आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥
पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत ।
एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥
दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली ।
अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥
तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां ।
रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥
चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल ।
भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥
पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग ।
जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥