मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥

सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥

राधा म्हणे येथोनियां बहु चावट होसी । घरीं चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥

धरिलीं पदरीं राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी ॥४॥

भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥