स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाहीं ।
आसनीं शयनीं भोजनीं गमनागमानीं । राम म्हणता दोष नाहीं ॥१॥
श्रीराम जयराम श्रीराम जयराम । जपतां हें दो अक्षरीं नाम ।
संसारातें दळसी कळिकाळा तें कढसी । निरसेल कर्माकर्म ॥धृ॥
योग याग तपें तपताती बापुडें । जन धन शिणताती वेडे ।
निःशंक निर्लज्ज हरिनाम गातां । पायवाट वैकुंठां चढें ॥२॥
गूढ गुह्मा जपसी वाचे श्रीराम । ते नामें जपाचा भावो ।
तेणें नामें भुलला वैकुंठ सांडुनी । कीर्तनीं नाचतो देवो ॥३॥
रामनामें वाचा गर्जती उठी । अमर येती त्याच्याभेटी ।
तीर्थीचे समुदाय अघ्रिरेणु वांछिणी । श्रुति ऐको ठाती गोठी ॥४॥
सकल साधनामांजी वरिष्ठ हें भावें । जपा रामनाम ।
एका जनार्दनीं संतोषला तो । पुरविल निष्काम काम ॥५॥