करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं ।
हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥
राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडतानां राहिना करुं यांस गत काई काई ॥धृ॥
हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें ।
गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥
हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणें ।
उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥
गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।
उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनीं शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥