वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग १२०१ ते १३००

अभंग क्रमांकानुसार परत जा

संत एकनाथ अभंग १२०१ ते १३००

अभंग १२०१

विचारितां तुज नामाची नसे

विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥
नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥
गर्जत नामीं जो जो शब्द उठी । शब्दानुशब्दा पडतसे मिठी ॥३॥
एका जनार्दनीं नित्य स्मरें नाम । नामरुप जाला आत्माराम ॥४॥

अभंग १२०२

नाम घेतां हे वैखरी

नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥
कैसें होता हें स्मरण । स्मरणामाजीं विस्मरण ॥२॥
नामरुपा नव्हता मेळा । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥
एका जनार्दनीं छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥

अभंग १२०३

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं

शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥
साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥
परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥
एका जनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चारितां जाण श्रम हरे ॥४॥

अभंग १२०४

वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन

वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें ॥१॥
कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥
तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥

अभंग १२०५

नामेंचि तरलें नामेंचि तरले

नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥
ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढें ॥३॥
एका जनार्दनीं तारक हें नाम । पावती निजधाम गातां वाचे ॥४॥

अभंग १२०६

चांडाळादि तरले

चांडाळादि तरले । महादोषी उद्धरले ॥१॥
नाम पावन पावन । नामापरतें थोर कोण ॥२॥
नामाग्नीनें न जळे । ऐसे दोष नाहीं केले ॥३॥
वाल्मिक म्हणती दोषी । नाम उच्चारितां वंद्य सर्वांसी ॥४॥
अजामेळ गणिका । नामे दोष भंगिले देखा ॥५॥
एका जनार्दनीं नाम जाण । शस्त्र निर्वाणीचा बाण ॥६॥

अभंग १२०७

एकचि नाम उच्चारिलें

एकचि नाम उच्चारिलें । गणिकें नेलें निजपदीं ॥१॥
नाम घोकी कोली वाल्हा । दोष जाहला संहारा ॥२॥
नामें परीक्षिती उद्धरिला मुक्त जाहला सर्वांथीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम । भवतारक निष्काम ॥४॥

अभंग १२०८

नाम एक उच्चारितां

नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठपंथा । नामें पशु तो तत्त्वता । उद्धरिला गजेंद्र ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । जगीं सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥
नामें तरला कोळी वाल्हा । करा नामाचा गलबला । नामें एका जनार्दनीं धाला । कृत्यकृत झाला संसार ॥३॥

अभंग १२०९

उत्तम अथवा चांडाळ

उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥१॥
तेही तरले एका नामें । काय उपमें आन देऊं ॥२॥
एका जनार्दनीं नाम । गातां सकाम मुक्ति जोडे ॥३॥

अभंग १२१०

अवघ्या लोकीं जाहलीं मात

अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती ॥१॥
तोचि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥
तेणें त्रिभुवनीं सत्ता । उद्धरती पतिता अनायासें ॥३॥
एका जनार्दनीं गाजली हांक । नाम दाहक पापांसी ॥४॥

अभंग १२११

नित्य काळ वाचे जया नाम छंद

नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें ॥१॥
घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनीं वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥

अभंग १२१२

भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं

भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥
धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥
संकटीं सुखात नाम सदा गाय । न विसंबे देवराया क्षण एक ॥३॥
एका जनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरीं ॥४॥

अभंग १२१३

भाग्याचें ते नारीनार

भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥
धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥
उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखीं ॥३॥
नामापरतें आन । त्यासी नाहीं पैं साधन ॥४॥
एका जनार्दनीं नामें गाय । त्यांचे वंदितसे पाय ॥५॥

अभंग १२१४

जयामुखीं नाममंत्र

जयामुखीं नाममंत्र । तया जग हें पवित्र ॥१॥
नाम वंदें ज्याची वाचा । देव हृदयीं वसे साचा ॥२॥
नामीं प्रीति अखंड ज्यासी । मोक्ष तया करी वसे ॥३॥
एका जनार्दनीं नाम । हेंचि चैतन्य निजधाम ॥४॥

अभंग १२१५

अवचट दैवयोगें नाम येत मुखा

अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥
आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥
एका जनार्दनीं नामाची ही थोरी । होतसे बोहरी केली पापा ॥३॥

अभंग १२१६

अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती

अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥
धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥
न लगे उपवासकरणे अष्टांग । न लगे नानायोग साधनें तीं ॥३॥
एका जनार्दनीं नामामृत सार । उतरले पैलपार वैष्णव जन ॥४॥

अभंग १२१७

कलियुगी नाम तारक

कलियुगी नाम तारक । दुजें होय दुःखदायक ॥१॥
पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥
अठरा वर्ण याती । नामें पावनचि होती ॥३॥
न करा आळस क्षणभरी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥

अभंग १२१८

नरदेही आलिया मुखीं नाम गाय

नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी ॥१॥
प्रपंचमृगजळीं गुंतुं नको वायां । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥
सोईरे धाईरे वायांचि हांवभरी । पाडिती निर्धारी भोंवरजाळीं ॥३॥
एका जनार्दनीं संसाराचा छंद । वायांक मतिमंद भुललासे ॥४॥

अभंग १२१९

प्राणी गुंतले संसारश्रमा

प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा ॥१॥
नामें तरलें पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकीं ॥२॥
व्यास शुकादिक पावन । नामेंचिक पावले बहुमान ॥३॥
वाल्हा कोली अजामेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥
एका जनार्दनीं नाम पावन । पातकी उद्धरीले परिपूर्ण ॥५॥

अभंग १२२०

असोनि उत्तम कुळीं

असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं ॥१॥
जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥
कुळासी तो नाहीं काज । नाम वदतांचि निज ॥३॥
नाम पावन हे जनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

अभंग १२२१

यातीसी नाहीं कारण

यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥
तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥
मागां पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥
स्त्रिया शूद्र नारी नर । नामें निर्धारा मुक्तिपद ॥४॥
एका जनार्दनीं नाम । जपा विश्रामदायक ॥५॥

अभंग १२२२

उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम

उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥
अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥
यवनादि नीच असोत भलते । परी नाम सर्वदा तें मुखी वसो ॥३॥
एका जनार्दनीं नाम वसो मुखीं । तेणें तो तिहीं लोकीं सरता होय ॥४॥

अभंग १२२३

प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां

प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येरा तें करितां वायां जाय ॥१॥
पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जगीं शीण तैसा ॥२॥
अमृतसागरीं राहुनी कोरडा । नाम धडपुडा नेघें प्राणीं ॥३॥
नाम संजीवनी भरलीसे जनी वनीं । एका जनार्दनीं तारक जगा ॥४॥

अभंग १२२४

भवसिंधु तराया नाम हें नौका

भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥
न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥
क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपें सर्व साधे ॥३॥
मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तैं होत अपघात शरीराचा ॥४॥
एका जनार्दनीं तैसें नोहें नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ॥५॥

अभंग १२२५

नामीं धरा दृढ विश्वास

नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥
सोपें वर्म कलिमाजीं । नामें तरती जन सहजीं । योगयाग तप साधनें जीं । तया प्राप्ती नामेंची ॥२॥
नाम साधनांचे सार । सोपा मंत्र हरि उच्चार । एका जनार्दनीं सार । निवडोनि काढिलें ॥३॥

अभंग १२२६

शम दम साधन

शम दम साधन । नामावांचुन न करीं जाण ॥१॥
नाम गावें नाम गावें । वेळोवेळां नाम गावें ॥२॥
नामावांचुनी साधन नाहीं । ऐसी वेदशास्तें देती ग्वाही ॥३॥
मज भरंवसा नामाचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा ॥४॥

अभंग १२२७

एका नामावांचुन

एका नामावांचुन । अवघा शीण भ्रामक ॥१॥
कां रे हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरा ॥२॥
बैससी घालुनि आसन । मना मुळीं वाउगें ध्यान ॥३॥
दाविसी तें अवघें सोंग । एका जनार्दनीं नाहीं रंग ॥४॥

अभंग १२२८

दंभ मान ही उपाधी

दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामें जोडे सर्व सिद्धि । धन्य जगीं नाम तें ॥१॥
उच्चारितां घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिकां अत्यर्क्य ॥२॥
आगमनिगमांचें ज्ञान । नामें साधे वैराग्य निधान । एका जनार्दनीं पावन । नाम जाण निर्धारें ॥३॥

अभंग १२२९

नाम मुखीं गातां विषयांची वार्ता

नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥
नाम तें पावन नाम तें पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥
एका जनार्दनीं नाम तें पावन । त्रिभुवनीं मंडन नाम सत्य ॥३॥

अभंग १२३०

नामस्मरण अहो जना

नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥
ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥
जो जो कोणी प्रेमें भजतां । पाविजेल सायुज्यता । ऐशी भाक घे रे आतां । जप तप नाम स्मरतां ॥३॥
दीनबंधु दयासिंधु । जेणें केला परमानदु । दृष्ट जना करी भेदु । एका जनार्दनीं नित्यानंदु ॥४॥

अभंग १२३१

नामापाशीं तिष्ठे देव

नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥
नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥
नामापाशीं भुक्ति मुक्ति । नामापाशी ते विरक्ती । नामें पातकें नासती । बहु जन्माचीं ॥३॥
एका जनार्दनीं नाम । गातां निरसे भवभ्रम । साधन उत्तम । कलियुगामाझारीं ॥४॥

अभंग १२३२

असोनि दुराचारी

असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी ॥१॥
तयाचें नमस्कारावे चरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥
वाचे सदा गाय नाम । तोचि पावे निजधाम ॥३॥
एका शरण जनार्दनीं । तोचि पवित्र त्रिभुवनीं ॥४॥

अभंग १२३३

राजाला आळस संन्याशाला सायास

राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥
व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥
दानेंविण पाणी । घ्राणेविन घाणी । नामेंविण वाणी विटंबना ॥३॥
एका जनार्दनीं भावभक्तीविणा । पुण्य केलें नाना विटंबना ॥४॥

अभंग १२३४

आपुलें कल्याण इच्छिलें जयासी

आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥
करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल कीं वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥
एका जनार्दनीं जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥

अभंग १२३५

मुळीचे आहे संतवचन

मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥
तोचि आधार धरुनी पोटीं । बोलतों नेहटीं भाविकां ॥२॥
अवघ्या यातीसी उद्धार । न लगे श्रम करा नामोच्चार ॥३॥
एका जनार्दनीं पूर्वापार । नामाचा बडिवार बोलती ॥४॥

अभंग १२३६

आनंदें निर्भर नाम गावें वाचे

आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥
नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी माथां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥
यज्ञ योग जप तप नामें सर्व सिद्धि । वायां तूं उपाधी गुंतूं नको ॥३॥
एका जनार्दनीं नाम भवांचें तारक । निश्चियेंसी देख गाये वाचे ॥४॥

अभंग १२३७

जयाचें देखतां चरण

जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥
तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनिया करीं ॥२॥
नाम घेतां आवडी । तुटेल संसाराची बेडी ॥३॥
भाविकांसी पावे । मागें मागें त्यांच्या धांवे ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । आवडीने नाम घोका ॥५॥

अभंग १२३८

प्रेमयुक्त नाम आदरें घेतां

प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेथें नाहीं सुखदुःखवार्ता ॥१॥
नामीं धरुनी आवडी । उच्चारावें घडोघडी ॥२॥
योगयाग तपासाधान । नाम उच्चारितां संपुर्ण ॥३॥
ऐसा नामीं निजध्यास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥४॥

अभंग १२३९

मुखीं नाम हातें टाळीं

मुखीं नाम हातें टाळीं । साधन कलीं उत्तम हें ॥१॥
न घडे योगयाग तप । नाहीं संकल्प दुसरा ॥२॥
संतापायीं सदा मन । हृदयीं ध्यान मूर्तीचें ॥३॥
एका जनार्दनीं सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥

अभंग १२४०

काया वाचा आणि मन

काया वाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं ॥१॥
तोचि पावन जाहला जगीं । दुजे अंगीं कांहीं नेणें ॥२॥
सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥
एका जनार्दनीं देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥

अभंग १२४१

निवंत बैसोनि सुखें गाय नाम

निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥
हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥
लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत जाये जे जे वेळ ॥३॥
कर्म धर्म त्तत्त्वतां बीज हें सर्वथा । एका जनार्दनीं पुरता योग साधे ॥४॥

अभंग १२४२

नाम घेई सदा वाचे

नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती ॥१॥
सुलभ सुलभ एक नाम । नाम आराम जपतांची ॥२॥
रानीं वनीं बैसता जनीं । नाम वदनी तो धन्य ॥३॥
एका जनार्दनीं सोपें । हरती पापें जन्माचीं ॥४॥

अभंग १२४३

नको कांही आणिक नेम

नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥
तुटे जन्ममरण बाध । हृदयीं बोध ठसावे ॥२॥
न लगे गिरी कडे कपाट । गाम बोभाट करी सुखें ॥३॥
एका जनार्दनीं वर्म । धर्माधर्म घडे नामें ॥४॥

अभंग १२४४

नाहीं कधी वाचे नाम

नाहीं कधी वाचे नाम । तो अधम न पहाव ॥१॥
होतं त्याचे दरुशन । सचैल स्नान करावें ॥२॥
तयासी ते ऐकता मात । होय घात शरीराचा ॥३॥
ऐसा अधम तो जनीं । नामहीन असतो प्राणी ॥४॥
म्हणोनि नाम आठवावें । एका जनार्दनीं जीवेंभावें ॥५॥

अभंग १२४५

नको आणिकांच्या पडुं हावभरी

नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं ॥१॥
चुकवी पतन उच्चारीं तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥
वेगळें वेगळें चहूं वाचांपरतें आहे । साहांचे तें पाहें न चले कांहीं ॥३॥
अठरांची मती कुंठीत राहिली । एका जनार्दनीं माऊली विठ्ठल देखा ॥४॥

अभंग १२४६

हेंचि साचें बा साधन

हेंचि साचें बा साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥१॥
येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥
नको ते वाउगी खटपट । मन करी एकनिष्ठा ॥३॥
घडे साधन समाधी । तेथेम अवघी उपाधी ॥४॥
एका जनार्दनीं ध्यान । साधी परमार्थ साधन ॥५॥

अभंग १२४७

एक नाम गाये

एक नाम गाये । तेथें सदा सुख आहे ॥१॥
नाम गातांचि वदनीं । उभा असे चक्रपाणी ॥२॥
नामाचिया हाकें । उडी घाली कवतुकें ॥३॥
घात आघात निवारी । उभी राहे सदा द्वारी ॥४॥
एका जनार्दनीं नामासाठीं । धांवे भक्तांचिये पाठीं ॥५॥

अभंग १२४८

पशु आणि पक्षी तरले स्मरणें

पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षीना ॥१॥
धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद तें प्रेम असो द्यावें ॥२॥
सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाहीं जगीं ॥३॥
एका जनार्दनीं नामाचा प्रताप । नुरेची तेथें पाप वोखदासी ॥४॥

अभंग १२४९

सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव

सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥
साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥
नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति । एका जनार्दनीं विरक्ति तेणें जोडें ॥३॥

अभंग १२५०

नाहीं जाय भाव पोटीं

नाहीं जाय भाव पोटीं । तया चावटीं वाटे नाम ॥१॥
परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥२॥
वेरझारीं पडे चिरा । नाहीं थारा जन्माचा ॥३॥
एका जनार्दनीं खंडे कर्म । सोपें वर्म हातां लागें ॥४॥

अभंग १२५१

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥
एका भावें गावें नाम । सोडोनियां क्रोधकाम ॥२॥
आशा मनशा टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥
एका जनार्दनीं मन । करा देवासी अर्पण ॥४॥

अभंग १२५२

वेदांत सिद्धांत पाहतां खटपट

वेदांत सिद्धांत पाहतां खटपट । वाउगा बोभाट नामविण ॥१॥
नामें होय भुक्ति नामें होय मुक्ति । नामें वैकुंठप्राप्ति सर्व जीवां ॥२॥
नामेंचि तरले नारदादि योगी । नाम पावन जगीं कीर्ति नामें ॥३॥
एका जनार्दनीं तारक हें नाम । भावसिंधु धाम उतरी नाम ॥४॥

अभंग १२५३

जया ठायीं जैसा भाव

जया ठायीं जैसा भाव । प्रगटे देव तैसाची ॥१॥
हा तो जगी अनुभव । नुपेक्षी देव कवणासी ॥२॥
स्त्रियादि हीन याती । नामें तयां उत्तम गती ॥३॥
निंदका वंदका सम । गाता जोडे एकधाम ॥४॥
कृपाळु माऊली । एका जनार्दनीं साउली ॥५॥

अभंग १२५४

उपवास पारणें न लगे

उपवास पारणें न लगे । आणिक साधन । नामापरतें निधान नाहीं जगीं ॥१॥
म्हणोनि सांडी सांडी काम परतें । वाचेसी आरुतें नाम जपें ॥२॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । नाम हें निर्वाणीं तारक जगा ॥३॥
एका जनार्दनीं नाम श्रेष्ठाचें श्रेष्ठ । सर्वांही वरिष्ठ नाम एक ॥४॥

अभंग १२५५

रंक बैसतां पालखीसी

रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी ॥१॥
तैसें नाम मुखी गातां । कोण ब्रह्मा ज्ञान वार्ता ॥२॥
मूळीचे जाहले नाहीं खंडन । वादविवाद अभेदी जाण ॥३॥
एका जनार्दनी शरण । ब्रह्माज्ञानाची कोण आठवण ॥४॥

अभंग १२५६

गुणदोष नायकावे कानीं

गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं ॥१॥
हेंचि परमार्थचें सार । मोक्ष मुक्तिचे भांडार ॥२॥
साधे सर्व योगस्थिती । द्वेष धरुं नये भूतीं ॥३॥
सर्वाठायीं जनार्दन । म्हणोनि वंदावे ते जन ॥४॥
खूण सांगे जनार्दन । एका जनार्दनीं पूर्ण ॥५॥

अभंग १२५७

सदा वाचे नामावळी

सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥
नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥
उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धारा । एका जनार्दनीं बरा । त्याचा सांगात घडतां ॥३॥

अभंग १२५८

गांवढे सहस्त्र ब्राह्मण

गांवढे सहस्त्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रांचे एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे ॥१॥
ऐसें पुण्यक्षेत्रांचे दशशतक । तृप्त केलिया पाठक । पाहतां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥२॥
ऐसे सहस्त्र वेदपाठक । तृप्त केलिया पंडीत एक । पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥३॥
तैसेच पंडित सहस्त्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख । तरी तें सुकृत । तितुकेंची जोडे ॥४॥
तैसे सहस्त्र संन्यासी । गणिका एक परमहंसी । पाहतां सुकृतांसी । एक तृप्त केलिया ॥५॥
परमहंसी सहस्त्रगणि । तैसीच ब्रह्माज्ञानाची मांडणी । जोडे सुकृत तृप्तकरणी । एका ब्रह्मावेत्ता ॥६॥
उपमा देता ब्रह्मावेत्यासी । पाहता ब्रह्माडीं नाहीं त्यासी । तृप्त केलिया ब्रह्मावेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥
ऐसें वेत्ते अपरंपार । न ये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहें एका जनार्दनीं ॥८॥

अभंग १२५९

वेदाभ्यास नको सायास ज्योतिष

वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाहीं ॥१॥
बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाहीं ॥२॥
अनंत हें नाम जयापासुनि जालें । तें वर्म चुकलें संतसेवा ॥३॥
संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनीं न कळे नाम ॥४॥

अभंग १२६०

ज्या नामे पाषाण जळांत तरलें

ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥
अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरें रक्षी नाम ॥२॥
ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोकीं मिरवला बडिवार ॥३॥
एका जनार्दनीं नामेंचि तरलें । जडजीव उद्धरिलें युगायुगीं ॥४॥

अभंग १२६१

उत्तम मध्यम चांडाळ

उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ ॥१॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । नामें पवित्र पैं जाहलें ॥२॥
यवन माई तो कुंभार । शिंपी सोनार तरले ॥३॥
एका जनार्दनीं सांगूं किती । मागें तरले पुढें तरती ॥४॥

अभंग १२६२

नाम सुलभ सोपें गातां

नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥
म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥
उणें पुरें नको कांहीं । सोंवळें येथें नाहीं । एका जनार्दनीं देहीं । सुस्नात सर्वदा ॥३॥

अभंग १२६३

जडजीवातें उद्धरी

जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥
तेंचि नाम वाचे गातां । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥
नामें पाषाण तारिले । गजेंद्राते उद्धारिलें ॥३॥
ऐसा नामाचा निजछंद । एका जनार्दनीं परमानंद ॥४॥

अभंग १२६४

आम्हीं धारक नामाचे

आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें ॥१॥
ऐशीं नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥
येरा अवघिया उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥
एका जनार्दनीं पोटीं । नाम गावें सदा होटीं ॥४॥

अभंग १२६५

कोणी कांहीं तरी म्हणो

कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥
गाऊं सुखें नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदां ॥२॥
नाचुं संतमेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवुं ॥३॥
एका जनार्दनीं हाचि धंदा । वायां शब्दा न लागूं ॥४॥

अभंग १२६६

धन्य धन्य श्रीहरीचे गुण

धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥
जें जें अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥
कीर्ति वर्णिता उद्धार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥
एका जनार्दनीं सोपें वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥

अभंग १२६७

नामाचें धारक विष्णुरुप देख

नामाचें धारक विष्णुरुप देख । त्रिभुवनीचें सुख तये ठायीं ॥१॥
ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक निर्धारे तया वंद्य ॥२॥
त्रिभुवनापरता नामाचा महिमा । जाणे शंकर उमा सत्य सत्य ॥३॥
एका जनार्दनीं पतीतपावन नाम । गातां निजधामा जोडे मुक्ति ॥४॥

अभंग १२६८

मोक्ष मुक्तीचे लिगाड

मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥
एक नाम जपा कंठीं । राबती कोटी मुक्ति देखा ॥२॥
मोक्ष तेथें जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥
एका जनार्दनीं देखा । मुक्ति फुका राबती ॥४॥

अभंग १२६९

दोषी यमदुत नेतसे बांधोनी

दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥
तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥
तुटोनि बंधन पडता तळीं । तंव वरचेवर झेली वनमाळी ॥३॥
दुती अति दृढ नाम धरितां मनीं । यमदूतां देवदूत घालिती विमानीं ॥४॥
दोषी आणि दूता नामाचा परिपाठीं । भावबळें देव स्थापी वैकुंठी ॥५॥
एका जनार्दनीं नामोच्चारासाठीं । यमे यमदूतां नोहे भेटीं ॥६॥

अभंग १२७०

चित्रगुप्त म्हणती करावें काई

चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥
नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥
यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नम विवंचितां जाले मुक्त ॥३॥
यमें यमदुता आल्हादें भेटी । अवघे चतुर्भुज झाले वैकुंठीं ॥४॥
जनामाजी थोर दाटुगें नाम । यमें यमदूत झाले आत्माराम ॥५॥
एका जनार्दनीं नामाचा गुण । यमेसी यमलोक जाला परब्रह्मा पूर्ण ॥६॥

अभंग १२७१

जपतां नाम पडे धाक

जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥
जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥
साधनें पुण्य असेल गांठीं । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनीं पोटीं । दया शांति आकळे ॥३॥

अभंग १२७२

नित्य नैमित्तिक कर्म

नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणें उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥
नामें कर्माचा सुटे उपाधी । नामें तुटे आधी व्याधी । नामें शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥
नाना रोग तुटती नामें । घडती सर्व ब्रह्माकर्में । एका जनार्दनीं नामें । धर्म सकळ साधती ॥३॥

नामपाठ – अभंग १२७३ ते १२८१
अभंग १२७३

नामपाठ करा नामपाठ करा

नामपाठ करा नामपाठ करा । चवर्‍याशींचा फेरा चुकवा जगीं ॥१॥
नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपी नये संसारासी ॥२॥
एका जनार्दनाचा नामपाठ गाय । आनंदी आनंद होय तयालागीं ॥३॥

अभंग १२७४

नामपाठ गाये संतांचे संगती

नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥
नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥
जनार्दनीचा एका नामपाठ गायें । जनार्दनीं पाहे जनीं वनीं ॥३॥

अभंग १२७५

नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ

नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥
चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनीं ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ॥३॥

अभंग १२७६

नामपाठ गाये सदोदित मनीं

नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥
नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥
जनार्दनाचा एका नामीं धरी आवडी । सर्वभावें जोडी नामपाठ ॥३॥

अभंग १२७७

नामपाठ सार वेदांचें तें मूळ

नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥
योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठें स्पष्ट सर्व कार्य ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिहीं लोकीं उभारिली ॥३॥

अभंग १२७८

नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा

नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥
नामपाठ भावस भक्ति तें कारण । आणिक साधन नाहीं दुजें ॥२॥
जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥

अभंग १२७९

नामपाठ किती सर्वात वरिष्ठ

नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥
नामपाठमाला हृदयीं ध्याई भावें । उगेंचि जपावें मौन्यरुप ॥२॥
जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिहीं लोकां वरिष्ठ तें ॥३॥

अभंग १२८०

नामपाठ कालीमाजीं सोपें वर्म

नामपाठ कालीमाजीं सोपें वर्म । साधन तो श्रम न करीं वायां ॥१॥
नामपाठ गाये नामपाठ गाये । वायां तूं न जाय खटपटा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे काया वाचा ॥३॥

अभंग १२८१

नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ

नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावें तो वैकुंठकलीमाजीं ॥१॥
नामपाठें गेलें नामपाठें गेले । जडजीव उद्धरिलें नामपाठें ॥२॥
जनार्दनाचा एका आणिक नेणें वर्म । सोपें होय कर्म नामपाठें ॥३॥

नामपाठफल – अभंग १२८२ ते १३२३
अभंग १२८२

नामपाठ सदा एकांती जो करी

नामपाठ सदा एकांती जो करी । भुक्तिमुक्ती चारी घरीं त्याच्या ॥१॥
न लगे साधन व्युप्तत्ति पसारा । नामपाठ बरा संतसंगे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठें निका । तारिले जडलोकां नामपाठें ॥३॥

अभंग १२८३

नामपाठ अंडज जारज स्वेदज

नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज देख चार योनी ॥१॥
नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥
जनार्दनाचा एक नामपाठीं निका । तोडियेली शाखा द्वैताची ते ॥३॥

अभंग १२८४

नामपाठ जया नाही पैं सर्वथा

नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥
मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥
जनार्दनाचा एका सांगे सर्व लोकां । नामपाठ घोका आळस नका ॥३॥

अभंग १२८५

नामपाठ वर्म सोपें आहे जाणा

नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥
अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होतीं जना ॥२॥
जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ॥३॥

अभंग १२८६

नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा

नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें ॥१॥
नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दुर होती ॥२॥
जनार्दनाचा एका आवडीनें गाये । नाशिवंत पाहें शरीर आहे ॥३॥

अभंग १२८७

नामपाठ गाये धन्य तो संसारीं

नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं ॥१॥
तयाचे चरणीं माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावें ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावें । अखंड गात आहे जीवेंभावें ॥३॥

अभंग १२८८

नामपाठ गाय सदा नामपाठ गाय

नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥
एका जनार्दनीं साराचें हें सार । नामपाठ निर्धार केला जगीं ॥३॥

अभंग १२८९

नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठाता

नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठाता । यमधर्म माथां वंदी पाय ॥१॥
ऐसा नामपाठ भक्तियुक्त गाय । पुनरपि नये संसारासी ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे फुका । नामपाठ घोका जीवेंभावें ॥३॥

अभंग १२९०

नामपाठ जागीं सोपें तें साधन

नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥
आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥
जनार्दनाचा एक भुलला नामपाठीं । म्हणोनि वैकुंठी घर केलें ॥३॥

अभंग १२९१

नामपाठ सोपा हरावया पापें

नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥
नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठें ॥२॥
जनार्दनाचा एक गात नाचत । नामपाठ करीत सर्वकाळ ॥३॥

अभंग १२९२

नामपाठ करितां काळ वेळ नाहीं

नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ ॥१॥
सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥
जनार्दनाचा एक भुलता नामपाठीं । आणिक न करी गोष्टी नामविण ॥३॥

अभंग १२९३

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥
नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥
जनार्दनाचा एक सांगे प्रेमभावें । आदरें तें गावें नामपाठ ॥३॥

अभंग १२९४

गाय नामपाठ न करीं आळस

गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥
न करी आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥
जनार्दनाचा एक प्रेमें विनटला । नामपाठें झाला कृतकृत्य ॥३॥

अभंग १२९५

नामपाठ करितां जाईल पैं चिंता

नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥
म्हणोनि सोपें वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥
जनार्दनाचा एक कुर्वंडी करुनी । लोळत चरणीं संताचिया ॥३॥

अभंग १२९६

नामपाठें होय शुद्ध तें शरीर

नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं ॥१॥
नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥

अभंग १२९७

नामपाठ जपे भोळा महादेव

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥
विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥
जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥

अभंग १२९८

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥
पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥
नामापाठफल प्राप्त झालेले भक्त

अभंग १२९९

नामपाठें गणिका नेली मोक्षपदा

नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥
नामपाठें ध्रुव अढळपदीं बैसें । नारद नाचतसे नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एक सांगे अनुभव । नामपाठ सर्व जपा आधी ॥३॥

अभंग १३००

नामपाठे भक्ति हनुमंतें केली

नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥
नामपाठें शक्ति अद्‌भुत ये अंगी । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥
जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥