करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥
नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥
सदा सर्वकाळ निंदावें सज्जन । काया वाचा मन परद्रव्या ॥३॥
परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥
ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥
एका जनार्दनीं नवासाचें फळ । कुळीं झाला बाळ बुडवणा ॥६॥