३३. आतां माझा नेणो परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव ॥
सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास ॥
न पाहे मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥२॥
आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व ॥
अकाळीं काळ अवघें पर्व । झाला भरवंसा कृपेला भाचा ॥३॥
वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत ॥
तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥४॥
करुनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा ॥
कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥५॥
बहु मतापासुनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा ॥
बैसल्या रुपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेईलों तें ॥६॥