१७. आतां मी न पडें सायासीं । संसारदु:खाचिये पाशीं ॥ शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥
न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधले पाय ॥ आतां मज न विसंबें माय । मोकलुनि धाय विनवितसें ॥२॥
बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें ॥ त्रिगुण येतील लहरें । तेणें दु:खें थोरें आक्रंदलों ॥३॥
आणीक दु:खें सांगों मी किती । सकळ संसारस्थिती ॥ न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥४॥
आतां मज न साहवे सर्वथा । संसार गंधीची हे वार्ता ॥ झालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥५॥