बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥

तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥

लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय ।

त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥

वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन ।

माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥

शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां ।

दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥

ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी ।

एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥