वायां वायां शिणती साधक जन । साधक तितुकें ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥
साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसें ॥२॥
साधनें साधूं आत्मायासी । ऐसें म्हणती ते परम पिसी । आत्मा प्रकाशी साधनासी । तो केवीं त्यासी आकळे ॥३॥
एक ते मंत्र उपदेशिती । जपू करावा नेणों किती । जेणें होय निजात्मप्रत्पि । ते मंत्रयुक्ति न कळे ॥४॥
मंत्री मंत्रामाजीं अक्षर । ॐ नमः इत्यादि उच्चार । अक्षरीं अक्षर चिन्मात्र । मंत्र साचार परब्रह्मा ॥५॥
पाठका साधन वेदपठण । अक्षर उच्चार स्वर वर्ण । कोरडी वाची तोंड पठण । नव्हे बोळवण कामक्रोधा ॥६॥
वेदमुळ तो ॐकार । तोचि परब्रह्मा साचार । अकार उकार मकार । वेद चिन्मात्र पठणेसी ॥७॥
शास्त्र श्रवण साधन शुद्ध । देहाभिमानें केलें विरुद्ध युक्तिप्रगुक्तिचें बोध । अति विवाद पंडितीं ॥८॥
शास्त्र तितुकें ज्ञानसंपन्न । जे जे युक्ति ते केवळ ज्ञान । शास्त्रामाजीं जाणपन । तेंचि ब्रह्मापुर्ण श्रवणार्थ ॥९॥
प्रल्हादा साधन केवळ हरी । हरी सर्वांगें विघ्न निवारी । अनाम भक्त वचनें करी । नरकेसरी होऊन ठेला ॥१०॥
जैसा जैसा भक्तांचा पैं भावो । तैसा तैसा भाळे देवो । भावे वाचूनियां पाहो । हायो अभावो देवाचा ॥११॥
ऐसे साध्य तेंचि साधन । ज्ञेय तेंचि धृतिज्ञान । ध्येय तेंचि होय ध्यान । समाधान गुरुवाक्यें ॥१२॥
जें जें विषयांचें गोडपण । तें तें गोडी चैतन्यघन । विषयीं विषय ब्रह्मापुर्ण । इंद्रिय स्फुरण चिन्मात्र ॥१३॥
जेथें जो म्हणविसी अज्ञाना अज्ञान । देखणें तो ज्ञानघन । आम्ही नेणों ज्ञानाज्ञान । तो ब्रह्मापुर्ण सहजेंचि ॥१४॥
एका पाहातां एकपण । जन तोचि जनार्दन । एकाजनार्दनीं शरण । जग संपुर्ण परब्रह्मा ॥१५॥