महादोषीयासी ठाव । एका पंढरीचा राव ॥१॥
तयावीण दुजा नाहीं । आणिका प्रवाही नको पडुं ॥२॥
जाशी देशदेशांतरीं । कोठें ही सरी ऐसा नाहीं ॥३॥
ऐसा देव उभा वीटे । दावा कोठें आहे तो ॥४॥
ऐसा वैश्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ॥५॥
ऐसें चंद्रभागा तीर्थ । आहे समर्थ कोठें पां ॥६॥
ऐसा पुंडलीक संत । दरुशने तारीत जडजीवां ॥७॥
एका जनार्दनीं ठाव । वैकुंठराव उभा जेथें ॥८॥