३७. अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति ॥
प्रगटे त्दृदयींची मूर्ति । भावशुद्धि जाणोनियां ॥१॥
बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म ॥
सकळां कळाचें हें वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥२॥
जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास ॥
सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥३॥
येती अंगा वसतीं लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें ॥
आपण चि येती तयाचे गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥४॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म ॥
आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥५॥
वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य ॥
मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोळ्या आम्हां ॥६॥