चतुर्भुज शामसुंदर । गळां गुण्जींचे हार ।
निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥
हातीं काठी खांदी कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी ।
नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥
जे निगमांचे ठेंवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें ।
शंभुचे आराध्यदैवत केणें । तें चरित गोधनें नंदाची ॥३॥
ऐसा अकळ नाकळें हरी । वेणु वाजवी छंदे नानापरी ।
एका जानार्दनी गोपेवेषें निर्धारीं । वाटी शिदोरी गोपाळं ॥४॥