निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥
नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥
रत्नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरां ॥३॥
वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥
राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥
क्षणभरी स्थिर रहा । भरले पायें आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥
म्हणे कृष्णा आतां कैसें । दारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥
कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तूं मज ॥८॥
नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥
करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥
भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥