एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥

देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥

मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥

राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥

उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥

घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥

घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥

तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥

नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥

धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥

असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥

ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥

कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥

भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥

दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥

जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥

मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥

आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥

तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥