२६. अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं ॥ अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें अंतर ॥ आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाहीं ॥२॥
विविध कर्म चौर्‍यायशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा ॥ कर्मकठोर पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥३॥
जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न पंच भूतें ॥ रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥४॥
पुत्र पन्ती सहोदर । मायबाप गोताचा पसर ॥ मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळी दूर होती खळाळीं ॥५॥
ह्मणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान ॥ कृपाळु तूं जनार्दन । धरुनि चरण तुका विनवी ॥६॥