५८. कैसी करुं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ॥
कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशा परी ॥१॥
कर्म भ्रष्ट माझें मन । नेणें जपतप अनुष्ठान ॥
नाहीं इंद्रियांसी दमन । नव्हे मन एक विध ॥२॥
नेणें यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ॥
मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥३॥
न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ॥
न जिंकवती सकळ । काम क्रोध शरीरीं ॥४॥
आतां राख कैसें तरी । मज नुपेक्षावें हरी ॥
तुझीं ब्रिंदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥५॥