चंद्रसुर्य कला म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफराटे ।
सतरावीचें क्षीर सेउनी शरीर कलीकाळवंचनीं ताठे ।
सबाह्म आत्माराम नेणुनी विश्राम व्यर्थचि करिती या चेष्टे ॥१॥
तें वर्मा चुकेलें रें तें वर्म चुकलें रे । जवळींच असतां रे तें वर्म चुकलें रे ।
जवळींच असतां अंतरीं न पाहे । ब्रह्माप्राप्ती केवीं होय ॥ध्रु०॥
मीमांसक मात्त कर्माचा आचार स्नानसंध्या यथायुक्ति ।
एक दोन तीन स्नानें झालीं तरी आगळी लाविती माती ।
द्वादश जपतां घरींची चिंता करिती नारायणस्मरण चिंत्तीं ।
स्वयें नारायण कीं तेथें आपण नेणती स्वरुपस्थिती ॥२॥
चारी वेद पुर्ण आचार होम क्रिया नित्य नेम आचरती ।
शिखासुत्र मंत्र त्रिकाळ क्रिया संध्यादि यथापद्धति ।
पुजा ब्रह्मायज्ञ उपवास पारणें मध्यामातें नातळती ।
आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन कष्टचि पावत अंतीं ॥३॥
विष्णु उदरीं त्रिभुवन अवघें म्हणउनि वैष्णव झाले ।
तुळशीवृंदावनें हरीचें पुजन विष्णुपदीं मिरविलें ।
हरिहर भेद करिताती वाद जाणविनें नागविलें ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन कणेविण उपणिलें ॥४॥
दैवत शिवापरतें नाहीं जंगम राहिलें नेहटी ।
शैव पाशुपत रुद्राक्ष विभुति आचार लिंगे कंठीं ।
पाषाण पुजुनी पवाडा करिती घालूनिया शस्त्रें पोटीं ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन मरण पावती हटीं ॥५॥
दरवेश काजी सैद मुलांना पडताती नित्य किताब ।
करिती पंच वक्त निमाज गळा घालुन पोकळ जुभा ।
परमात्मा देहीं न पडेचि ठायीं पश्निमें मारिती बोंबा ।
आत्मज्ञानेंविन न तुटे बंधन अंतीं करिती तोबा तोबा ॥६॥
शक्तीचे उदरीं त्रिभुवन अवघे आवडी पूजिती शक्ति ।
अर्चन हवन पूजन कामना वाढवुनी फळें घेती ।
जारण मारण स्तंभन मोहन अभक्त लाविलें भक्ति ।
आत्मज्ञानेविण न तुटे बंधन चुकले तें निजमुक्तिः ॥७॥
बौध्यरुपालागीं क्षपाणिक जाहलें करिताती लुंचि कर्मे ।
वेद निरोधन मनीं निरोधन आचरती जैंन कर्मे ।
वस्त्रें फेडण्या नग्न फिरताती न चुकती मरण जन्मे ।
आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन चुकली त्या गुरु वर्मे ॥८॥
भ्रष्टाचा आचार पालव माथां उफराटी काठी धरिती ।
पंचक्रोधी ध्यान पंथीचें स्मरण षटचक्रा उलटितीं ।
दर्शन खंडिती सज्जन निंदिती दृष्ट कर्में आचरती ।
अत्माज्ञानेवीण न तुटे बंधन व्यर्थ तनु विटंबि ॥९॥
ऐसा एक एका संवाद करितां अहंता ममताची पाही ।
नेणतां निपुण बुडाले संसारडोहीं । स्वकर्माचरणमतांचें विवरण परमात्मा न पडेचि ठायीं ।
एका जनार्दनीं अनुभवी तो जाणे सर्वेश्वर याच देहीं ॥१०॥