आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥

गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥

कवाड भ्रांतीचें उघडिलें कुलुप मायेचे मोडिलें । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझिया कृष्णें ॥३॥

होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥

डेरा फोडिला दंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥

अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥

संचित हें शिळें लोणी । याचि केली धूळीधाणीं । संकल्प विकल्प दुधाणीं । तीहीं फोडिली कृष्णें ॥७॥

प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥

द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥

सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या अहोत्या घरीं । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥

कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥

पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ॥१२॥

ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आलें पुढे । होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥

आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥