सर्वकाळ आठवीं पाय
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥
नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥
नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा ॥१॥
ऐसा पुराणीचा बोध । वाचे गोविंदा आठवा ॥२॥
एका जनार्दनीं वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥
नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥
भलते वेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावळी ॥२॥
न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥
एका जनार्दनीं नेम । सोपें नाम जपतां ॥४॥
नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥
नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥
नाम निजधीर मानुनी भरंवसा । गाती ते उल्हासा रात्रंदिन ॥३॥
एका जनार्दनीं ध्यानीं आणि मनीं । नाम संजीवनीं जपतसे ॥४॥
अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगें कासया करिसी ॥१॥
मनीं हरि धरीं मनीं हरि धरीं । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥
साधन फुकट वाउगे ते कष्ट । वेगें धरीं हरि वरिष्ठ मनामाजीं ॥३॥
साधन साधितां शिणताती मुनी । तो हरि कीर्तनीं नाचतसे ॥४॥
सायास न लगे करावें तें कांही । एका जनार्दनीं पायीं बुडी दिली ॥५॥
साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥
म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
सांडी सांडी थोरपण । व्हावें लीन कीर्तनीं ॥३॥
शरण एका जनार्दनीं । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥
सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥
करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ति ॥२॥
हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥
एक करितां हरिभक्ति । एका जनार्दनीं तृप्ती ॥४॥
असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥
प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥
हरि नाम वचन एकचि प्रमाण । हें तो अप्रमाण करील कोण ॥३॥
जनार्दनाचे वचनीं द्यावे अनुमोदन । एका जनार्दनीं प्रमण तेंचि होय ॥४॥
आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥
नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥
नाहीं येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥
एका शरण जनार्दनीं । जनार्दन जनीं वनीं ॥४॥
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥
काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥
धरुं वैष्णवांचा संग । टाकूं कुसंग लाजोनी ॥३॥
म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनीं निजदास ॥४॥
मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥
नित्यरामकृष्णहरी । वदतसे पैं वैखरी ॥२॥
करिती देवाचे पैं ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥
एका जनार्दनीं नाम । हेंचि पाववी निजधाम ॥४॥
महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखें ॥१॥
जगीं नाम तारक नौका । आन उपाय नाहीं देखां । साधन साधितां साधकां । नामापरते थोर नाहीं ॥२॥
धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनीं भय पोटीं । नाहीं तुम्हा काळाचें ॥३॥
टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥
न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥
ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणें ॥३॥
एका जनार्दनीं धरितां पायीं भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥
सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥
धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥
मन करीं गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनीं वाट । सोपी मग सहजची ॥३॥
येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥
गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥
गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥
प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥
दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥
एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥
देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन ॥१॥
मुगुट कुंडलें मेखळा । कांसे शोभे सोनसळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म । सदा उदार मेघःश्याम ॥३॥
ऐसा हृदयीं आठवा । एका जनार्दनीं सांठवा ॥४॥
जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥
अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥
अवतार चरित्र नामें । परिसतां निवारे कर्में ॥३॥
जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥
धन्य धन्य ते भाग्याचे । हरिगुण वर्णिती वाचे ॥५॥
कांहीं सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि देंहीं देव ॥६॥
एकपणे वेगळा । एका जनार्दनीं देखिला ॥७॥
जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरीं करीन महोत्सव ॥१॥
शांति सिंहासनीं बैसवीन भावें । बैसावें अवघें हारकारीन ॥२॥
द्वैत विसरुनि करीन पादपुजा । तेणें गरुडध्वजा पंचामृत ॥३॥
शुद्धोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञानें स्वरुपासी परिमार्जन ॥४॥
सत्त्व क्षीरोदक देवानेसवीन । राजन प्रावर्ण पीतांबर ॥५॥
दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिती लेईल स्वामी माझा ॥६॥
भक्त नवविध घालूनि सिंहासन । एका जनार्दनीं पूजा करी ॥७॥
पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥
करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥
एका जनार्दनीं सर्व भावें पूजन । जनीं जनार्दन पूजियेला ॥३॥
संत साहित्य, अभंग, ओव्या आणि ग्रंथांचा समृद्ध मराठी संग्रह. वारकरी परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हा आमचा प्रयत्न.
मेन्यू मुखपृष्ठ ग्रंथ अभंग/भजन संत विभाग संपर्क vakibhmedia@gmail.com +91 99239 16476 पुणे, महाराष्ट्र© २०२६ वाकीभ. सर्व हक्क सुरक्षित.
हरिचिया दासां दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरि मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणें ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरुप ॥३॥
हरिरुप झाले जाणणें हरपलें । नेणणें तें गेलें हरीचें ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यानीं हरिरुप मनीं । एका जनार्दनीं हरी बोला ॥५॥
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥
नको नको मान नकों अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥
सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥
मार्ग जया कळें भाव भक्तिबळें । जगाचियें मळें न दिसती ॥४॥
दिसती जनीं वनींप्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१॥
सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरिसंगे ॥५॥
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥
वैष्णवांचे गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव तोचि दोन्ही । एकाजनार्दनी ऐसें केलें ॥५॥
नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥
वैष्णवांचें गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥
आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥
एकाकार झाले जीव तेचि दोन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरीविण ॥१॥
वेदाचेंहि बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥
योगायाग व्रत नेम धर्म दान । न लगे साधन जपतां हरी ॥३॥
साधनाचे सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यासिद्धि ॥४॥
नित्य मुक्त तोची एक ब्रह्माज्ञानी । एका जनार्दनें हरिबोला ॥५॥
बहुतां सुकृतां नरदेह लाधला । भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥
बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मुढा ॥२॥
अनेका जन्माचें सुकृत पदरीं । त्याचें मुखा हरि पैठा होय ॥३॥
राव रंक हो कां उंच नीच याती । भक्ति विण माती मुखीं त्याच्या ॥४॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें ॥१॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥
वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैंचा ॥३॥
एका तासामाजीं कोटीं वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तोची ॥४॥
एका जानर्दनीं ऐसें किती झाले । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१॥
काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥
पातके करितां पुढें आहे पुसतां । काय उत्तर देता होशील तुं ॥३॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥
एका जनार्दनीं सांगताहे तोंडे । आहा वांचा रडे बोलताची ॥५॥
स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥
हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥
ब्रह्मा डोळसां तें वेदार्थ नाकळे । तेथें हे आंधळें व्यर्थ होती ॥३॥
वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥
वेदांची हीं बीजाक्षरें हरि दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१॥
सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥
तत्सादिति ऐसे पैल वस्तुवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥
हरिपदप्राप्ति भोळ्यां भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥
अस्ति भाति प्रिय ऐशी पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण ॥१॥
निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥
बहुरुपी धरी संन्याशाचा वेश । पाहोन तयास धन देती ॥३॥
संन्याशाल नाहीं बहुरुपीं याला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरी पवित्र तो ॥२॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेंमें ॥३॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
वैष्णवांचें गुह्मा काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतं खेळतां हरि बोल ॥१॥
हरि बोला हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागा अंती हरि बोला ॥३॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥
कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥
जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरि ॥३॥
शक्तिवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जुवरीं भासे मिथ्या सर्प ॥४॥
क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि ॥१॥
दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥
इच्छावें तें जवळी हरीचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥
एका जनार्दनीं सांपडलीं खुण । कल्पना अभिमानी हरि झाल ॥५॥
काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥
अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करुं नये ॥२॥
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवुं नये ॥३॥
खळाची संगतेरे उपयोगासी नये । आपण अपाय त्याचे संगे ॥४॥
वैष्णवीं कृपथ्य टाकिलें वाकुळीं । एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥
न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसें ते गा ॥१॥
प्रेमाविण भजन नकाविण मोतीं । अर्थाविण पोथी वाचुनी कय ॥२॥
कुंकुवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव । भावविण देव कैसा पावे ॥३॥
नुतापविण भाव कैसा राहे । अनुभवे पाहे शोधुनियां ॥४॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्य शेवटीं देह तैसा ॥१॥
घदिघडी काळ वाट याची पाहे । अझुनि किती आहे अवकाश ॥२॥
हाचि अनुताप घेऊनि सावाध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥
एक तास उरला खटवांगरायासी । भाग्यदशा कैसीप्राप्त झाली ॥४॥
सांपडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
करा रे बापानों साधन हरीचें । झणीं करणीचें करुं नका ॥१॥
जेणें नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥
साधनांचे सार मंत्रबीज हरि । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनामा जपतां घडे ॥४॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरुपा ॥५॥
बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥
सहस्त्र मुखांचां वर्णितां भागला । हर्ष जया झाल तेणें सुखें ॥२॥
वेद जाणूं गेला पुढें मौनावला । तें गुह्मा तुजला प्राप्त कैंचें ॥३॥
पूर्व सुकृताचा पुर्ण अभ्यासाचा । दास सदगुरुचा तोचि जाणें ॥४॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥
शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥
या रे या रे धरुं हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाहीं ॥३॥
साधुसंत गेले आनंदीं राहिलें । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥
एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलविण सर्व वस्तु ॥५॥
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद धरुं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥
जैशी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहें संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ॥५॥
दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥
हरिकृपा होतां भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगी ॥२॥
देव भक्त दोन्हीं एकरुप झाले । मुळीचें संचलें जैसे तैसे ॥३॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥
एका जनार्दनीं कल्पाचि मुराला । तोचि हरि झाला ब्रह्मारुप ॥५॥
मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥
कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणें येथुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥
ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥
चिंतनें तुटे आधीव्याधी । चिंतने तुटतसे उपाधी । चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥३॥
चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥
म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥
चिंतन आअनीं शयनीं । भोजनीं आणि गमनागमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचें ॥३॥
चिंतन हेंची तप थोरा । चिंतनें साधे सर्व संसार । एका जनार्दनीं निर्धार । नामस्मरण चिंतन ॥४॥
हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतनें ॥१॥
करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥
हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनी । शरण एका जनार्दनीं । रामनाम चिंतावें ॥३॥
चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥
चिंतन करितां द्रौपदीं । पावलासें भलते संधीं । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥
चिंतनें रक्षिलें अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होऊनी अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥
चिंतनें प्रल्हाद तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला । एका जनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥४॥
चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतनें ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥
चिंतनें भोळे भाविक जन । तयाचें वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥
चिंतनासाठीं सारथी जाहला । चिंतनासाठी उभा ठेला । चिंतनेची गोविला । पुंडलिकें अद्यापी ॥३॥
चिंतनें उभा विटेवरी । न बैसे अद्यापि वरी । एका जनार्दनीं निर्धारी । चिंतन सोपें सर्वांत ॥४॥
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥
एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥
चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥
चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥
पुराणें डांगोरा पिटती । चिंतनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नाना युक्ति । नाम चिंता श्रीरामाचें ॥३॥
एवढें चिंतनाचें बळ । एका जनार्दनीं कृपाळ । यम काळवंदी सकळ । नामचिंतनीं सर्वदा ॥४॥
चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥
हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥
चौर्यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी । सांडोनी वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥
एका जनार्दनीं चिंतन । वाचे वदा परिपूर्ण । तेणें घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥
चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥
एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥
भुक्तिमुक्तीचें सांकडें । तया न पडेचि बापुडें । चिंतनेंची कोंडें । सर्व हरे तयांचे ॥३॥
एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधून । चिंतनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥
चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन तें सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥
चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम । आणिक तें वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥
चिंतनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण । नाना तीर्थाचें भ्रमण । चिंतनें होय ठायींच ॥३॥
ऐसा चिंतनमहिमा । नाहीं आणिक उपमा । एका जनार्दनीं प्रेम । चिंतनें चिंतिता ॥४॥
चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥
नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥
चिंतनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परिक्षित । ऐसें अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥
चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारी । वाचे उच्चारितां हरि । मोक्षधामीं बैसविली ॥४॥
चिंतनें हनुमंता समाधी । तुटोनि गेली आधिव्याधी । एका जनार्दनीं बुद्धि । चिंतनीच जडलीसे ॥५॥
चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावें हरि होय ॥१॥
आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥
ऐसा एकविध भावें । चिंतन असो मनीं जीवें । एका जनार्दनी देव । तया पाठीं धांवतसे ॥३॥
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥
धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥
न धरी माझें आणि तुझें । भार घाली पारे वोझें । एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ॥३॥
पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥
दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥
एका जनार्दनीं भाव । नपेक्षी तया देव । करुनि संसार वाव । निजपदी ठाव देतुसे ॥३॥
देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥
तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥
ध्यानीं मनींनारायण । सदा सर्वदा हें चिंतन । एका जनार्दन मन । जडलेंसे हरिपायीं ॥३॥
चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥
मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥
हेंचि सर्वांशी माहेर । भुवैकुंठ पंढरपुर । एका जनार्दनीं नर । धन्य जाणा तेथीचे ॥३॥
चिंतन तें करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वायां व्यत्पुत्तीचा भार ॥२॥
नको जप तप अनुष्ठान । वाचे वदे नारायण ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघा देहीं पाहें देव ॥४॥
ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥
हास्य विनोंदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥
एका जनार्दनीं धरीं विश्वास । नामें नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥
पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥
गणिका पांखिरूं नाम जपे सदा । नोहे तिसी बाधा गर्भवासा ॥३॥
एका जनार्दनीं कलीमाजीं नाम । उत्तम उत्तम जपा आधीं ॥४॥
दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥
नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥
जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी । शुकादिक जनींधन्य जाहलें ॥३॥
एका जनार्दनीं नाम परिपुर्ण । सांपडली खुण गुरुकृपें ॥४॥
नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥
तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥
मनीं माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतुं सदा कंठीं । एका जनार्दनीं परिपाठीं । नाहीं गोष्टीं दुसरी ॥३॥
नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सनातन ॥१॥
नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हेंजना तारक नाम ॥२॥
नाम तें पावन नाम तं कारण । नामापरतें साधन आन नाहीं ॥३॥
नाम ध्यानीं मनीं गातसें वदनीं । एका जनार्दनीं श्रेष्ठ नाम ॥४॥
नामाचा धारक । हरिहरां त्याचा धाक ॥१॥
ऐसें नाम समर्थ । त्रिभुवनीं तें विख्यात ॥२॥
नामें यज्ञयाम घडती । नामें उत्तम लोकी गती ॥३॥
नामें भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामें वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥
नामें सर्व सत्ता हातीं । नामें वैकुंठीं वसती ॥५॥
नामें होती चतुर्भूज । एका जनार्दनीं सतेज ॥६॥
अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं ॥१॥
तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकीं तिहीं सत्य ॥२॥
सर्वांतर सार नामजपु निका । जनार्दनाचा एका घोकितसें ॥३॥
सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥
सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥
सकळ ज्ञानाचें जें सार । मुखी नामाचा उच्चार ॥३॥
सकळ ब्रह्मा विद्येंचें जे घर । एका जनार्दनींचें माहेर ॥४॥
साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥
अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥
एका जनार्दनीं नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सुकरें ॥१॥
पडतां नाम घोष कानीं । पावन होती इयें जनीं ॥२॥
चतुष्पाद आणि तरुवर । नामें उद्धार सर्वांसी ॥३॥
उंच नीच नको याती । ब्राह्मणादी सर्व तरती ॥४॥
एका जनार्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद ॥५॥
नामामृत पुढे । कायसें अमृत बापुडें ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । गोडी जाणे गिरिजावर ॥२॥
नामें जोडें ब्रह्माज्ञान । भुक्ति मुक्ति नामें जाण ॥३॥
एका जनार्दनीं सार । ब्रह्माज्ञानाचें हें घर ॥४॥
नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी ॥१॥
नाम श्रेष्ठांचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥
नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥
नाम जपे हनुमंत । तेणे अंगीं शक्तिवंत ॥४॥
नाम जपे पुंडलीक । उभा वैकुंठनायक ॥५॥
नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥
अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥
दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वांस मुक्तिपद ॥३॥
एका जनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥
नामें पावन हीन याती । नाम जपती अहोरात्रीं । नामापरती विश्रांती । दुजी नाहीं प्राणियां ॥१॥
नका भ्रमुं सैरावैरा । वाउगे तप साधन पसारा । योग याग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥
व्रत तप हवन दान । नामें घडे तीर्थ स्नान । एका जनार्दनीं मन । स्थिर करुनि नाम जपा ॥३॥
अनामिकादि चांडाळ । नामें सकळ तारिले ॥१॥
ब्रह्माहत्या पापराशी । नामें वैकुंठवासी पावले ॥२॥
दुराचारी व्याभिचारी । गणिकानारी तारिली ॥३॥
एका जनार्दनीं नाम । मंगळधाम मंगला ॥४॥
नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥
तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥
घेउनी नामाचें अमृत । एका जनार्दनीं झाला तृप्त । म्हणोनि सर्वांते सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥
नाम तारक हें क्षितीं । तरलें आणि पुढे तरती ॥१॥
न लगे साधन मंडण । नामें सर्व पापदहन ॥२॥
योगयागांची परवडी । नामापुढें वायां गोडी ॥३॥
नाम वाचे आवडी घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥
नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजीं उद्धार ॥१॥
गातां नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥
एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक नाम । सोपें सुगम वर्म । भाविकांसी निर्धारें ॥३॥
नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं ॥१॥
ज्यांचे उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥
वेदशास्त्र विवेकीसंपन्न । नामें होताती पावन ॥३॥
नामें उत्तम अधमा गती । एका जनार्दनीं ध्यान चिंत्ती ॥४॥
नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥
देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥
द्वैत अद्वैत गेलेंक नेणें हारपलें । जाणणें तें गेलें जाणते ठायीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम तें अनाम । सर्वोत्तम नाम सर्वा ठायीं ॥४॥
दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां ॥१॥
नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥
आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनीं नाम । तरले तरती निष्काम ॥४॥
नामें पावन इये लोकीं । नामें पावन परलोकीं । नाम सदा ज्याचें मुखीं । धन्य तो नर संसारीं ॥१॥
नामें कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदतां ॥२॥
नाम गातां सुख वाटे । प्रेमे प्रेम तें कोंदाटें । एका जनार्दनीं भेटें । नाम गातां निश्चयें ॥३॥
नामें घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगतीं । दृढभावें आठवितां ॥१॥
म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥
मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा । एका जनार्दनीं सर्वेशा । नाम जपे अंतरीं ॥३॥
नामे प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भकंद । नाम तारक निर्धार ॥१॥
हेंचि मना दृढ धरीं । वांया नको पंडु फेरी । तेणें होसी हाव भरी । मग पतनीं पडशील ॥२॥
म्हणे एका जनार्दनीं । नामें तरती अधम जन । नामें होय प्राप्त पेणें । वैकुंठचि निर्धारें ॥३॥
नामें तारिले पातकी । नाम थोर तिहीं लोकीं । नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कलीं तारक ॥१॥
नको जाऊं वनांतरीं । रानीं वनीं आणि डोंगरी । बैसोनियां करीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥
नामें साधलें साधन । तुटले बहुतांचे बंधन । एका जनार्दनीं शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥
जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥
एक नाम सत्य सार । वाउगा पसार शीण तो ॥२॥
नामें प्राप्त ब्रह्मापद । नामें देह होय गोविंद ॥३॥
एका जनार्दनीं नाम । सर्व निरसे क्रोधकाम ॥४॥
सदा नामें घडे आचार । नामें साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥
शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठवितां ॥२॥
नामें साधे अष्टांग पवन । नामें साधे पंचाग्रि धूम्रपान । नामें एका जनार्दनीं भजन । नामें पावन देह होय ॥३॥
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥
चहुं वाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आम्ही गाऊं सदोदित । सोपें नाम ॥२॥
ऋद्धिसिद्धि धांवे पायीं । मुक्तिसे तो अवसर नाहीं । मुक्तीचा तो उपाय काहीं । हरिदास ॥३॥
एका जनार्दनीं भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥
श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिकर । दरुशनें सांगती आधार । वाचे नाम उच्चारा ॥१॥
तारक जगीं हें नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥
म्हणोनि धरिलें शिवें कंठीं । तेणें हळाहळ शमलें पोटीं । एका जनार्दनी गुह्मा गोष्टी । गिरजेंप्रति अनुवाद ॥३॥
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥
शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं संताचें हे मत । नामे तरती पतित असंख्यात ॥३॥
कष्ट न करितां योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कां बा ॥१॥
नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जोडे ॥२॥
एका जनार्दनीं नको योगयाग । म्हणावा श्रीरंग वाचे सदा ॥३॥
योगयाग तप व्रतें आचरितां । नाम सोपें गातांसर्व जोडें ॥१॥
पाहोनियां प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥
एका जनार्दनीं नामाचा महिमा । वर्णितां उपरमा शेष आला ॥३॥
करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥
नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥
नामापरतां दुजा मंत्र । नाहींनाहीं धुंडितां शास्त्र ॥३॥
एका जनार्दनीं नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥
सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥
अखंड वैराग्य बाणलें अंगी । म्हणोनि वंद्य सर्वा जगीं ॥३॥
एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचे ॥४॥
कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥
ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥
हरिचिया दासा साचें । भय नाहीं कळिकाळाचें ॥३॥
एका जनार्दनीं काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥
जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥
नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥
नामासाठी मागें धावें । इच्छिअलें तेणे पुरवावें ॥३॥
यातीकुळ तयाचें । न पाहे कांही सांचें ॥४॥
वर्णाची तों चाड नाहीं । नाम गातां उभा नाहीं ॥५॥
एका जनार्दनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ॥६॥
आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥
ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥
एका जनार्दनीं नाम । सोपें सोपें हो सुगम । तरावया आन नाहीं धाम । नामावांचुन सर्वथा ॥३॥
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥
एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरुनी ॥२॥
एकाचि उगेचि धरुनि आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनीं त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ॥३॥
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥
करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥
करी नीच काम नाहीं थोरपण । खाय भाजींचें आनंदें पान । तृप्त होय एका जनार्दनीं । तेणें समाधान होतसें ॥३॥
जुळणारे अभंग सापडले नाहीत.
जुळणारे अभंग सापडले नाहीत.