जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥
भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥
आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥
एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥