरण । मनें मनासी बंधन ॥४॥

अभंग १९५१

माझें मन राहो तुझे पायीं

माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई ॥१॥
जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठठल हरी ॥२॥
जन्मासी या भिणें । हें तों आम्हा लाजिरवाणें ॥३॥
मोक्ष मुक्तिंतें देवा । नको गोऊं तयाठाया ॥४॥
म्हणे जनार्दनीं एका । संतसंग द्यावा निका ॥५॥

अभंग १९५२

वाउगे बोल जाती वायां

वाउगे बोल जाती वायां । पंढरीराया कृपेविण ॥१॥
तुमचा छंद वसो मनीं । संतचरणीं वास सदा ॥२॥
नको आत्मस्थिति वायां शीण । तुम्हांवीण दयाळा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । मनाचें मोहन तुम्ही माझें ॥४॥

अभंग १९५३

जेथें जेथें मन जाईल वासना

जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥
वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥
भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥
एका जनार्दनीं नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥

अभंग १९५४

येवढा पुरवा मनींचा छंद

येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या ॥१॥
मग मी तुमच्या न सोडीं पायां । कारीन काया कुर्वंडीं ॥२॥
वारंवार क्षणक्षणा । संत चरणीं वंदीन ॥३॥
दुजा नका काहीं हेत । एका जनार्दनीं मागत ॥४॥

अभंग १९५५

मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें

मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा ॥१॥
या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊं गीतीं ॥२॥
जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनीं तिष्ठातसे ॥३॥
जनार्दनाचा एका म्हणे । कृपा करणें जागरणें ॥४॥

अभंग १९५६

सर्वभावें विनवणी

सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥
सदा रुप पहावें डोळां । वाचे चाळा हरिनाम ॥२॥
निजध्यास कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥
एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणीं ॥४॥

अभंग १९५७

आमुच्या निजसुखधामा

आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा ॥१॥
आम्हांवरी कृपा करा । उद्धरा दातारा दीनासी ॥२॥
देऊनियां नाम कीर्ति । वसवा मूर्ति हृदयीं ॥३॥
एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणी ॥४॥

अभंग १९५८

तुमचे वर्णितं पोवाडे

तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
तुमचे वर्णिती बाळलीला । तें तुज आवडे गोपाळा ॥२॥
तुमचें वर्णील हास्यमुख । त्यांचे छेदिसी संसारदुःख ॥३॥
तुमचे दृष्टीचे दरुशन । एका जनार्दनीं तें ध्यान ॥४॥

अभंग १९५९

कांहीं न करुं आणिक आन

कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे ॥१॥
पाहुं डोळेभरी मुख । तेणें सुख इंद्रियां ॥२॥
न करी कोना ताडातोडी । आहे खोडी दूर करुं ॥३॥
एका जनार्दनीं प्रमाण । वाचे नारायण आठवुं ॥४॥

अभंग १९६०

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम

श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥
डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥
अष्टभावें कंठीं दाटेन सगद्रद । सांडोनी भेदाभेद आन देवा ॥३॥
एका जनार्दनीं यापरतें प्रेम । आन नाहीं विषम मजपाशी ॥४॥

अभंग १९६१

तुम्हीं उदार कृपाळ

तुम्हीं उदार कृपाळ । मागें केलें प्रतिपाळ ॥१॥
तैसे मज सांभाळावें । वदनीं वदवावें नाम तुमचें ॥२॥
आशापाश नका मोह । याचा निःसंदेह पाडावा ॥३॥
एका जनार्दनीं विज्ञापना । परिसा दीन दासाची ॥४॥

अभंग १९६२

नेणें साधन पसारा

नेणें साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥
आवडी गाऊं तुझें नाम । तेणें पुरती सर्वकाम ॥२॥
आणिक न करुं चावटी । आगमनिगम आटाआटी ॥३॥
न करीं साधन कांहीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥

अभंग १९६३

देवा तुम्ही आहांत समर्थ

देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥
देणे द्याला तरी हेंचि द्यावें । संतचरंण मी वंदावें ॥२॥
दुजे मागणें सायासी । नाहीं नाहीं हषीकेशी ॥३॥
बोलतसे तोंडभरी । ऐसें नका म्हणें हरि ॥४॥
अंकित मी तुझा देवा । एका जनार्दनीं ठेवा ॥५॥

अभंग १९६४

दास्यत्व करीन मी देवा

दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही ॥१॥
देऊनियां कृपादान । निरवावें जाण संतांसी ॥२॥
मग ते धरितां आपुलें करीं । होती कामारी भुक्ति मुक्ति ॥३॥
एका जनार्दनीं शरण । तुमचें महिमान न कळे ॥४॥

अभंग १९६५

नामधारकाचा

नामधारकाचा । दास होईन मी साचा ॥१॥
आणिक नको थोरपण । वाचे वंदी त्याचे गुन ॥२॥
नामीं सदा वसो हेत । हेंचि मागणें मागत ॥३॥
हेंचि द्यावें कृपादान । एका जनार्दनीं शरण ॥४॥

अभंग १९६६

माझिया जीवीं आवडे

माझिया जीवीं आवडे । संतसमागम रोकडे ॥१॥
हेंचि द्यावें कृपादान । कृपाळू तूं नारायण ॥२॥
एका जनार्दनीं म्हणवी दास । त्याची पुरवावी आस ॥३॥

अभंग १९६७

तुम्ही उदार सर्वगुणें

तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥
काया वाचा आणि मन । केलें समर्पण तव चरणीं ॥२॥
आणिक नाहीं कांहीं चाड । सेवा दृढ संतांची ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । आहे आस पायांची ॥४॥

अभंग १९६८

दास्य करुं हरिदासाचें

दास्य करुं हरिदासाचें । तेणें जन्माचें सार्थक ॥१॥
बुद्धि वसो तुमचे नामीं । आणिका कामीं न गुंतो ॥२॥
संसार तो पारिखा जाहला । या विठ्ठला पाहतां ॥३॥
पालटला भेदाभेद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥

अभंग १९६९

हेचि देवासी विनंती

हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं ॥१॥
वास देई पंढरीचा । नामघोष कीर्तनाचा ॥२॥
सदा सर्वदा नाम मुखीं । दुर्जें नको कांही पारखीं ॥३॥
एका जनार्दनीं हरीचा दास । म्हणतां पुरें सर्व आस ॥४॥

अभंग १९७०

देवा माझे मन लागों तुझें चरणी

देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी ॥१॥
नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥२॥
पायीं तीर्थायात्रा मुखीं राम नाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणें नाहीं नाहीं देवा । एका जनार्दनीं सेवा दृढ देई ॥४॥

अभंग १९७१

उपासना हीच बरी

उपासना हीच बरी । वाचे हरि हरि म्हणावें ॥१।
कायदुसर्‍याचे काम । वाचें नाम आठवितां ॥२॥
चातकाचा जैसा नेम । पुर्न काम हरि हरि करी ॥३॥
एकविध आमुचा भाव । एका जनार्दनचि देव ॥४॥

अभंग १९७२

पुर्वीचिया मतांतरा

पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हां मार्ग ॥१॥
नाहीं कोठें गोंवा गुंतीं । ऐसें गर्जती हरिदास ॥२॥
वाचें नाम करें टाळी । साधन कली उत्तम हें ॥३॥
धालों कीर्तनीं प्रेमानंदें । वाचें आनंदें गाऊं गीत ॥४॥
एका जनार्दनीं धरली कास । नाहें आस दुसरी ॥५॥

अभंग १९७३

वरपांग सोंग नको माळा मुदी

वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥
प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाहीं आणिक तें ॥२॥
नाम मुखीं सदा संतांचा सांगात । प्रेम हृदयांत विठोबाचे ॥३॥
एका जनार्दनीं हा माझा निर्धार । जन्माची वेरझार तोडी देवा ॥४॥

अभंग १९७४

पायांचें चिंतन

पायांचें चिंतन । माझे हेंचि भजन ॥१॥
भजनाचा मुख्य भाव । चित्तीं चिंतन लवलाहीं ॥२॥
हेतु दुजा मनीं । ठेऊं नका चक्रपाणी ॥४॥
मज पायां परतें । नका ठेवुं जी निरुतें ॥५॥
कृपाळुंजी देवा । एका जनार्दनीं ठेवा ॥६॥

अभंग १९७५

गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा

गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥
न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायीं चित्त जडोनि राहो ॥२॥
वैष्णवांचा दास कामारी निःशेष । हेचि पुरवी आस दुजें नको ॥३॥
एका जनार्दनीं करीत विनंती । मागणें श्रीपति हेंचि द्यावें ॥४॥

अभंग १९७६

जयजयाची देवाधिदेवा

जयजयाची देवाधिदेवा । पंढरीरावा श्रीविठ्ठला ॥१॥
भुक्ति मुक्तिनका कांहीं । लिगाड तेहि मज आतां ॥२॥
भाळी भोळी घ्यावी सेवा । होचि देवा विनवणी ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पाया पैं ॥४॥

अभंग १९७७

माझें मन तेथें वसों

माझें मन तेथें वसों । आणीक नसों दुजें कांहीं ॥१॥
होईन हरीचा वारकरी । करीन वारी पंढरीची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । करी विनवणी येवढी ॥४॥

अभंग १९७८

हेंची माझी मणींची आस

हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥
नका कांही गुंतांगुतीं । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥
संसार तो फलकट । दाखवा आट पंढरी ॥३॥
एका जनार्दनीं विनंती । पुढती करुणा असो द्या ॥४॥

अभंग १९७९

तुमच्या सेवेचा महिमा

तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळें पुरुषोत्तमा ॥१॥
पुजा करणे कवणें रीती । नेणें जपमाळ हातीं ॥२॥
स्नानसंध्या न कळे कांहीं । मन असो तुझें पायीं ॥३॥
तुम्हां मागणें इतुकें । एका जनार्दनीं द्यावें कौतुकें ॥४॥

अभंग १९८०

शरण शरण नारायणा

शरण शरण नारायणा । आम्हां दीना तारावें ॥१॥
मागें बहु शीण पोटीं । पाडा तुटी तयाची ॥२॥
संसाराचा चुकवा हेवा । मागील उगवा गुंती ते ॥३॥
तुम्हीं कृपा केल्यावरी । मी निर्धारी पात्राची ॥४॥
शरण एका जनार्दनीं । तुम्हीं तो धनी त्रैलोक्याचे ॥५॥

अभंग १९८१

सर्वभावें शरणागत

सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥
आतां कळे तैसे करीं । तुम्हीं उदार श्रीहरी ॥२॥
मी आलों असे शरण । कृपा करणें उचितची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ऋद्धिसिद्धि तुमचे चरणीं ॥४॥

अभंग १९८२

शरण आलों तुझियां पायां

शरण आलों तुझियां पायां । कॄपानिधी देवराया ॥१॥
पशु उद्धरिलें गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥
ऐसा कृपेचा कोंवळा । भक्ता अधीन गोपाळा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । हीच लाधली निजखुण ॥४॥

अभंग १९८३

अहो देवा गुणनिधाना

अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक ॥१॥
माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥
हेंचि माझी करुणा करा । भक्ति अवधारा भोळी ते ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझा विनवणी परिसावी ॥४॥

अभंग १९८४

तुझिया कृपेचें पोसणें मी दीन

तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना ॥१॥
अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥
कदा नुपेक्षिसी आलिया शरण । हें मागोनी महिमान चालत आलें ॥३॥
एका जानार्दनीं कॄपेचा वोरस । करी जगदीश मजवरी ॥४॥

अभंग १९८५

मज तों अधिकार नाहीं

मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं ॥१॥
तुम्हीं पशु गजातें उद्धरिलें । गणिके तारिलें कुंटनीसी ॥२॥
ऐशी शरणागत माउली । एका जनार्दनीं साउली ॥३॥

अभंग १९८६

माझे मनोरथ चरणाची आवडी

माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥
वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥
एका जनार्दनीं पुरवी वासना । दुजें नारायणा नको कांहीं ॥३॥

अभंग १९८७

भक्ति माझी भोळी

भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥
अहो परिसा नारायणा । जाणोनि अंतरीच्या खुणा ॥२॥
नाहीं तुम्हा सांकडें कायीं । भुक्तिमुक्ति मागणें तेंही ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझीं विनवणी परिसावी ॥४॥

अभंग १९८८

सर्वाभुतीं तुझें रुप

सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप ॥१॥
इतुलें देईं अधोक्षाजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥
सकळांहुनी कई सान । सकळिका समसमान ॥३॥
सदा द्यावा संतसंग । अखंड कीर्तनीं अनुराग ॥४॥
निःशेष दवडोनियां स्वार्थ । अवघा करीं परमार्थ ॥५॥
एका जनार्दनीं मागें । नाहीं तरी घाला घालीन अंगे ॥६॥

अभंग १९८९

जेथें मुख्यत्वें करावी भक्ति

जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥
पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥
आयुष्य अंतवरी नामस्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णु शिवमूर्तींचें ध्यान । हेंच देणें सर्वथा ॥२॥
ऐकोनी ऐसें वचन । जनार्दन तुष्टला प्रेमें करुन । एका जनार्दनीं पाय धरुन । सप्रेमें आलिगिंला ॥३॥

अभंग १९९०

देव तुष्टला मय दे घे

देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥
देवा इतुली कृपा करीं । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥
आणिक कांहीं मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥
वैकुंठ देई रे एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥
क्षीरसागर शेषशयन । इतुकें न दे चाळवण ॥५॥
सोहं पद विसावून । देतां घेतां लाजिरवाणें ॥६॥
एका जनार्दनीं तुष्टला । सकल सर्वांगी घोटला ॥७॥

अभंग १९९१

उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें

उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें ॥१॥
नेणतीयांसी धांवसी तुं त्वरा । शाहणे वेरझारा मरताती ॥२॥
एका जनार्दनीं शरण एकपनीं । नेणतां जाणतांचरणीं तुझे देवा ॥३॥

अभंग १९९२

भाग्यहीन बहु असती

भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥
गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥
शरणागतां वज्रपंजर । हा बडिवार त्रिजगतीं ॥३॥
शरण एका जनार्दनीम । कैवल्यदानीं उदार ॥४॥

अभंग १९९३

ज्याचा केला अंगीकार

ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥
अरिमित्रां सम देणें । एकचि पेणें वैकुंठ ॥२॥
उत्तर मध्यम चांडाळ । देणें स्थळ एकची ॥३॥
एका जनार्दनीं भाकी कींव । उद्धारा जीव पातकी ॥४॥

अभंग १९९४

आम्हीं तो वासना भाजियेली बळें

आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥
सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥
एका जनार्दनीं खुंटली भावना । जनीं जनार्दना अभ्यासिलें ॥३॥

अभंग १९९५

माझें देईं मजलागुन

माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥
भक्तीचें ऋण देवा । देई माझें मज केशवा ॥२॥
माझें देतां जड काई । अभिलाषेंक धरीन पायीं ॥३॥
एका अभिलाषें फावला । एका जनार्दनीं उभा केला ॥४॥

अभंग १९९६

कीर्ति तुमची तिहीं लोकीं

कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिलें पातकी अपार ॥१॥
जाहला विश्वास आधीं मना । धरिलें चरणां दृढ मग ॥२॥
एका जनार्दनीं लडिवाळ । करा सांभाळ आतां माझा ॥३॥

अभंग १९९७

कृपाळु माधव तुं मुरारी

कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥
तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥
महा दोषांची दोषश्रेणीं । ती तारिली कुंटिणी ॥३॥
रामनाम जपे अनुदिनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

अभंग १९९८

वेव्हाराच्या ठाई

वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥
ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥
खवळलों तरी जाण गिळीन मीतूंपण । तेथें देवपण । उडवीन तुझें ॥३॥
जो सांगे पांचापाशीं । त्याचें तोडं तूं धरिसी । ठकडा कैसा होसी । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥

अभंग १९९९

जीहीं जाणितलें वर्मासी

जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥
घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥
बहुतांचें ठेवणें । बुडविलें येणें । शेख जीव घेणें । मागत्यासी ॥३॥
मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एका जनार्दनीं । जाती गोतपणें ॥४॥

अभंग २०००

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥
बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥
गर्भ न साहाती यातायाती जना । एका जनार्दनीं शरण वेगें ॥३॥
श्री संत एकनाथ