१९. देवा तूं कृपाकरुणासिंधु । होशी मायबाप आमचा बंधु ॥ जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार ॥ सकळां देवा तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥२॥
भागलीं स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार ॥ जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥३॥
नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा ॥ आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥४॥
तुझिया बळें पंढरीनाथा । झालों निर्भर तुटली व्यथा ॥ घातला भार तुझिया माथां । न भी सर्वथा तुका ह्मणे ॥५॥