३४. तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी ॥
अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीराय ॥१॥
भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारीं ॥
सुदर्शन घरटीं करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं ॥
जैसी विद्युल्लता झमकें मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु ॥
पक्षिश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा ॥
तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भक्तिकाजा लवलाहीं ॥५॥