हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥
वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥
मोहिलें वृद्धेचें मन । नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनियां आकर्ता ॥३॥
दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । म्हणे राधेसी ते वेळां । यांसी नित्य आणी ॥४॥
तुज न गमे एकटी । आणीत जाई जगजेठी । एका जनार्दनाचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥