धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनिया दोर ॥१॥
ह्रुदय बंदिखाना केला ।
आंत विठ्‌ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडाजुडी ।
विठ्‌ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला ।
विठ्‌ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्‌ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ॥५॥