दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान ।
परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥
पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।
गौळणी गार्हाणी सांगती नानापरी ॥ त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥
कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।
दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥
चोरी करितां बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावं ।
एका जनार्दनी दावीं सोंग बरवें । ज्यांची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥