थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु ।तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥

देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें ।यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥

राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे ।हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥

कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥

यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं ।एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥