२८. होतों तें चितीत मानसीं । नवस फळले नवसीं ॥ जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥
धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय ॥ कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥२॥
मज तों पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली ॥ होती मृगजळें गोवी केली । दृष्टी उघडली बरें झालें ॥३॥
आतां हा सिद्धि पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव ॥ ऐसी तुह्मां भाकीतसे कींव । कृपाळूवा जगदानिया ॥४॥
कळों येते आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं ॥ केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥५॥
कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी ॥ प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥६॥