२५. बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी ॥ महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥१॥
दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन ॥ जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥२॥
तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे ॥ नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥३॥
ऐसिये पावविलो ठायीं । आतां मी काई होऊं उतराई ॥ येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥४॥
फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ ॥ लावूनि स्तनी केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥५॥
नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा ॥ आला आकारा आमुच्या चाडा । तुका ह्मणे भिडा भक्तीचिया ॥६॥