मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥
जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडीं ॥२॥
तेथें करितां वसती । नाहीं तया पुनरावृत्ती । जन्ममृत्युची खंती न करी कांहीं ॥३॥
पावन तीर्थ महिवरी । समान या नाहीं दुसरी । एका जनार्दनीं निर्धारी । प्रेमे वारी करिती ॥४॥