१८. आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं ॥ जवळीं अथवा दुरी धरीं । घालीं संसारीं अथवा नको ॥१॥
शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहीं च नेणें ॥ मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणे रंकाहुनी ॥२॥
मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धांवतां नावरती ॥ सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥३॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव ॥ आतां करीं कळे तो उपाव । तूंचि सर्व ठाव माझा देवा ॥४॥
राहिलो धरुनि विश्वास । आधार नेटी तुझी कास ॥ आणिक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥५॥