स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥
सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों विभूती अंगीं ॥२॥
चोविसापरतें एक वोळखिलें । तेचि उच्चारिलें मुळारंभीं ॥३॥
आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥४॥
अहं कर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ॥५॥
संसाराची तीन वोंजळीं घातलें पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥
सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥
एका भावे नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ॥८॥