अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥
रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसें रजोगुणें । मायें काय करुं वो ॥३॥
कैसें निबीड निबीड रज । मीचि न देखें मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥
तळमळीताहे मन । गेलें निधान । संतां सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥
बाळ सांवळें देखोनियां दिठी । आला धांवोनि उठाउठीं । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥
वेगें नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाहीं बा ॥७॥
जडला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेंगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥
संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्हीं देख । येणें जाणें निःशेष । खुंटलें त्यांचें ॥९॥
कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवीं मीठ । विरोनि जाय ॥१०॥
तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । करुनी ठेला ॥११॥
पाहतां वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनीं । बैसविली निजपदीं ॥१२॥