स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥
नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥
नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥
एका जनार्दनीं नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥