माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥

हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥

माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥

संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥

एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥