निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥
सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥
कृष्ण स्वानंदाचा कंदु । कंसासी विरोधु । विषय विषा पाजुं । पुतना आली ॥३॥
मी म्हणे बाळ तान्हें । त्वा शोषिलें जीवें प्राणें । मागुतें येणें । खुटलें बापा ॥४॥
ऐसा कैसा रे होसी । मी तुझी रे माउशी । परतोनी गोकुळासी । मी नये बापा ॥५॥
ऐसा कैसा बाळ । माझ्या शोखिल्या जीवनकळा । यशोदा वेल्हाळा । वाचली कैसी बा ॥६॥
एका जनार्दनी । द्वेषाच्या भावना । सायुज्यसदना । अरि वर्ग ॥७॥