एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥
मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥
देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥
यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥
हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥
कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहें पा आतां ॥६॥
वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनीं विंदान । लाघव दावीं ॥७॥