पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे ।
काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥
पाहती देव बैसोनि विमानीं । ब्रह्मादिक ध्याती जया मनीं ।
आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥
नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्या मांडुं ।
नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळीं ॥३॥
गोंधने ठाई ठाईं बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले ।
मध्येम घननीळ ते सांवळें । नंदरायाचें गोठुलें गे माये ॥४॥
एका जनार्दनींशरण । पाहतां देहीं विरालें देहपण ।
संपुर्ण जनीं जनर्दन । पाहतां पाहतां गेलों भुलोन गे मायें ॥५॥