३६. बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं ॥
फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥
न वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं ॥
झालों संताची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥२॥
जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसीं निराळा ॥
पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥३॥
जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ॥
ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥४॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे ॥
तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥५॥
अंकिले पणें आनंदरुप । आतळों नये पुण्यपाप ॥
सारुनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपे आप एकाएकीं ॥६॥