२४. आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित ॥ तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालों ॥१॥
येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं ॥ पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥२॥
ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें ॥ आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाणिजेते ॥३॥
घालोनियांझ माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥४॥
येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार ॥ देह हें नाशवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥५॥
केली आराणुक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्तीं ॥ तुका ह्मणे सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥६॥